नरिमन पॉईंट हे नाव इंग्लिश साहेबाचा नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा सांगतं…

मुंबई म्हणल्यावर हजारो गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. समुद्र, लोकल, टोलेजंग इमारती, गर्दी वैगरे वैगरे पण जे लोकं कधीच मुंबईला गेले नाही त्यांना बॉलिवूडने मुंबई दाखवली. जेव्हा एखाद्या सिनेमाचा मुंबईमधला सीन दाखवला जातो तेव्हा सर्वात अगोदर नरिमन पॉइंट दाखवला जातो. कारण एरियाच तसा रॉयल आणि प्रशस्त आहे. थोड्क्यात काय तर नरिमन पॉइंट हा बॉलिवूडमध्ये सगळयात जास्त पाहिला गेलेला स्पॉट आहे.

खुर्शीद नरिमन यांच्या नावावरून या जागेला नाव मिळालं नरिमन पॉइंट.

खुर्शीद नरिमन हे स्वातंत्र्य सैनिक होते, वकील होते. काही काळ मुंबईचे मेयर सुद्धा होते सोबतच ते काँग्रेसचे एक महत्वाचे नेते होते. 1910 च्या उत्तरार्धात आणि 1920 च्या सुरवातीला ब्रिटिशांचा एक महत्वाचा प्रोजेक्ट होणार होता. अरबी समुद्र लोकेशन ठरलं गेलं आणि त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या जमिनीवर प्रोजेक्ट उभा करायचा असा सगळा एकूण प्लॅन होता. त्यांनी त्यांचा महत्त्वाकांक्षी बॅक बे रिक्लॅमेशन सुरू केला. 

हा प्रोजेक्ट जिथं होत होता त्या एरियात चौपाटी बीच, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह आणि सोबतच मुंबईची ठळक वैशिष्ट्ये असलेली तत्कालिन ठिकाणं ती म्हणजे एअर इंडिया बिल्डिंग, ओबेरॉय हॉटेल आणि तारापोरवाला अक्वेरियम या ठिकाणाचा समावेश होता. मेन म्हणजे हा बॅक बे प्रोजेक्ट नक्की काय होता ते पण माहिती पाहिजे.

तर ब्रिटिशांचा प्लॅन होता की 6 किलोमीटर लांबीची समुद्री भिंत बांधयची जेणेकरून 1000 एकर जमीन प्रोजेक्ट्साठी ऊपलब्ध होईल. पण त्यासाठी लागणारा गाळ, माती वैगरे कुठून आणणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. 

पण यावरही सोल्यूशन निघालं ते म्हणजे कांदिवली पासुन 30 किलो मीटर वर असणाऱ्या एका टेकडीवरून हे सगळं उपलब्ध करुन देण्यात आलं. (म्हणजे आता जे लोकं नरिमन पॉईंट एरियात राहून हवा करताय खरंतर ती माती कांदिवलीची आहे) असूद्या. 

ड्रेजर मशीनने गाळ, चिखल काढायला सुरवात झाली. 25 मीलियन क्युबिक यार्ड मधून गाळाचा उपसा करेल अशी ब्रिटिशांची अपेक्षा होती पण त्या ड्रेजर मशीनची उत्खनन क्षमता फारच कमी होती. जितका हवा तितका उपसा होत नव्हता.

त्याच काळात खुर्शिद नरिमन मुंबईत आले होते आणि त्यांना हे शहर प्रचंड आवडलं. एकतर ते स्पष्टवक्ते आणि मुंबईवर जीव असणारे पारसी होते. अशा प्रकारे मुंबई उध्वस्त करणाऱ्या लोकांचा त्यांना आधीपासूनच राग होता. आवडतं शहर उध्वस्त होऊ होऊ द्यायचं नाही हे त्यांनी मनोमन ठरवलं. नरिमन यांनी या प्रोजेक्टच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. बॅक बे बंगल म्हणून त्यांनी घोषणा दिली. ब्रिटिशांच्या अक्षमतेचं आणि भ्रष्टाचाराचं बिंग त्यांनी फोडलं.

यावर बराच वाद निर्माण झाला. एक हजार एकर जमिनीवर दावा करण्याचा ब्रिटिशांचा दावा रखडत ठेवण्यात आला. एका बाजूला काही अंशी प्रोजेक्ट सुमडीत सुरु होता पण खुर्शिद नरिमन यांचा विरोध इतका तीव्र होता की ब्रिटिश अधिकारी सुद्धा त्यांचा धसका घेऊ लागले होते. पुढें ही खुर्शिद नरिमन यांच्या नावाची केस बनली गेली.

शेवटी नरिमन यांच्या आंदोलनातील सक्रियतेमुळे थेट प्रोजेक्टच्या एका भागालाच नरिमन पॉइंट हे नाव मिळालं आणि हेच नाव कायमचं झालं.

नरीमन पॉइंट हे ठिकाण भारतातल व्यावसायिक केंद्रीय स्थळ म्हणून ओळखलं जातं. सगळयात महागडा आणि श्रीमंत स्पॉट म्हणूनही नरिमन पॉइंट ओळखलं जातं कारण व्यापाराच्या दृष्टीने इथ मोठी उलाढाल पाहायला मिळते.

ओबेरॉय हॉटेल पासुन ते सेंट्रल बँक पर्यंत बरच काही या भागात पाहायला मिळतं. नरिमन पॉइंट हे खरतर नाईट लाईफ साठी प्रसिद्ध आहे. बार पासुन ते पब पर्यंत पद्धतशीर विषय इथ असतो. इंडियन एक्स्प्रेस, सेंट्रल बँक, एअर इंडिया, मित्तल टॉवर अशी अनेक मुख्यालये नरिमन पॉइंटला आहे.

एवढा सगळा विस्तार, उलाढाली केवळ एका माणसाच्या आंदोलनामुळे शक्य झाल्या ते म्हणजे खुर्शीद नरिमन.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.