लोकं नालासोपाराला हलक्यात घेतात, कारण त्यांना मेन इतिहासच माहिती नसतो….

एखादया गोष्टीला आपण लईच किरकोळ समजतो पण ती गोष्ट एखादया वेळी आपल्यालाच शॉक करून टाकते. तो एक डायलॉग आहे बघा की या लवंगी फटाक्यातून सुतळी बॉम्ब कस काय फुटला ? तर हा डायलॉग परफेक्ट बसतो तो नालासोपारा या नगरासाठी.

खरंतर एका फेमस शोमध्ये नालासोपारा हे नाव विनोदासाठी ग्राह्य धरण्यात येत आणि हलक्यात वापरलं जातं पण भिडू नालासोपारा काय विषय आहे हे वाचल्यावर समजेल. भव्य दिव्य असा इतिहास लाभलेलं हे नगर.

एक काळ होता जेव्हा भारतात सगळयात प्राचीन नगर म्हणून नालासोपारा ओळखलं जायचं.

इसवी सन पूर्व 300- 400 मध्ये नालासोपाराचा उल्लेख आढळतो. टॉलेमीने त्याच्या तत्कालिन लिखाणात सौपारा असा उल्लेख केलाय. तसं पाहिलं तर नाला आणि सोपारा अशी दोन वेगळी खेडी होती.

रेल्वे लाईनच्या पूर्व बाजूला नाला आहे तर पश्चिमेकडे सोपारा आहे. त्यामुळे या भागाला सोपारा हे जोडनाव मिळालं. सोपारा ही पौराणिक भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. 

नालासोपारा हा परिसर प्राचीन काळान शुर्पारक नगरी नावाने ओळखला जात होता. येथील पूर्णा नावाचा व्यापारी उत्तर प्रदेशात गेल्यावर भगवान गौतम बुद्धांच्या प्रवचनाने प्रभावित झाला आणि त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.

शुर्पारक नगरीत परतल्यावर त्याने एक चंदनाचा स्तूप बांधला होता. या स्तुपात भगवान बुद्ध ७० दिवस राहिले होते. हा स्तूप जमिनीत गाडला गेला होता. १८८२ साली उत्खननात हा स्तूप सापडला होता. हा स्तूप २ हजार ५५९ वर्ष जुना आहे.

सम्राट अशोकाने धम्मप्रसार सुरू केल्यानंतर त्याने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना भिक्कू आणि भिक्कूणी बनवून पाठवले होते. त्यांनीही या स्तुपाला भेट देऊन बौद्ध धम्माच्या प्रसारास सुरुवात केली होती. त्यांनी स्तुपात १४ शिलालेख कोरले होते.

एप्रिल 1882 मध्ये, भगवानलाल इंद्रजी, एक प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ, नाणकशास्त्रज्ञ आणि एपिग्राफिस्ट यांनी सोपाराजवळील मर्देस गावातील बुरुड राजाचे कोट टीला उत्खनन केले. बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडले. स्तूपाच्या मध्यभागी (विटांनी बांधलेल्या खोलीच्या आत) एक मोठा दगडी खजिना उत्खनन करण्यात आला ज्यामध्ये मैत्रेय बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा होत्या.

तिजोरीत तांबे, चांदी, दगड, स्फटिक आणि सोन्याच्या अवशेषांच्या ताबूतांसह असंख्य सोन्याचे फुले आणि भिक्षुकीच्या वाडग्याचे तुकडे होते. गौतमीपुत्र सातकर्णीचे (सातवाहन) चांदीचे नाणेही ढिगाऱ्यातून सापडले.

बॉम्बे प्रांतीय सरकारने सोपारा अवशेष एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेला सादर केले. या प्राचीन शहराच्या जागेवर उत्खननादरम्यान सापडलेली नाणी आणि कलाकृती आजही एशियाटिक सोसायटी, मुंबई संग्रहालयात पाहता येतात.

नालासोपारा हे दिग्गज लोकांचं आणि व्यापाराचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. एके काळचं समृध्द बंदर म्हणून नालासोपारा प्रचलित होतं. मेसोपोटेमिया, इजिप्त, कोचीन, अरेबिया आणि इस्टर्न आफ्रिकेत इथून मालाची आयात निर्यात केली जायची. 500 व्यापाऱ्यांच मालाचं जहाज इथचं यायचं.

शूरवीर लोकांची ही भूमी मानली जायची. बौद्ध साहित्यात सांगितलं जातं की श्रीलंकेचा पहिला राजा विजया याने नालासोपारा मधून अनेकदा श्रीलंकेचा प्रवास केला आहे. 

जैन लेखकांच्या म्हणण्यानुसार श्रीपाल या पौराणिक राजाने सोपार्काचा राजा महासेनची मुलगी टिळकसुंदरी हिच्याशी विवाह केला. नालासोपाराला जैन तीर्थ म्हणूनही ओळखलं जातं. एक गजबजलेलं बंदर म्हणून सुद्धा नालासोपारा प्रसिद्ध आहे. इथ चक्रेश्वर महादेव मंदिर जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे.

अनेक अभ्यासकांनी नालासोपारा या पौराणिक भूमीचा अभ्यास केला आणि नव्याने जगाला ओळख पटवून दिली. त्यामुळे नालासोपाराला हलक्यात घेण्याची चूक करु नका कारण मोठा ऐतिहासीक वारसा या भूमीला लाभलेला आहे.

हे ही वाच भिडू : 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.