निवडणूक आयुक्त असताना थेट उपमुख्यमंत्र्यांना आचारसंहिताभंग केल्याची नोटीस पाठवली होती.

गोष्ट आहे २०१२ सालची. महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर झाल्या होत्या. दुपारी ३.३० वाजता ही घोषणा झाली आणि राज्यात आचारसंहिता लागू झाली. साधारण ५ च्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार एका उड्डाणपुलाचे भूमीपूजन केले.

म्हणजे या काळात राज्यभर काही कार्यक्रम सुरु होते पण त्यांनी पूर्वपरवानगी घेतली होती. मात्र अजितदादांच्या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती. आचारसंहितेचा भंग झाला होता. निवडणूक आयोगाच्या निदर्शनास हे आणून दिल गेलं.

तेव्हा निवडणूक आयोगाच्या आयुक्त होत्या नीला सत्यनारायण.

त्यांचे काही सहकारी म्हणाले की ही छोटीशी बाब आहे, मोठमोठ्या बाबतीत आचारसंहिता भंग होते, आपण या कडे दुर्लक्ष करू. 

पण  यांनी पुणे महापालिकेला नोटीस पाठवली, पाठोपाठ अजित पवार यांना देखील निवडणूक आयोगाची नोटीस पाठवली आणि स्पष्टीकरण मागवले. खुद्द उपमुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवल्यामुळे राज्यभर वाद निर्माण झाला. पण सत्यनारायण यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता खंबीरपणे प्रकरण हाताळले. अजित पवारांना आचारसंहिता भंग केल्या बद्दल माफी मागावी लागली. आयोगाच्या नियमानुसार त्यांची सुटका झाली.

अजित दादांना आचारसंहिता भंग केल्याबद्दल माफ केलं असा कांगावा करून काही विरोधकांनी गोंधळ देखील घातला. पण नीला सत्यनारायण यांनी अजित पवारांना पाठवलेली नोटीस आणि त्यांचावर झालेली कारवाई दोन्हीदेखील नियमानुसार झाले असल्याचे स्पष्ट केले.

कोणी कितीही मोठा नेता असला तरी निवडणूक आयोगाला विशेषतः महिला अधिकारी आहे म्हणून  म्हणजे दबाव टाकता येणार नाही हे नीला सत्यनारायण यांनी दाखवून दिल, एक आदर्श घालून दिला.

नीला सत्यनारायण या मुळच्या मुंबईच्या. एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुशिला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होत. ते पोलीस खात्यात कार्यरत होते.

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणे, नाशिकमध्ये शालेय शिक्षण व शालान्त परीक्षा दिल्लीमध्ये, असा त्यांचा शालेय जीवनाचा प्रवास झाला. १९६५ साली दिल्लीत बोर्डाच्या परीक्षेत संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून त्या बोर्डात पहिल्या आल्या. त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला.

लहानपणापासून रंगमंचावर काम करण्याच स्वप्न बाळगणाऱ्या नीला सत्यनारायण या नवऱ्याच्या प्रेरणेमुळे प्रशासकीय सेवेची तयारी करू लागल्या आणि १९७२ साली त्या आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र कॅडरमध्ये रुजू झाल्या.

प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर नागपूरपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली.

सेवाकाळात त्यांनी भूषविलेली महत्त्वाची पदे त्यांना थोडी उशीराच मिळाली. त्या काळी प्रशासकीय व्यवस्थेला स्त्री अधिकार्‍यांची सवय नव्हती. त्यामुळे प्रशासनाचा आणि शासनाचा विश्वास संपादन करता करता पहिली काही वर्षे स्वत:ला सिद्ध करण्यात गेली.

समाजकल्याण विभागात त्यांनी केलेल्या कामाची पावती आज अनेक स्वयंसेवी सेवा आणि विविध सामाजिक संस्था त्यांना देतात.

मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वे मार्गावरअपंगांसाठी सदनिका विकत घेऊन त्या अपंग संस्थांना देने, अंधशाळेसाठी परदेशातून वाद्ये मागवून ऑर्केस्ट्रा बनविण्यासाठी निधी उभा करणे अशी कामे त्यांच्या कार्याची साक्ष आहेत.

धारावीमधील उभे राहिलेले लेदरचे सेंटर हाही त्यांच्या अभिमानाचाच एक विषय आहे.

प्रत्येक झोपडीमध्ये जाऊन त्यांनी तेथील लोकांना हा उद्योग मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी उद्युक्त केले होते. आज त्याचे एवढे मोठे स्वरूप झाले आहे की धारावीतील चामड्याच्या वस्तू निर्यात होतात. गृह विभागात असताना कारागृहातील महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण, स्त्रियांसाठी खुले कारागृह करणे तसेच बंदिवानांच्या मुलांसाठी योजना हाती घेणे यासारखी काही उदात्त कामे त्यांनी केली. 

पण नीला सत्यनारायण यांची ओळख एवढ्या पुरती मर्यादित नाही. 

तर त्या मोठ्या कवयत्री, संगीत दिग्दर्शिका, लेखिका होत्या. हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून त्यांनी १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलाला जन्म दिल्यानंतर पालकाला ज्या कटू अनुभवातून जावे लागले आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले त्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे.

प्रशासनाच्या विविध खात्यातून काम करून ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून २००९ साली नीला सत्यनारायण सेवानिवृत्त झाल्या. निवृत्त झाल्यावर त्यांनी सिनेमासाठी गीत लेखन व संगीत दिग्दर्शन या आपल्या आवडीवर लक्ष केंद्रित केलं होतं.

पण अचानक एकदा मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना फोन आला.

मुख्यमंत्र्यांची इच्छा होती कि त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारावी. खर तर नीला सत्यनारायण यांनी अर्ज देखील केला नव्हता. त्या आपल्या निवृत्तीच्या आयुष्यात खुश होत्या. त्यांचा प्रशासकीय अनुभव, त्यांची कामातील सचोटी यामुळे या महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचं नाव देशभर गाजलं.

मागच्या वर्षी त्यांना कोरोनासंसर्ग झाल्यामुळे मुंबईच्या सेव्हन हिल्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे १६ जुलै २०२० रोजी  निधन झाले. एक खंबीर अधिकारीच नाही तर संवेदनशील लेखिका, कवयित्री काळाच्या पडद्याआड गेली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.