बॉलिवुडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळख असलेली नोरा एकेकाळी सेल्सगर्ल म्हणून कामाला होती….

बॉलिवुडमध्ये एकवेळ पिच्चर डब्यात जाऊ शकतो पण आयटम सॉंग वाजलं पाहिजे या हिशेबात प्रोड्युसर लोकं असतात. मागच्या एकूण दोन तीन वर्षात बॉलिवूडमध्ये आयटम सॉंग हा प्रकार प्रामुख्याने पुढं आलेला दिसतो. आयटम सॉंग म्हणल्यावर हिरोईनसुद्धा जबऱ्या असावी लागते. साकी साकी नावाचं गाणं त्यादिवशी पाहिलं आणि नंतर नंतर ते गाणं लूपवरच वाजत राहिलं आणि नंतर कळलं की त्या आयटम सॉंगवर नाचणारी अभिनेत्री नोरा फतेही आहे. आज घडीला नोरा फतेही काय बवाल डान्सर आहे हे विचारायलाच नको. बेली डान्सच्या प्रकारात तिचा कोणी हात धरू शकत नाही. कोटींमध्ये पेमेंट घेणारी नोरा फतेहीशिवाय बॉलिवुडमध्ये आयटम सॉंग चालण्याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही.

नोराचा एकवेळ अभिनय बाजूला ठेवून डान्स मुव्ह्ज पाहिल्या म्हणजे डायरेक्ट कलेजा खल्लास होण्याचा विषय आहे. एक गाणं you tube ला पडलं रे पडलं की पाच मिनिटात गाण्याला कोटींमध्ये व्हीवज असतात म्हणजे स्टारडम काय लेव्हलच असेल याचा नुसता अंदाज लावत बसा. आता इतकं भयानक काम करणाऱ्या नोरा फतेहीचा स्ट्रगल अजूनच खतरनाक आहे. म्हणजे आजची प्रसिद्ध नोरा फतेही एका बाजूला आणि स्ट्रगल काळातली नोरा एका बाजूला. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सुटल्यावर मॉलमध्ये कामाला जाणाऱ्या नोरा फतेहीचा हा स्ट्रगल किस्सा.

बॉलिवूडसाठी ‘कमरिया’, ‘साकी-साकी’ सारखे सुपरहिट डान्स नंबर देणारी नोरा फतेही आज सगळ्यांची आवडती आहे. ती फार कमी वेळात हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य आणि लोकप्रिय दिवा बनली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी नोराने खूप मेहनत घेतली आहे. पण तुम्हाला माहित नसेल की नोराने तिच्या लहान वयात खूप संघर्ष केला आहे. वयाच्या १६ व्या वर्षी ती एका मॉलमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करत होती.

नोरा फतेही बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मोरोक्कोमध्ये होती. जिथे ती खूप संघर्ष करून आयुष्यात पुढे जायला शिकली. याआधीही तिने तिच्या मानसिक आरोग्याबाबत मीडियासमोर उघडपणे बोलले आहे. म्हणजे बरेच लोकं लाजेखातर आपला स्ट्रगल सांगत नाही मात्र यावर नोरा फतेही बिनधास्त बोलताना दिसते.

एका मुलाखतीत नोरा फतेही म्हणाली होती,

‘माझी पहिली नोकरी एका मॉलमध्ये रिटेल सेल्स असोसिएटची होती, जे माझ्या हायस्कूलच्या अगदी शेजारी होतं, त्यामुळे माझे वर्ग संपले, शाळा सुटली की मी तिथे जायचे. त्यावेळी मी 16 वर्षांची होते. मला अनेक कारणांमुळे काम करावे लागले. माझ्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. घरची परिस्थिती बेताची होती आणि ती बदलण्यासाठी काम करणं गरजेचं होतं.

जेव्हा नोरा मुलाखतीत रडली होती

नोरा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी त्यांच्या मुलाखतींमध्ये त्यांच्या भूतकाळाबद्दल प्रामाणिकपणे बोलतात. काही महिन्यांपूर्वी ब्रुटला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, भारतात आल्यानंतर तिला भाषेच्या बाबतीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हा किस्सा सांगताना नोरा रडू लागली होती. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर तिचे आयुष्य कसे असेल याची स्वप्ने पडल्याचे नोराने सांगितले. ती म्हणाली, ‘मला वाटले की ही हायप लाइफस्टाइल असेल, कारण मी बॉलिवूडमध्ये जात आहे. तसं काही नव्हतं. मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा झटका बसला, तोंडावर सर्वात मोठी थप्पड लागली आणि मी खडबडून जागी झाले.

लोक हसायचे

कॅनडासारख्या विकसित देशातून भारतासारख्या विकसनशील देशात आलेल्या नोरासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते भाषेचे. पण तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती तिच्या हिंदी डिक्शन कोचसोबत तास, दिवस आणि महिने घालवायची पण तिच्या बोलण्याच्या पद्धतीवर हसणाऱ्या लोकांकडून तिला अपमान सहन करावा लागला. ती म्हणाली, ‘तुम्ही जेव्हाही बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा लोक तुमच्यावर हसतील हे तुम्हाला माहीत आहे. हे सहन करणे कठीण आहे. पण नोराने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि कामावर फोकस केलं.

बिग बॉसमधून नोराची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि इथून खऱ्या अर्थाने नोराची जादू दिसायला सुरवात झाली. बडा पछताओगे या गाण्यातून नोरा फतेही प्रत्येकाच्या काळजात जाऊन बसली. म्हणजे आज तरुणाईमध्ये फेमस असलेल्या नेहा कक्करला खऱ्या अर्थाने कोणी फाईट दिली असेल तर ती म्हणजे नोरा फतेहीने. आज तर सोशल मीडियावर डान्सने नोरा फतेही राडा घालताना दिसते. सोशल मीडियावर टॉप 5 फेमस सेलिब्रिटी लोकांमध्ये नोरा फतेहीचं नाव असतं.

शाळकरी वयात सेल्सगर्ल म्हणून कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर वाहणारी नोरा फतेही आज इंटरनॅशनल सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीए भिडू ….!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.