सातासमुद्रापार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत घेऊन जाण्याचा मान जातो तो पलुसकरांना..!

गांधीजींचं रघुपती राघव किंवा “वैष्णवजन तो तेणे कहीये” भजन सगळ्यांना माहित आहे पण या जगप्रसिद्ध भजनाला चाल कुणी लावली होती असं विचारलं तर उत्तर सापडणं अवघड जाईल.

आपल्या मातीतला एक संगीतकार होता, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक पातळीवर पोचवलं आणि जगभरात त्याला मानमर्तब मिळाला. हा माणूस जन्मतः अंध होता मात्र त्यांनी भारताच्या संगीत क्षेत्राला सोन्याचे दिवस दाखवले.

मीरा, कबीर, तुलसीदांसाच्या ज्या ओव्या पुस्तकातच राहिल्या असत्या पण या माणसाने ओव्यांना अजरामर करून सर्वसामान्य माणसाच्या ओठांवर आणल्या. आजही दर हिंदी चित्रपटात आणि सगळ्या उत्तर भारतात एकूण एक देवांची आरती ज्या “जय जगदीश हरे” स्वरात गायली जाते ती चालही याच मराठी माणसाने दिलेली आहे.

वैष्णवजन तो तेणे कहीये याला पहिल्यांदा संगीतबद्ध करून गाणारे व्यक्तिमत्त्वसुद्धा हेच.

त्यांनी त्या काळात जे केल त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत आज जगभरात प्रसिद्ध झाले. आज अनेक देशीविदेशी संगीतकार आणि संगीतप्रेमी लोकांना याची भुरळ पडली आहे. तिकडे परदेशातही भारतीय शास्त्रीय संगीताचे वर्ग सुरू झाले. मोठमोठ्या अकॅडमी निघाल्या आहेत.

पण हे सर्व सहजासहजी मिळालेलं नाही.

त्यामागे भारतीयांची आणि मराठी माणसांची मोठी तपश्चर्या आहे.

याकामी आपलं सर्व जीवन वेचणाऱ्या माणसाचे नाव आहे विष्णू दिगंबर पलुस्कर.

हा माणूस नेत्रहीन होता. कुरुंदवाड गावात कीर्तनात तल्लीन होणाऱ्या दिगंबर पंडितांच्या पोटी 18 ऑगस्ट 1872 साली त्यांचा जन्म झाला.

एकदा गावात दत्तजयंतीचा कार्यक्रम सुरू होता. फटाक्यांची आरास लावलेली होती. कोवळ्या वयाचा लहानगा विष्णू तिथं खेळत होता. फटाके आणि आतिषबाजी सुरू असताना अचानक त्याच्या डोळ्याजवळ भुसनळा फुटला. त्यांच्या डोळ्यांना दुखापत झाली. पोराची दृष्टी गेली
पण बापानं ठरवलं की आपला पोरगा मोठा संगीतविशारद झाला पाहिजे.

पोराला शिकवण्याची इच्छा होती. त्यामुळं शिक्षणही केवळ चौथ्या इयत्तेपर्यंत झालं होतं. त्यावेळी त्यांना बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडे सोपविण्यात आलं.

इचलकरंजीकर हे ग्वालियार घराण्याचे मोठे उस्ताद गायक म्हणून प्रसिद्ध होते. उत्तर भारतात हिंदुस्थानी गायकी प्रसिद्ध होती. आणि दक्षिणेत कर्नाटकी संगीताची वेगळी परंपरा होती. इचलकरंजीकर हे उत्तर भारतीय संगीत परंपरेला महाराष्ट्रात आणून रुजवत त्याला महाराष्ट्राच्या शांतरसाची जोड देणारे पहिले संगीतगुरू म्हणून ओळखले जातात.

हद्दू खान- हस्सु खान यांनी सुरू केलेलं हे घराणे इचलकरंजीकरांनी जपलं आणि त्यातूनच आज इतर सगळी ऊत्तर भारतीय संगीत घराणी सुरू झाली.

मिरजेतच त्यांनी आपली सगळी दीक्षा घेतली. पुढची बारा वर्षे पलुस्कर तिथंच राहिले. त्यांनी आपल्या अपंगत्वावरमात करण्यासाठी संगीताचा आसरा घेतला. 

द्वाड मुलांना शिक्षा द्यायची असेल तर त्यांच्या शेंडीला दोरी बांधून त्यांना रात्रभर ठेवलं जायचं, असे किस्से जुनी माणसं सांगतात. पलुस्कर आपल्या साधनेच्या आड झोप येऊ नये म्हणून खरोखरच असं करत असत.

शिक्षण झाल्यावर त्यांनी धोपटमार्ग शोधण्यासाठी प्रयत्न केला. त्याकाळानुसार संगीत शिकून राजे राजवाड्यांच्या संस्थानात दरबारी संगीतकार म्हणून कामाला लागणे हा ट्रेंड होता. पलुसकरांनी हाही प्रयत्न करून पाहिला.

बडोदा आणि ग्वालियार संस्थानात राहुन संगीतसेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांचं मन त्यात रमलं नाही.

संगीताला तत्कालीन समाजात फार मोजके स्थान दिले जात असे. ही फक्त विलासी लोकांची आणि कोठ्यावरील स्त्रियांची कामे आहेत असे समजले जाई. आपलं संगीत फक्त उच्चवर्गीय श्रीमंत नागरिकांपर्यंत मर्यादित न राहता इथल्या सर्वसामान्य माणसाला अनुभवता आलं पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी एक वेगळाच मार्ग अवलंबला.

तो एवढा क्रांतिकारी होता की फक्त त्यासाठीही भारतीयांनी त्याचे आजन्म ऋणी राहायला हवे.

त्यांनी संपूर्ण भारतात संगीत यात्रा करण्याचा निर्णय घेतला. अंध असतानाही त्यांनी सगळा महाराष्ट्र पालथा घातला होता. औंध-पुणे-मुंबई अशा अनेक जागी त्यांनी आपले कार्यक्रम केले. ते भारतभर फिरले. सातारा, काठवाड, अलिगढ, मथुरा, दिल्ली, जालन्धर, काश्मीर, बिकानेर, भरतपूर, रावळपिंडी, ओकरा असा सगळं भारत त्यांनी पिंजून काढला. शेवटची दोन ठिकाणं तर सध्या पाकिस्तानमध्ये आहेत.

लोकांमध्ये खुलेआम सार्वजनिक ठिकाणी जाऊन कार्यक्रम आयोजित करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. खाजगी मैफिलींची मक्तेदारी असलेल्या संगीताला त्यांनी लोकांपर्यंत आणून पोचवलं.

आज आपण ज्याला कॉन्सर्ट म्हणून ओळखतो त्याचंच हे तत्कालीन रूप म्हटलं तर वावगं ठरू नये. त्याअर्थी भारतात पब्लिक कॉन्सर्ट सुरु करणारे पलुसकर पहिले व्यक्ती ठरतात.

यातून पैसे मिळवणं हे त्यांचं ध्येय कधीच नव्हतं. भारतातील लोकांना शास्त्रीय संगीत शिकता यावं, कमीत कमी खर्चात ते मिळावं ही त्यांची धडपड होती. त्यामुळं त्यांनी संगीताच्या शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. गोरगरीब जनतेच्या मुलांना घेऊन आणि त्यांचे पालनपोषण करून त्यांना शिक्षण द्यायचं ध्येय त्यांनी बाळगलं.

त्यांच्यातून मोठमोठे कलाकार आणि दिग्गज संगीतकार निर्माण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली.

गुजरातेत फिरताना एक साधूने त्यांना पंजाबात जाऊन संगीताचा प्रसार करायला सांगितला. त्यानुसार ते लाहोरमध्ये दाखल झाले. येथील संस्कृती आणि जनता संगीताची आवड जोपासणारी होती.

त्यांनी तिथेच गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हे वर्ष होते १९०१. स्वतः अंध असतानाही त्यांनी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रम आखण्यापासून ते परीक्षा कशी घ्यावी, त्याला मूल्यांकन कसे करावे इथपर्यंत सगळी कामे केली. इतकेच नाही तर कोणत्या पदव्या द्याव्यात हेही ते स्वतःच ठरवत असत. आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सांगीतिक परिषदांचे आयोजन केले.

यात प्रामुख्याने भरणा होता तो गोरगरीब विद्यार्थ्यांचा!

अनेक विद्यार्थ्यांना गायनाची कौशल्ये आणि क्षमता असूनही कष्टाची कामे करावी लागत. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विष्णूबुवांनी आपल्या शिरावर घेतली. गरिबांची पोरं शास्त्रीय संगीताचे गायक झाले पाहिजेत एवढ्याशा ध्यासाने त्यांनी आशा अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्त्रियांना संगीत शिकण्यासाठी मोठी धडपड करावी लागत होती. स्त्रियांना शाळेत बसवून संगीत देणे समाजाच्या रूढीच्या विरोधातच होते. पण विष्णूबुवांसमोर संगीताची सेवा सोडून कोणताही विचार नव्हता. त्यांनी आपल्या घरातून याची सुरुवात केली.

आपल्या पत्नी रमाबाई आणि भाची आंबूताई पटवर्धन यांना संगीताचं शिक्षण दिलं.

त्यांच्याकडे सुसंस्कृत आणि कुलीन घराण्यातील स्त्रियांना बोलावून संगीताचे शिक्षण लोकप्रिय करायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात त्यांनी मुंबईत गांधर्व महाविद्यालयाची एक शाखा फक्त स्त्रियांसाठी सुरू केली.

१९०९ साली लाहोरच्या महाविद्यालयाचा सर्व कारभार मुंबईत हलवला आणि ते इथेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. सॅन्डहर्स्ट रोडवर महाविद्यालयाच्या मालकीची स्वतःची इमारत उभी राहिली.

आजतागायत या व मिरजेतील उपशाखेतून संगीताचे इत्यंभूत शिक्षण दिले जाते.

उत्तरार्धात ते देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनात संगीताच्या उन्नतीसाठी कार्यरत राहिले. “रघुपती राघव राजाराम” या भजनाला त्यांनी सामान्य माणसात लोकप्रिय केले. त्याला चाल लावून पहिले गायन करण्याचा मान विष्णुबुवा यांच्याकडे जातो.

गांधीजींच्या सभेतही ते हे भजन गात असत. हेच भजन पुढे गांधीजींसोबत कायमचे जोडले गेले.

आपल्या दर मैफिल-सभेच्या शेवटी ते वंदे मातरम गाण्याचा आग्रह धरत. आयुष्याच्या शेवटापर्यंत ते आपल्या सभेची सांगता वंदे मातरमने करत. त्याआधी वंदे मातरम वेगळ्या पद्धतीने म्हटले जाई. त्याला सर्वांना म्हणता येईल अशी सोपी आणि कर्णमधुर चाल लावण्याचे काम त्यांनीच केले. आज आपण याच चालीत वंदे मातरम गात असतो.

मधल्या काळात त्यांच्या संस्थेवर आर्थिक अरिष्ट आले. गांधर्व महाविद्यालयाची इमारत कर्जदारांनी लिलावात विकली. वाद्ये दुरूस्ती पासून सगळी कामे करून त्यांनी या संस्थेचे अस्तित्व टिकवून ठेवले.

आपल्या विद्यालयात येऊ न शकणाऱ्या सर्वसामान्य माणसाला संगीताचे ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. जवळपास ६० हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत त्यांनी ग्रंथनिर्मिती केली.

यात स्त्रियांसाठी लिहिलेल्या पुस्तकाचाही समावेश आहे.

आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी संगीत क्षेत्र पादाक्रांत केलं. आपल्या काळात गायल्या जाणाऱ्या अनेक रचना त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. त्यांनी ज्या लिपीत ही पुस्तके लिहिली त्याला पलुस्कर लिपी म्हणूनच ओळखले जाते.

त्यांनी मिरज तेथेच २१ ऑगस्ट १९३१ साली आपला देह ठेवला. त्यांच्या शिष्यांनी आपल्या गुरूचा वारसा सुरू ठेवला आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.