पलंगतोड पानात खरच दम असतोय का…?

एक पान असतय ते पलंग तोडतय. होय हे खरय, 

काल एक मिस्त्री सांगत होता. म्हणला, 

“पलिकडच्या गल्लीत एकाच नवीन लग्न झालतं. त्यानं पलंगतोड पान खाल्ल. लग्नात आलेला नवाकोरा पलंग मोडला. रुखवतात आलेला माहेरचा पलंग तुटलेला तरी नवरी खुष होती..मी दूसरा नवा कोरा पलंग करुन दिला. म्हणून हे मलाच माहिताय. पण तुम्ही कोणाला सांगू नका..”

अस करत त्यानं नव्या जोडप्याचा अख्या गल्लीत बाजार मांडला. कट्ट्यावरची पोरं म्हणली गड्यानं पलंगतोड पान खाल्त म्हणून अस झालं. 

हे सगळं ऐकून सगळी गल्ली लाजत होती पण दोन माणसं प्रचंड खूष होती. एकतर  ती नवरी आणि दूसरा मी. आत्ता मी का तर मला एक नवीन विषय मिळालेला…. 

आजचा विषय हाच पलंगतोड पानात खरचं दम असतोय का..? 

आत्ता ही पलंगतोड पानाची भानगड ज्यांना माहिती नाही त्यांनी जावून पोगो बघा वगैरे चाळे आपण करणार नाही. आपण व्यवस्थित पलंगतोड पानाची माहिती सांगणार. तर हे पलंगतोड पान महाराष्ट्रात फेमस केलं ते म्हणे औरंगाबादच्या तारा पान शॉप वाल्याने. त्याच्याकडे ५ हजाराला पलंगतोड पान मिळतं.

ते पान खायचं आणि घरी जायचं. ५ हजारात हिमालय फिरून येतय. चांगलच गरगर फिरवयत. तस रिमझिम वगैरे पानं पण गरगर फिरवतेत पण हे पलंगतोड पान जोडीनं फिरवतय. हमखास खात्री, पटकन रिझल्ट म्हणून हे पान खपतय. नवं लग्न झालेली तर आपली ताकद दाखवायला हे पान हमखास घेत असतेत.

आत्ता ही झाली बेसिक माहिती पण खरच या पानात दम असतोय का? की उगी फेकाफेकी असते? 

याबद्दल आम्ही काही पानपट्टीवाल्यांना, काही ग्राहकांना डावात घेण्याचा प्रयत्न केला. पुण्यातल्या ज्या पानपट्ट्यांमध्ये हे पान मिळतय त्यांना गोड बोलून पलंगतोड पान मिळतय का ते विचारलं. पहिला नाय वो तसलं काय नसतय म्हणून आमची तोंड बघून त्यांनी आम्हाला कटवलं पण लयच लाडात गेल्यावर ५०० रुपये किंमत सांगितली. आम्ही पैसे दिले पान घेतलं.

पानात रेग्युलर मसालाच होता. सध्या सिंगल असल्याने पान खायचं धाडस झालं नाही… ते तसच जपून ठेवलय. पण पानात काय टाकलय हे सांगायला पानपट्टीवाले तयार नव्हते… 

मग म्हणलं ग्राहकांना विचारावं. पण एक ग्राहक थांबायला तयार नायत वो. पान घेतला की बुंग्ग.. कधी एकदा घरी जातोय अस त्यांना झालेलं अशा वेळी पलंगतोड पान खावून आमच्याशी कसा कोण बोलल. 

आत्ता शेवटचा उपाय तो म्हणजे मोठ्या माणसांना विचारू. मग आमच्या संपर्कातल्या डॉ. रोहित गुरनाळे यांना फोन लावला. त्यांना विचारलं पलंगतोड पानाची भानगड काय असते. त्यावर ते बोलले, 

आयुर्वेदात अस कुठलच औषध नाही ज्यामुळे लगेच, तात्काळ कामेच्छा जागी होईल. पलंगतोड पानासोबतच काही औषध, काही गोळ्या, काही तेल लोकं देतात पण अशा गोष्टींचे साईड इफेक्ट जास्त असतात. बऱ्यापैकी स्टेरॉइडचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे सवय लागते. नाही म्हणायला आयुर्वेदात अश्वगंधा, शतावरी, मकरध्वज सारखी औषधे सांगितली आहेत पण त्यांचा लगेच इफेक्ट होत नाही.. सिक्रेट फॉर्म्युला म्हणजे एकप्रकारची फसवणुकच आहे… 

थोडक्यात आयुर्वेदिक डॉक्टरांनी कन्फर्मेशन दिलं की यात आयुर्वेदातला कोणताही पदार्थ टाकत नाहीत, किंवा असा पदार्थ आयुर्वेदात तरी नाही. मग हे व्हायग्रा वगैरे टाकत असतील काय? प्रश्न तसा गंभीर होता. याचं उत्तर एखादे ॲलोपॅथिवाले चांगले डॉक्टरच देवू शकतात. 

म्हणून इंडियन मेडिकल असोशिएशन ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सरांना फोन लावला. त्यांना न लाजता विचारलं. हे पलंगतोड पान विकलं जातय, यात काय असतय..? 

तेव्हा त्यांनी सांगितलं, 

हा फसवणुकीचाच प्रकार असू शकतो. यात काही असलच तर एखादा अंमली पदार्थ असू शकतो. ज्यामुळे नशा येते, उत्तेजीत वाटतं. काही तासात नशा येते आणि नंतर तो परिणाम जातो. पण या सगळ्या प्रोसेस नंतर पुन्हा पुन्हा तो घ्यावासा वाटतो आणि त्यातून व्यसन लागतं. उत्साह वाढवण्यासाठी पलंगतोड पानात काय असतं याची माहिती अन्न व औषध विभागाने घ्यायला हवीय. लोकांनी पण अशा गोष्टींच्या नादाला लागू नये.. 

म्हणजे काय तर चटकन रिझल्ट, पटनक हलकं वगैरे अस काही नसतय. असलच तर एखादी नशा असण्याची शक्यता आहे. आणि हे अभ्यासू लोकांनी सांगितलय. मग उपाय काय तर डॉक्टर. न लाजता काय प्रॉब्लेम आला तर डॉक्टरकडं जायचं. लक्षात ठेवा डॉक्टर डॉक्टर असतो आणि पानपट्टीवाला पानपट्टीवाला… उगी महत्वाची गोष्ट पानपट्टीवाल्याच्या भरोवशावर सोडणं म्हणजे आपल्या भावी पिढ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रकार आहे… 

असो आमच्यासारख्या पलंगतोड पान मिळूनही उपयोग नसणाऱ्या मुलांसाठी नेमाडे आजोबांची एक ओळ सांगून विषय मिटवतो, 

ओळ अशीए… 

ही न मिळो ती मिळेल, ती न मिळो जी मिळेल लाख पोरी आहेत मर्दा कोणी एक मिळेल.. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.