आजच्या काळात नर्गिसचं ते वक्तव्य वादग्रस्त ठरलं असतं, पण खुशवंत सिंगांमुळं निभावून गेलं

निर्मळ निखालस मैत्री असेल तर त्याला कोणीही, कसेही नाव ठेवू शकत नाही. कारण या मैत्री मध्ये विश्वासाचा धागा खूप पक्का विणलेला असतो. अशीच निरागस मैत्री होती अभिनेत्री नर्गिस आणि पत्रकार खुशवंत सिंग यांची!

खुशवंत सिंग भारतीय पत्रकारितेमधील एक मोठं नाव. तसेच हिंदी उर्दू आणि इंग्रजी या भाषेवर प्रभुत्व असलेले लेखक. त्यांचे ‘ट्रेन टू पाकिस्तान’ (या फाळणीच्या पार्श्वभूमीवरील कादंबरीवर पामीला रूक्स यांनी नव्वदच्या दशकात एक सिनेमा दिग्दर्शित केला होता!) आणि इतर शेकडो पुस्तके प्रचंड गाजली. जगभर त्यांच्या लेखणीचा मोठा बोलबाला होता.

खुशवंत सिंग यांना १९७४ साली पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. परंतु १९८४ साली ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निषेध करीत हा पुरस्कार त्यांनी परत केला होता. २००७ साली त्यांना ‘पद्म विभूषण’ हा देशातील दुसऱ्या श्रेणीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.

 ते काही काळ भारतीय राज्यसभेचेही सभासद होते. तब्बल ९९ वर्ष आयुर्मान लागलेले (जन्म: २ फेब्रुवारी १९१५ मृत्यू: २० मार्च २०१४) खुशवंत सिंग अतिशय खुश मिसाज जिंदगी जगले! 

मदिरा आणि ललना यांचा मोह त्यांना कायम असायचा.  हे महाशय कायम सुंदर महिलांच्या गराड्यात असायचे. ‘वुमन इन माय लाईफ’, आणि ‘द कंपनी ऑफ वूमन’  ही त्यांची अतिशय गाजलेली पुस्तकं!

हे जरी खरं असलं तरी ते ‘दिल का हिरा’ होते. ज्याच्याशी मैत्री केली त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहीले. राजकारणात त्यांची सर्व पंतप्रधानांशी जवळची मैत्री होती.

अभिनेत्री नर्गिस आणि खुशवंत सिंग यांची ओळख फेमिना या मासिकाच्या संपादक गुलशन एविंग यांनी करून दिली. त्यावेळी खुशवंत सिंग यांची पत्रकारिता शिखरावर होती. नर्गीस यांनी चित्रपटातून संन्यास घेतला होता. सुनील दत्त चित्रपट दुनियेत प्रस्थापित होण्यासाठी संघर्ष करीत होते. दत्त कुटुंबाची दोन्ही मुले संजय आणि प्रिया त्यावेळी कसौली जवळच्या लॉरेन्स स्कूल सनावर या शाळेत शिक्षण घेत होते.

एकेवर्षी त्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमात सर्व पालकांना बोलवण्यात आले होते. नर्गिस यांना ठाऊक होते की, त्यांचे मित्र खुशवंत सिंग यांचे फार्म हाऊस कसौली मध्ये आहे. खुशवंत सिंग दिल्लीमध्ये असल्यामुळे हे फार्महाउस रिकामेच होते.

नर्गिसने खुशवंत सिंग यांना विनंती केली ,”शाळेमध्ये कार्यक्रम आहे, मला काही दिवस कसौलीला राहावे लागणार आहे, मी आपल्या कसौलीच्या घरामध्ये काही दिवस राहू शकते का?”

त्यावर खुश होऊन खुशवंत सिंग यांनी सांगितले, “अवश्य पण माझी एक अट आहे.”

त्यावर नर्गिस यांनी विचारले, “काय?”

तेव्हा खुशवंत सिंग मिश्किल पणे म्हणाले ”तुम्ही माझ्या घरी आठ दिवस राहिल्यानंतर, मी दुनियेला सांगेल की, अभिनेत्री नर्गिस मेरे बिस्तर पे सोई हुई थी!”

खुशवंत यांची मस्करी, विनोदी, मिश्किल स्वभाव नर्गिसला माहीत असल्यामुळे तिने हसत हसत हो म्हटले. यानंतर नर्गिस कसौलीला गेल्या. त्यांच्या घरी राहिल्या.

त्यानंतर एका कार्यक्रमात खुशवंत सिंग, सुनील दत्त आणि नर्गीस एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी तिच्याबाबत बोलताना खुशवंत सिंग डोळा मिचकावून हा किस्सा सांगू लागले, त्या वेळी नर्गीस यांनी हसत हसत त्यांच्या हातून माईक घेवून तो संपूर्ण किस्सा सांगितला आणि म्हणाल्या,

“हां मै खुशवंत सिंगजी के बिस्तर पे सोई हूं!” सर्व सभागृह हास्य रसात बुडून गेले!

मैत्री सच्ची असेल, निरपेक्ष असेल तिथेच असा निरागस विनोद फुलू शकतो!

  • भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.