गुढ अशा निळावंती पुस्तकाचा दोन वर्ष शोध घेतल्यानंतर हाती सापडलं ते…

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुका आहे. या तालुक्यातल्या एका गावात एका गुरूजींनी निळावंती ग्रॅंथ वाचला आहे अशी माहिती मित्राने दिली. पुढे तो म्हणाला की, सोमवती अमावस्येला ते भूतं काढायची काम करतात. तस त्यांच काम दर अमावस्येला चालतच. अशाच एका अमावस्येला त्या गुरूजींच्या दरबारात पोहचलो. रात्रीचे ११ वाजून गेले होते. गुरूजींच घर शेतात. त्यामुळे वातावरणनिर्मीतीला पुरेसा चान्स मिळालेला. मळ्यातल्या घरापर्यन्त पोहचतोय तोच गाड्यांची गर्दी दिसायला लागली. शेतात दूरदूरवर चारचाकी लावलेल्या. नंबर प्लेट पाहील्यावर कळालं की लोकं सांगली जिल्ह्याबरोबर कोल्हापूर, सोलापूर ते अगदी बीडपर्यन्तची आली आहे.

आत्ता दरबारात पोहचलो.

समोर माणसांची गर्दी. आम्ही गेलो तेव्हा गुरूजींनी त्यांचा उपक्रम चालू केलेला. अरबी भाषेत कन्नड मिक्स केल्यानंतर जी भाषा तयार होईल तशाच काहीश्या उच्चारात समोरच्या गर्दीपुढे गुरूजी मंत्रजाप करत होते. सर्वत्र अंधार होता. हळुच एखादा उठून गुरूजीसमोर जायचा. अंगात भूत आल्यासारखा नाचायचा. गुरूजी त्याला शांत करत होते. तासभर कार्यक्रम झाल्यानंतर ज्यांच्या अंगात भूत आलं होतं ते गेल्याचं डिक्लेर करण्यात आलं. त्यानंतर गुरूजींनी समाजसेवकांच्या मानसिकतेतून गुटखा, मावा बंदीवर चार शब्द ऐकवले. पुढे ते म्हणाले लोक म्हणतात, मी निळावंती वाचला आहे. होय मी वाचलाय. माझ्याकडे आहे तो ग्रॅंथ. स्वत:च गुरूजींनी ते डिक्लेर केलं. खेळ संपला आणि आम्ही घरी आलो.

या गोष्टीला दोन-तीन वर्ष झाली. निळावंती ग्रॅंथाची ती पहिली ओळख.

त्यानंतर निळावंती हे २१ नख्यांच्या कासवांसारखं आहे हे समजायला वेळ लागला नाही. म्हणून नाद सोडला. पण इंटरनेटच्या दूनियेत कुठन तरी या ग्रॅंथाचा संदर्भ मिळायचा. तो सगळा गोळा करत गेलो. करणी करणाऱ्या लोकांपासून ते २१ नख्याच्या कासवापायी जिंदगी घालवणाऱ्या लोकांना निळावंती ग्रॅंथाबद्दल विचारलं आणि हे सगळ एका दमात लिहून काढावं अस ठरवलं.

तर आत्ता निळावंती ग्रॅंथ नेमकी भानगड काय आहे..?

निळावंती नावाचा ग्रॅंथ भास्करभट्ट या माणसाने १६०५-१६०९-१६२५ या सालात लिहला अस सांगतात. आत्ता यातलं नेमकं साल कोणतं तर सोळाशे हा आकडा धरून लोकं पुढची तारीख सांगतात. काही लोकं तो ग्रॅंथ भास्कराचार्यानी लिहला अस सांगतात. पण भास्कराचार्यानी लिलावती लिहला. तो गणितशास्त्राविषयी आहे. निळावंती नावाच वेगळं प्रकरण आहे.

या ग्रॅंथावर भारतात १९३५ सालापासून बंदी आणण्यात आली. तत्कालीन ब्रिटीश शासनाने ती बंदी आणलेली. आत्ता बंदी नेमकी का आणली याचं ठोस कारण नसलं तरी अस सांगण्यात येत की याचा वापर काळ्या जादूसाठी करण्यात येत असल्यानेच बंदी आणण्यात आली. विशेष म्हणजे निळावंती नावाशी संबधित जितक्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींवर सरकारने बंदी आणली अस सांगितलं जातं.

अस काय आहे या पुस्तकात ?

हे पुस्तक वाचल्यानंतर पशु पक्षांची भाषा समजते. हे पशु पक्षी तुम्हाला गुप्तधनाबद्दल माहिती देतात अशी दंतकथा आहे. बर हे पुस्तक सहज वाचलं तर चालत का तर नाही. आयुष्यात थिरर पाहीजे तर कष्ट पण उपसले पाहीजेत. म्हणजे कसं तर हे पुस्तक गरोदर बाई वारल्यानंतर तिला अग्नी दिलेला असतो त्याच प्रकाशात वाचावं अस सांगितलं जातं. तितक्या वेळात हा ग्रॅंथ वाचून पुर्ण केला तर तुम्हाला पशु पक्ष्याच्या सह ८४ लक्ष योनींची भाषा आत्मसात होते. अगदी भूत, प्रेत, पिशाच्च यांच्या भाषा देखील तुम्हाला समजू लागतात अस सांगतात.

पुस्तक वाचत असताना त्यापासून दूर करण्यासाठी अनेक अघोरी शक्ती तुमच्या जवळ येतात. त्यांना न भिता हे पुस्तक वाचून पुर्ण करावे लागते. यात घरातून बाहेर पडणारी निळावंती एकेका प्राण्यासोबत बोलत जाते प्रत्येक प्राण्याची कथा वाचत असताना तो तो प्राणी तुमच्या जवळ येतो व त्याची भाषा तुम्हाला समजू लागते अस सांगण्यात येत.

आत्ता ही निळावंतीची कथा काय आहे ?

कोल्हापूरच्या नवरंग प्रकाशनाने हैबतीबाबा पुसेसावळीकर यांचे आख्यान असणारं पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यामध्ये निळावंतीच्या कथेचा सारांश आहे. लिखित स्वरुपात असणारी ही कदाचित एकमेव गोष्ट असावी. जून्या काळात (जूना म्हणजे अगदी पंधरा वीस वर्षांपुर्वी ) पहाटेच्या वेळी दारात पिंगळा येई. पिंगळा म्हणजे भटक्या समाजातील लोकं जे भविष्य सांगत असत. त्याच्या कथेमधून निळावंतीची कथा परंपरेने पसरत गेली.

त्याचसोबत जेष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांनी बराच काळ या निळावंतीच्या कथेचा आणि पुस्तकाचा शोध घेतल्याचं सांगितलं आहे. दुर्गा भागवत आपल्या प्रासंगिका या पुस्तकात निळावंतीचा उल्लेख करतात. त्या सांगतात की स्वामी विवेकानंदांनी हे पुस्तक वाचलं होतं, त्यामुळेच त्यांना अकाली मरण आल्याची अफवा त्यांनी ऐकली होती. आजही निळावंतीच्या बाबतीच स्वामी विवेकानंद यांनी ते पुस्तक वाचल्यामुळेच अकाली मरण आल्याचं सांगण्यात येतं.

निळावंतीची कथा अशी आहे की,

तीला पशुपक्ष्यांच्या भाषा येत असतात. ती आपल्या माहेरी जात असताना तिला मंगुसाची जोडी दिसते. नर मुंगस आंधळा असल्याचं मादा मुंगूस निळावंतीला सांगते. त्यानंतर निळावंती लाल मणी मुंगसाच्या डोळ्याच्या ठिकाणी लावते. मंगुस हे उपकार विसरणाऱ्यातला नसतो. मादा निळावंतीला ऑफर देते की, मी तूला गुप्त खजिना दाखवते. डोक्यावर मणी असणाऱ्या एका सापाकडे तो खजिना असतो. निळावंती तो मिळवते.

इतक्यावर गप्प बसेल ती निळावंती कसली, तिला खजिन्याचा नाद लागतो. एका रात्री निळावंती घरात झोपलेली असते. बाहेर दूरवर कोल्हेकुई चालू असते. ती निट लक्ष देवून ऐकते तेव्हा कोल्हा म्हणत असतो की नदीतून एक प्रेत वहात येत आहे व त्याच्या कंबरेला सोन्यानाण्याची पिशवी आहे.

निळावंती लगेच कामाला लागते. ती नदीवर जाते. तिथे प्रेत दिसतं. हाताने ती पिशवी काढू लागते पण पिशवी निघत नाही. मग ती तोंडाने ती पिशवी तोडू लागते. इतक्यात आपली बायको रात्रीची उठून कुठ गेली म्हणतं संशयी नवरा तिच्या मागे येतो. ते समोरचं दृश्य बघतो. आपली बायको प्रेत खात आहे असा त्याचा समज होतो. तो बायकोला सोडून देतो. त्यानंतर निळावंती निघून जाते. ती कुठे गेली हे सांगण्यात येत नाही.

आत्ता या कथेवर विश्वास ठेवून काही महाभाग कबुतरांना मारतात. कसे तर त्यांच्या मते कबुतराला पायाखाली चिरडलं तर त्याच्या ओरडण्यामुळे त्याला वाचवण्यासाठी निळावंती येते. म्हणून अंधश्रद्धेतून कबुतराचा जीव घेणारी माणसं आहेत. इथे छोटासं विषयांतर म्हणून सांगतो आमच्या पाळीव कुत्र्याला माणसांची भाषा समजते यावर माझा ठाम विश्वास आहे. मी माझ्या कुत्र्याला एक किलो चिकनच्या बदली निळावंतीला बोलवण्याची अनेकदा ऑफर दिली आहे पण त्याने ती कधीच स्वीकारली नाही.

असो, तर अशी ही निळावंतीची कथा आहे. ही कथा त्या पुस्तकात आहे ती वाचली की विषय कट होत असल्याच्या गोष्टी सांगण्यात येतात. कथेतला ड्रामा सोडला तर कथा पुर्णपणे काल्पनिक आहे हे मानून पुढे जावू.

आत्ता त्या निळावंती ग्रॅंथाबद्दल बोलूया.

खरच ते पुस्तक होतं का तर होतं असेच संदर्भ मिळतात. लोकं ठामपणे सांगतात की ते पुस्तक होतं. बंदी आल्याची माहिती देखील मिळते. पण पुस्तक मात्र कुठेही पहायला मिळत नाही. जे आपल्याकडे पुस्तक असल्याचा दावा करतात ते पुस्तकासोबत एक्स्ट्रा मटेरियर म्हणून पुस्तकाचं कव्हर उघडलं तर वारं सुटलं. कोणतर आपल्यासोबत बोलतय अस वाटलं. पुस्तक नदीला सोडून दिलं. पंचवीस वर्ष पुस्तक बाहेर काढलं नाही. लय वाईट बाबा नादाला लागू नको असा फिल देतात. पण पुस्तक कोणी दाखवत नाही. आत्ता इतकी भिती माणूस कधी घालतो जेव्हा त्याच्याकडे ती गोष्ट नसतेच. पुस्तकाचं पण तसच आहे. कुणाकडे पुस्तक नाही पण भिती घालणारे लोकं पुष्कळ आहेत.

आत्ता आपण काय करावं ?

यावर एकमेव उपाय म्हणजे उद्योग, व्यवसाय करावा. शिकावं. एक पिढी २१ नख्यांच्या कासवापायी वाया गेलेली आम्ही याची देही याची डोळा पाहिलं आहे. समजा पुस्तक असलच तर तुम्ही एवढी रिस्क घेवून वाचणार आहातच काय. आणि,

समजा पुस्तक वाचलं आणि तुम्हाला प्राण्याची भाषा कळू लागली तर गल्लीतलं कुत्र तुम्हाला जाता येता शिव्या देतय हे समजल्यावर मनाला किती वाईट वाटेल.

घरात इज्जत नाहीच पण घरासमोर येणारं डुक्कर पण आपल्याला रांडच्या म्हणून जावू लागलं तर कुठल्या तोंडानं सांगणार. बरं अजून आपण उंदर, घुशी यांचा विचार केलाच नाही. संडासात गेल्यानंतर डोक्यावर असणारी पाल गाणी म्हणू लागली तर कसं होईल. थोडक्यात प्राणीमात्रांची भाषा समजून स्वत:चा उपमान करुन घेण्यात काहीच हासील होणार नाही. आणि तसही कुठलाही मंगूस आपल्याला चल बाळ्या गुप्तधन दाखवतो म्हणून येणार नाही हे पण फिक्सय.

थोडक्यात काम करा पैसे मिळवा. निळावंतीची कथा फक्त दूसऱ्यांना घाबरवण्यासाठी सांगत चला, कारण दूसऱ्यांना घाबरण्याची एक महान संस्कृती देखील आपली आहे हे विसरता कामा नये.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Pratik Jankar says

    माझ्या गावात 1 जन वेडा आहे….तर तो नीळावंती पुस्तक वाचत होता म्हणून वेडा झालय अस लोक म्हणतात

  2. दिनेश says

    खुप छान लेख आहे मजेशीर आहे अजून असे काही गुपित असेल तर नक्की share करा

Leave A Reply

Your email address will not be published.