नित्यानंद बाबांच्या रिझर्व बॅंकेत अकाऊंट काढण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील

एक काळ होता, साडेसात हजार भरून इबीजमध्ये लोक पैसे गुंतवायचे. लोकांना चांगलाच बांबू लागला. त्यानंतरच्या काळात २१ नख्यांच्या कासवाच वारं आलं. शिकल्या सवरल्याली पोरं पण ओढ्या वघळीत कासवं शोधायला फिरू लागले. जो तो उठायचा आणि CR ची भाषा बोलायचा. कासवापायी जिंदगी बरबाद झाली आणि अडीचशे रुपयांचा फोन आला. पोरांनी इथं पण ट्राय केला. हातात फक्त रिसीट आलं.

तर अशी ही आपली जिंदगी. कोण पण उठतो आणि थुक्का लावून जातो.

असाच एक बाबा आहे. या बाबांच्या मतानुसार सुर्याला आदेश देऊन उशीरा उगवायला सांगितलेलं. ते एक सॉफ्टवेअर विकसित करत आहे ज्यातून गाय, माकड, कुत्री बोलू शकतील. ते पण संस्कृत आणि तामिळमधून.  आत्ता असलं सॉफ्टवेअर घेवून कुत्र लयत लय शिव्या देतय हे माहिती पडलं पण या बाबांना दुनियादारीच्या या बेसिक गोष्टी कोण सांगणार.

असो तर बाबा फेमस आहेत. नित्यानंद बाबांचे व्हिडीओ फेसबुकपासून ते युट्यूबपर्यन्त सगळीकडे व्हायरल होत असतेत. बाबा सध्या फरार आहेत. थोडक्यात बाबा आणि विजय मल्यामध्ये जास्त अंतर नाही.

आत्ता या बाबांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्री कैलासा या आपल्या स्वयंघोषीत देणाच्या रिझर्व बॅंकेची स्थापना केली. फक्त बॅंक स्थापन करुन किडा कसा शांत होईल म्हणून बाबांनी खास कैलासा डॉलर अस स्वत:च्या देशाचं चलन देखील बाजारात आणलं.

आत्ता या असल्या करामती बाबांच्या देशाबद्दल पहिला माहिती घेवुया.

बाबांचा देश कुठे आहे?

कैलासाच्या वेबसाईटनुसार, हा देश त्रिनिदाद आणि टोबॅगो देशांच्या जवळ आहे. बाबा नित्यानंद यांनी दक्षिण अमेरिकेतील देश इक्वॅडोरमध्ये एक बेट विकत घेतले असून या बेटाला स्वतःचा स्वतंत्र देश घोषित केले आहे. तसेच जगभरात पसरलेल्या आणि अन्याय झालेल्या हिंदुसाठी कैलासाला हे राष्ट्र बनवण्यात आल्याचं नित्यानंद यांनी सांगितले आहे.

कार्यकारी मंडळाची निर्मीती ? 

बाबांच्या अंगात किडे असले तरी लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी श्री कैलासा देशामध्ये एखाद्या इतर देशातील व्यवस्थेप्रमाणे विविध सरकारी पदांवर लोकांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, विविध मंत्रालय आणि विभाग तसेच लष्कर प्रमुखांसह इतर पदांचा यात समावेश आहे. नित्यानंद यांनी माँ नावाच्या एका निकटवर्तीयाला पंतप्रधानही नियुक्त केले आहे.

स्वतःची घटना ? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड अभ्यास करून देशाची घटना लिहली. घटना समितीमध्ये असणाऱ्या हूशार व्यक्तींनी याकामी दिवसरात्र एक केला. आणि या नित्यानंद बाबांनी दोन चार महिन्यात स्वत:ची घटना लिहून वेबसाईटवर अपलोड देखील केली. त्यामध्येच विविध माहिती देण्यात आली आहे.

त्यातले काही मुद्दे बघा 

देशाचा झेंडा 

नित्यानंद यांनी स्वतःच्या देशाचा झेंडाही तयार केला आहे. ॠषभध्वज असे या झेंड्याचे नाव ठेवले आहे. त्रिकोनी आकारामध्ये असलेल्या झेंड्यामध्ये स्वतः नित्यानंद यांचा परमशिव अवतारामधील फोटो असून शेजारी शंकराचे वाहन असलेल्या नंदीचा उपासना करत असल्याचा फोटो आहे.

पासपोर्ट 
नित्यानंद यांनी आपल्या देशाचा पासपोर्ट देखील सार्वजनिक केला आहे. ‘पारपत्रम’ असं अधिकृतरित्या पासपोर्टला नाव दिले असून इंग्रजीमध्ये पासपोर्ट असचं म्हंटलं आहे.

राष्ट्रीय चिन्हांची घोषणा :
राष्ट्रीय फूल- कमल
राष्ट्रीय प्राणी – नंदी
राष्ट्रीय चिन्ह – परमशिवा, पराशक्ति, नित्यानंद और नंदी
राष्ट्रीय वृक्ष – वड
राष्ट्रीय बँक- रिझर्व बँक ऑफ कैलासा

नागरिक कोण होवू शकतं ?

ज्या कोणाला या देशाचा नागरिक व्हायचं असेल, तर ते देणगी देवून होवू शकतात. असे सांगण्यात आलं आहे. म्हणजे काय तर पैसा फेको तमाशा देखो असा सरळ साधा विचार आहे. लय लोड घ्यायचा नाही.

तसेच सनातन धर्माची रक्षा करणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे. आमचा हा देश कोणत्याही सीमारेषेशिवाय बनला असून आप-आपल्या देशातुन बेदखल करण्यात आलेल्या जगभरातील तमाम हिंदूसाठी सगळ्यात सुरक्षित जागा असेल अस ही नित्यानंद यांनी सांगितले आहे.

धार्मिक अर्थव्यवस्था 

नित्यानंद यांनी आपली संपुर्ण अर्थव्यवस्था ही धार्मिक अर्थव्यवस्था असेल असे सांगितले आहे. मात्र तिचे स्वरुप कसे असेल याबद्दल सांगितलेले नाही.

तसेच आपल्या देशात जनतेला शिक्षणापासून अगदी जेवणापर्यंतच्या सर्व सुविधा मोफत असतील असेही नित्यानंद यांनी सांगितले आहे.

 

आत्ता बाबाच ऐकायचं बंद करून सरळमार्गी जरा प्रॅक्टीकल बोलुया.

देश तयार करणे हा काही खेळ नाही

एखादे बेट खरेदी करुन किंवा त्यावर हक्क सांगुन स्वतःचा देश घोषित करणं हा काही खेळ नाही. पॅलेस्टाईन दुसऱ्या महायुद्धापासून अजूनही देश बनण्यासाठी झगडत आहे. पण अमेरिकेने परवानगी दिलेली नाही. तर इस्त्रायलयची राजधानी जेरुसेलमला आताशी कुठे जगनमान्यता द्यायला सुरवात केली आहे.

राज्यशास्त्राची व्याख्या सांगते निश्चीत भुप्रदेश, लोकसंख्या, शासनव्यवस्था आणि सार्वभौमत्व या सर्व गोष्टींनी मिळून देश बनतो.

मध्यवर्ती बँकेची स्थापना कधी करता येते ?

देशाच्या सार्वभौम संसदेने मध्यवर्ती बँकेसंदर्भातील कायदा करुन स्थापित करता येते. तसेच त्या बँकेने अधिकृतरित्या निर्गमित केलेले आणि सरकारने विश्वासार्ह चलन म्हणून मान्यता दिल्यानंतरच ते वापरता येते.

आता तुम्ही म्हणाल मग रिझर्व बँक आहे, चलन आहे मग हरकत काय आहे.

तर रिझर्व बँक स्थापन होण्यासाठी आधी सार्वभौम संसद असावी लागते. संसद असण्यासाठी आधी देश असावी लागते. आणि देश असण्यासाठी त्याला ‘युनो’ची मान्यता असावी लागते. आत्ता देशच नाय तर संसद नाय, संसद नाय तर रिझर्व बॅंक नाय आणि बॅंक नाय तर चलन नाय. थोडक्यात काय हा माणूस ई-बीज वाल्यांचा पण बाप निघालाय.

बलात्कारी बाबा 

कर्नाटकमध्ये बलात्काराचे आरोप झाल्यापासून स्वयंघोषित बाबा नित्यानंद फरार आहे. अहमदाबाद पोलिसांनी नित्यानंदच्या बंगल्यावरही शोधमोहिम केली, पण त्यांना तिथे काहीही मिळालं नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की तो सप्टेंबर २०१८ मध्ये नेपाळ मार्गे देश सोडून पळाला आहे. दरम्यान, इंटरपोलशी अजून याबाबत संपर्क साधण्यात आलेला नाही.

आत्ता तुमच्या अंगात लयच कंड असेल तर तुम्ही त्यांच्या देशाच्या वेबसाईटशी संपर्क साधा. ईबीज मध्ये गुंतवणूक केलेली, कासवांच्या मागे हिंडलेलो. गेलाबाजार मामडुळ पण शोधलेलं हे सांगून काय डिस्काऊंट मिळतोय का ते पण बघा

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.