म्हशीच्या पाठीवर बसून गाणी म्हणणारा पोरगा भोजपुरी इंडस्ट्रीचा ज्युबली स्टार बनला….

रिजनल भाषेतले सिनेमे हे जगातल्या कुठल्याही सिनेमाला तोडीस तोड असतात याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आपला मराठीतला फँड्री आणि सैराट. जस मराठीमध्ये आनंद मिलिंद शिंदेंची लोकगीते प्रसिद्ध आहेत तशीच लोकगीते इतर भाषेतही आहेत. मराठी किंवा इतर कोणत्याही भाषिक  सिनेमाच्या तुलनेत आणि रसिकत्वाच्या बाबतीत एक इंडस्ट्री आहे जी सगळ्यांना पुरून उरते ती म्हणजे भोजपुरी इंडस्ट्री.

या लोकांचा एक वेगळाच विषय असतो पण पॉप्युलरीटीच्या बाबतीत यांचा नादच करायचा नाही. हे एवढं सांगायची गरज म्हणजे आजचा किस्सा आहे भोजपुरी सिनेमातला चॉकलेट बॉय निरहुआ अर्थात दिनेश लाल यादव यांच्याबद्दल. निरहुआ हा भोजपुरी सिनेमांचा सलमान खान मानला जातो आणि सिनेमे हिट कसे होतील याचा प्रोड्युसर लोकांचा विश्वास म्हणजे आपल्या सिनेमात निरहुआ पाहिजे. तर जाणून घेऊया या निरहुआ बद्दल.

निरहुआ हा मूळचा यूपीमधील गाझीपूरच्या तांडवा गावचा रहिवासी. लहानपणापासूनच त्याला गाण्याची आणि वादनाची खूप आवड होती. भोजपुरी सिनेमात येण्यापूर्वी ते बिर्हा गायचे. या भोजपुरी सुपरस्टारचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. खूप त्रास सहन करून तो आज या टप्प्यावर पोहोचला आहे. निरहुआ याचे बालपण आर्थिक संकटात गेले असे म्हटले जाते.

त्याचे वडील कोलकाता येथे एका कारखान्यात काम करायचे, तिथे त्यांना फक्त 3500 रुपये मिळायचे. या कमाईतून ते सात लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आर्थिक अडचणींमुळे, निरहुआचे वडील त्यांच्या दोन मुलांसह (दिनेश लाल यादव आणि परवेश लाल यादव) कोलकाता येथे गेले आणि त्यांनी त्यांची पत्नी आणि 3 मुलींना घरी सोडले.

कोलकाता येथे गेल्यानंतर निरहुआ, त्याचे वडील आणि भावाला अतिशय कठीण काळातून जावे लागले. वडील आणि दोन्ही भावांना अनेक दिवस झोपडपट्टीत काढावे लागले. 1997 मध्ये निरहुआ आपल्या वडील आणि भावासोबत परतला, त्यानंतर त्याने आपल्या अभ्यासावर भर देत गाझीपूरच्या मलिकापूर कॉलेजमधून बीकॉम केले.

निरहुआच्या वडिलांची इच्छा होती की त्याने अभ्यास करून आणि लिहून चांगली नोकरी मिळवावी, पण निरहुआचे मन दुसरीकडेच होते. निरहुआवर त्याचा चुलत भाऊ आणि प्रसिद्ध बिर्हा गायक विजय लाल यादव यांचा खूप प्रभाव होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर निरहुआने बिर्हा गाणे सुरू केले. एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आईने सांगितले की,

लहानपणी निरहुला गाण्याची एवढी आवड होती की तो तासनतास म्हशीच्या पाठीवर बसून गात असे. गाण्याच्या वेडापायी अनपेक्षितपणे तो सिनेमात आला आणि कायमचाच हिट झाला.

आम्रपाली दुबेसोबत निरहुआची जोडी भोजपुरी सिनेमात हिट मानली जाते. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये निरहुआशिवाय तो ज्युबली स्टार म्हणूनही प्रसिद्ध आहे. तो 2012 च्या ‘बिग बॉस 6’ मध्ये दिसला होता.

दिनेश लाल यादव यांच्या निरहुआ नावामागेही एक रंजक कथा आहे. खरं तर, 2004 मध्ये त्याचा खुशबू राजसोबतचा ‘निरहुआ सातल रहे’ हा भोजपुरी अल्बम प्रसिद्ध झाला होता. या अल्बमला प्रचंड यश मिळाले आणि यासोबतच त्याने आपल्या नावासमोर निरहुआ जोडले. यानंतर चित्रपटांमध्ये निरहुआ सीरिजचा धुमाकूळ घातला गेला.

निरहुआने 2008 मध्ये ‘निरहुआ रिक्षावाला’मधून भोजपुरी सिनेमाच्या दुनियेत प्रवेश केला. त्याचा चित्रपट सुपरहिट ठरला आणि बघता बघता निरहुआ त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करू लागला. यानंतर निरहुआने मागे वळून पाहिले नाही. भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्याने ‘निरहुआ हिंदुस्तानी’, ‘पटना से पाकिस्तान’, ‘निरहुआ हिंदुस्तानी 2’, ‘बम-बम बोल रहा है काशी और सीमा’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकताच त्याचा ‘निरहुआ चल लंडन’ हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता.

आजही भोजपुरी इंडस्ट्रीचा चेहरा म्हणून निरहुआ फेमस आहे. अनेक हिट सिनेमे निरहुआने दिलेले आहे. मनोज तिवारी, रवी किशन,खेसारी लाल यादव या सगळ्यांना मागे टाकत निरहुआ टॉपचा हिरो बनला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.