महाराष्ट्राला नव्यानं तमाशाचं वेड नटरंगनंच लावलं होतं

तमाशा. महाराष्ट्राच्या मातीतलं रांगडं तरी तितकंच समृद्ध असं लोकनाट्य. तमाशावर जीव ओवाळून टाकणारी लाखो चाहते आजही भेटतील. गावच्या यात्रा कमिटीत कितीही भांडणं होऊ द्या, रात्रीच्या बारीला कार्यकर्ते  मांडीला मांडी लावून बसतातच. पांढरपेशी समाजाची अश्लील म्हणूनही टीका या लोककलेला सहन करावी लागली.

मात्र या शहरातल्यानी खरा तमाशा पहिलायचं कुठं या आमच्या गावच्या लोकांच्या म्हणण्याला तमाशावरील टीकाकारांना मात्र उत्तर देता आलं नाहीये.

तमाशाला विरोध करणारे आणि त्याची मजा घेणारे यांना एकत्र आणण्याची किमया केली ती नटरंग पिक्चरनं. बाई म्हणू नका की बाप्या सगळे झाडून पिक्चरच्या शो ला गर्दी करत होते. एक काळ असा होता कि महाराष्ट्रातल्या बायका तमाशावर घर फोडल्याचा आरोप करायचा आता मात्र वाजले की बाराला बायकांच्यापण तोंडातून आपसूकचं शिटी निघत होती. मोबाईलवर वाजले कि बारा आणि अप्सरा आली ही दोनच गाणी वाजवणारे पंटर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण बघत असतील.

गणपत पाटलांनी साकारलेली मावशी अख्या महाराष्ट्रानं पहिली होती. मात्र व्यक्तिगत आयुष्यात त्यांना सहन करावी लागणारी कुचंबणा मात्र आपल्याला या निमित्तानं पडद्यावर बघायला मिळाली. 

तमाशातल्या नाच्याची भूमिका रंगवणाऱ्या कलाकारच्या आयुष्याचं वास्तव आनंद यादव यांनी आपल्या ‘नटरंग’ या कादंबरीत रेखाटलं होतं. रवी जाधव यांनी मग ते पडद्यावर मोठ्या खुबीनं मांडलं. 

आपण काहीतरी पुरोगामी विचार मांडत असल्याचा आव नाही की उपदेशाचे डोस नाहीत. मात्र तरीही थर्ड जेंडरबद्दल समजला जो आरसा दाखवायचा होता तो या पिक्चरने दाखवलाच.

अतुल कुलकर्णींनी साकारलेला गुना कागलकर तर आता अभ्यासाचा विषय झालाय. ढोलकीच्या मागं अगदी वेडापिसा झालेला पैलवानलापण लाजवेल अशा धिप्पाड शरीरयष्टीचा गुना. तमाशाची नशा एवढी कि स्वतःचाच फड काढायचा ठरवतो.  त्याची त्या फडतले सगळेच नवखे. मग पांडबाच्या रूपानं भेटणारा त्यांना देवमाणूस. आपल्या जुन्या ओळखी वापरंत मग पांडबाचं यमुनाबाईकडं येणं, तिच्या मुलीला म्हणजेच नैना कोल्हापूरकरला गुणाच्या तमाशासाठी तयार करणं एव्हडं सगळं आपण सगळ्यांनी एन्जॉय केलं. 

मात्र तमाशात येण्यासाठी नैनानं घातलेली नाच्याची अट आणि गुणाचा स्वतःच मावशी बनण्याचा निर्णय पिक्चरचा बाजचं बदलतो. 

पैलवासारखा गुना जेव्हा माणशी म्ह्णून स्टेज वर उभा राहतो तेव्हा आश्चर्य वाटण्याबरोबरच डोळ्यात पाणी पण उभा राहतं.

पांडबा साकारणारे किशोर कदम. नैना कोल्हापूरकर साकारणारी आणि त्यांनतर महाराष्ट्रातील घराघरात अप्सरा म्हणून पोहचलेली सोनाली कुलकर्णी , गुणाच्या बायकोच्या भूमिकेत असणारी विभावरी देशपांडे ही पात्रं आजही डोळ्यसमोर उभी राहतात.

अमृता खानविलकरनं केलेली वाजले कि बारा आज महाराष्ट्राची सगळ्यात फेव्हरेट लावण्यांपैकी एक झालेय.

अजय -अतुल यांनी केलेल्या यांच्या अप्सरा आली आणि वाजले कि बारा याचबरोबर अजून एक मनाला भिडलेलं गाणं म्हणजे खेळ मांडला. गुरु ठाकूरचं शब्द आणि अजय गोगावलेच आवाज असेलंल गाणं अजूनही अंगावर काटा आणतंय. बाकी मध्येच ‘उसवल गणगोत सारं’ म्हणून ओरडणारी जनता वेगळीच.

आजच्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीला २०१०लाच  महाराष्ट्राला तमाशाचा वेड नव्यानं लावणारा नटरंग टॉकीजला प्रदर्शित झाला होता. तुमच्या या पिक्चरबद्दल काही आठवणी असतील तर आम्हाला कंमेंट करून जरूर सांगा.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.