“निरा” विक्रीच्या दुकानावर “सरकारमान्य” लिहलेलं असतं म्हणून ती दारू : काय असते निरा

उन्हाळ्याच्या दिवसात हायवेला किंवा शहरात ठिकठिकाणी ‘सरकारमान्य’ असं लिहलेल्या नीरा विक्री टपऱ्या उघडायला सुरुवात होते.

आता काही लोकांना वाटतं ही लोकं रस्त्यावर दारू विकतायत का काय. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की, नीरा म्हणजे एक प्रकारची दारूच असते आणि त्यामुळेच सरकारची मान्यता असल्याशिवाय ती विकताही येत नाही. तर काहींचं म्हणणं असतं की, नीरा आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि ती उलट नियमितपणे प्यायलीच पाहिजे.

तर आता नीरा कशी तयार होते? नीरा म्हणजे खरंच दारूचा प्रकार आहे का? आणि नीरा विक्रीसाठी खरच सरकराची परवानगी लागते का ?

सगळ्यात आधी नीरा तयार कशी होते ते बघू

नीरा हे पेय नारळाच्या आणि ताडीच्या झाडापासून बनवलं जातं. झाडाचे फुलोरे बाहेर पडल्यानंतर तिथे कोयत्याने बारीक छिद्र तयार करण्यात येतं. त्यातून मग पाण्यासारखं द्रव बाहेर पडतं. छिद्राखाली मडकं ठेवण्यात येतं. आणि त्यात नीरा जमा होते. 

नीरा काढल्यानंतर काही वेळात आंबून त्याची ताडी बनते. त्यामुळे नीरा झाडावरून काढताना, तामिळनाडूत मडक्यांच्या आतल्या बाजूला चुन्याचा लेप लावतात. तर काही ठिकाणी खालून धूर देण्यात येतो.  

या झाडातून दिवसापेक्षा जास्त रात्रीची नीरा निघते. त्यामुळे नीरा जमविण्यासाठी हे मडकं सूर्यास्तापूर्वी लावलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी काढण्यात येतं. यानंतर नीरेत मिसळलेला चुना काढण्यात येतो.

एका झाडापासून साधारण १ लिटर नीरा तयार होते. सात महिन्याचा सीजन असतो. पावसाळ्यात या झाडाला विश्रांती मिळावी म्हणून नीरा काढण्यात येत नाही.आणि महत्वाचं म्हणजे, निरेत साखरेचं प्रमाण असल्याने काही तासानंतर ती आंबते आणि तिचं रूपांतर ताडीत होतं.

आता ताडी हे मद्य समजलं जातं आणि खरं त्याच्या विक्रीसाठी परवान्याची गरज लागते. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नीरा सोसायटीला विक्रीची परवानगी देते. आणि त्याचनुसार ती सोसायटी किंवा शहरातल्या टपऱ्या किंवा हॉटेल्ससारख्या ठिकाणी विकली जाते. 

नीरेत प्रक्रिया होऊन तिचं ताडीत परिवर्तन होणार नाही याची, दक्षता घेण्यात यावी अशी सूचना विक्री करणाऱ्यांना देण्यात येते. शिवाय नीरा कितीवेळ साठवून ठेवावी यासंदर्भातही काही नियम आखून दिलेले असतात.

दक्षिण भारतातल्या काही राज्यात नीरा विक्री करायला बंदी आणली होती. नीरा काढल्यानंतर त्याच्यावर  प्रक्रिया करण्यात यावी ज्यामुळे त्याचे फर्मनटेशन होणार नाही.त्याच बरोबर पॅकेजिंग अशा प्रकारे जावं की निऱ्यातले पोषक घटक सुद्धा टिकून ठेवता येईल. 

नीरा काढण्यासाठी दिलेल्या परवानगीचा कुणी गैरवापर करायला नको म्हणून उत्पादन शुल्क विभागाने नीराच्या उत्पादनावर देखरेख करायला सुरुवात केलीये. केवळ ‘कोकोनट डेव्हलपमेन्ट बोर्ड’कडे नोंदणी असलेल्या नारळ आणि ताडीच्या उत्पादकांनीच नीरा काढावी असं सांगण्यात आलंय. याच प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा नीरा सोसायट्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांनी परवाना दिलेल्या टपऱ्या, दुकानांना विक्रीची परवानगी दिलेली आहे.  

२०२१ मध्ये राज्य सरकारने नीरेवर नवीन नियम लागू केले 

निरा काढल्यापासून २४ तासांच्या आत त्याचा वापर करावा लागतो. परिणामी, त्यावर प्रक्रिया करून ती ४ डिग्री किंवा त्यापेक्षा कमी सेल्सीयस तापमानात सीलबंद करून अधिक काळ विक्रीसाठी उपलब्ध ठेवता येते.  

बंद बॉटल, पॅकेट मध्ये निरेची विक्री राज्यात कुठेही करता येईल. नीरा उत्पादनाचं ठिकाण किंवा विक्री केंद्र हे १५  किलोमीटरपेक्षा जास्त लांब नसावं असाही नियम घालण्यात आला होता पण तो आता रद्द करण्यात आलाय.

आता पाहूया नीरा पिण्याचे फायदे 

नीरा पिण्याचे बरेच फायदे आहेत. नीरेमुळे डिहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. नीरा प्यायल्याने कॅलरीज अधिक मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर कॅल्शियम, मिनरल्स, फॉस्फरस या सगळ्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होते.

बोल भिडूशी बोलताना डॉक्टर अविनाश भोंडवें म्हणाले, 

नीरा वनसंपत्ती पासून निघणारं द्रव आहे. त्यात अनेक प्रकारचे नैसर्गिक घटकही असतात आणि ते शरीरासाठी चांगले सुद्धा असतात. त्यात मिनरल्स असतात त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात नीरा पिणं चांगलं असतं. नीरा प्यायल्यावर थकवाही दूर होतो. मात्र, इथं मिळणारी नीरा ही किती खात्रीशीर आहे हा खरा प्रश्न आहे. नीरा ६ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवली तर ती आंबते आणि त्याचे अल्कोहोल होतं म्हणजे ताडीत रूपांतर होतं. त्यामुळे ते होता कामा नये. शहरात बरेचदा नीरेत पाणी टाकून डायल्युट करण्यात येतं. पण नीरा, एक- दोन ग्लास घेतल्यास आरोग्यसाठी चांगली असते. 

नीरेपासून गूळ आणि काकवी बनवता येते नीरेच्या एका ग्लाससाठी फक्त १० ते १५ रुपये मोजावे लागतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.