देख रहा है ना बिनोद, इंजिनिअरिंग सोडून एनएसडीमध्ये गेलेला माणूस आज मोठा स्टार झालाय…

पंचायतचा दुसरा सिझन येऊन तीन महिने होत आले; पण अजूनही सिरीजबद्दल भरभरून बोलण्यात येतंय. त्यातल्या सचिवजींचा रोल करणारा अभिषेक त्रिपाठी, प्रधानजी, प्रल्हाद जोशी, मंजू जोशी यांची तर चर्चा झालीच, पण त्याच बरोबर ‘देख रहा है ना बिनोद’ असं म्हणणाऱ्या दुर्गेश कुमारची वेगळ्याच लेव्हलला हवा होतीये. 

गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक आठवून बघा. निवडणुकीत एकजण हरलेला असतो. तो कार्यकर्ता पुढची पाच वर्ष सरपंचासहित सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना सळो की पळो करून सोडत असतो. पंचायत २ मध्ये हेच काम भूषणनं म्हणजेच दुर्गेश कुमार यांनी केलं आहे.

पंचायत सिरीज जशी जशी पुढे जाते तशी भूषण उर्फ दुर्गेश कुमार यांची ऍक्टिंग भावत जाते. सुरुवातीला भूषण प्रधानजी आणि मंजू देवी यांना बराच त्रास देतो. गावात रस्ता व्हावा म्हणून सचिवजीच्या डोक्याचा भुगा करतो. अधेमध्ये प्रधानजी यांच्या जवळच्या उपसचिव प्रल्हाद पांडे आणि विकासला सुद्धा सुट्टी देत नाही. 

यामुळे भूषण दिसला तरीही या सगळ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत असते.   

तसेच यानंतर भूषणच्या टार्गेटवर येतात ते म्हणजे सचिवजी. तुम्ही प्रधानच्या ताटाखालचं मांजर झाला आहात असं म्हणून तो त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतर सचिवजी भूषणचा बदला घेण्याच्या तयारीत असतात. 

यावेळी ग्रामपंचायत मध्ये विकास सचिवजीला म्हणतो, “अभिषेक सर हा भूषण एक नंबरचा बनराकस माणूस आहे.” या सिरीजमधले बिनोद आणि भूषणमधले संवाद सगळ्यांच्याच लक्षात राहिले आहेत.

पण भूषणचा रोल गाजवणाऱ्या आणि ईडा मळत मळत देख रहा है ना बिनोद म्हणणाऱ्या, दुर्गेश कुमार यांची स्टोरी काय आहे…  

दुर्गेश कुमार हे मूळचे बिहार मधील दरभंगा येथील आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, त्यांनी स्टेबल लाईफ जगावी. २०११ मध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी दिल्ली गाठली. तिथं त्यांनी इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं.

मात्र ऍडमिशन घेतल्यानंतर काही दिवसांतच त्यांना वाटलं की, इंजिनियरींग करणं हे काही आपले काम नाही. त्यामुळे दुर्गेश कुमार यांनी इंजिनियरिंग सोडण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट दुर्गेश यांनी केमिस्ट्रीचे प्राध्यापक असणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला सांगितली. 

त्यावेळी दुर्गेश यांच्या भावाने सांगितले की, “तुला जर नाटक आवडत असेल तर तू ते का करत नाहीस? दिवसा कॉलेजला जात जा आणि रात्री नाटकाची प्रॅक्टिस करत जा.” यानंतर दुर्गेश कुमार यांनी शिक्षण आणि थिएटर दोन्ही सोबत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिंदी विषय घेऊन डिग्री पूर्ण केली. 

पण नाटकाचं वेड काही स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळं दुर्गेश यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित अशा नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश मिळविला. नॅशनल स्कुल ड्रामामधून पास होऊन ९ वर्ष होऊनही दुर्गेश कुमार मात्र अजूनही आपण स्ट्रगलर असल्याचं सांगतात.

दुर्गेश यांना ब्रेक मिळाला तो, इम्तियाझ अली यांच्या हायवेमध्ये. हायवेच्या सेटवर त्यांनी डान्स शिकण्याची इच्छा बोलून दाखवली आणि थेट रणदीप हूडासोबत ते डान्सही शिकले. २०१४ मध्ये आलेल्या शुरुवात का इंटरव्हल नावाच्या पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं होतं. मात्र त्यांच्या कामाची चर्चा फार काही झाली नाही. यानंतर दुर्गेश कुमार यांनी कँडी, बिच्छू का खेल, बहुत हुवा सन्मान सारख्या वेब सिरीज करूनही त्यांना काम मिळवण्यासाठी ऑडिशन द्याव्या लागायच्या. 

त्यांना कधीच डायरेक्ट रोल मिळाला नाही. अनेक नकार पचवावे लागले. सतत कधीच काम मिळायचं  नाही. त्यात त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहावं लागायचं. हा त्यांच्यासाठी मोठा इश्यू होता. पण कितीही संकटं आली, तरी त्यांचं कुटुंब त्यांच्यामागं ठामपणे उभं राहीलं.  

त्यानंतर त्यांची निवड झाली पंचायत सिरीजसाठी. पण त्यांना वाटले की, इतर पिक्चर, वेब सिरीज प्रमाणे लहान रोल असेल. मात्र त्यांना चांगला रोल मिळाला होता. त्यात त्यांनी केलेला भूषणचा रोल सगळ्यांना आवडला.  

त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं की, “सगळ्यांमध्ये एक भूषण लपलेला असतो. मात्र लोक तो बाहेर आणत नाही.”

 दुर्गेश सांगतात, “नवाझुद्दीन सिद्दीकी हे माझं रोल मॉडेल आहेत. नवाझुद्दीन आणि माझ्यात बरंच साम्य आहे, आमच्या दोघांचं नशीब सारखं असून बॉलिवूडमध्ये दोघांनाही उशिरा चान्स मिळालाय.” 

कोणताही मोठा ऍक्टर न घेता, मारामारी, खून, अश्लीलता न दाखवता वेब सिरीज हिट करून दाखवतात येते हे पंचायतनं दाखवून दिलं आणि बॉडी, रंग, रुप याच्यापलीकडे जाऊन कामातून स्वतःला सिद्ध करता येऊ शकतंय, हे दुर्गेश कुमार यांनी दाखवून दिलंय.

म्हणूनच म्हणलं, देख रहा है ना बिनोद, इंजिनिअरिंग सोडून एनएसडीमध्ये गेलेला माणूस आज मोठा स्टार झालाय…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.