जसा १५ ऑगस्टला तिरंगा पिक्चर तसाच एकादशीला, ‘पंढरीची वारी’
काही कलाकृती रसिक प्रेक्षक फक्त पाहत नाहीत. तर या कलाकृती त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन बसतात.जेव्हा एखादा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो, तेव्हा तो सिनेमा घडण्यामागची मेहनत प्रेक्षकांना ठाऊक नसते.
आज आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या अगदी जवळचा असलेला सिनेमा अर्थात ‘पंढरीची वारी’ बद्दल.
‘पंढरीची वारी’ ला अशी झाली सुरुवात
झालं असं की, अभिनेत्री रंजना, अशोक सराफ, नाना पाटेकर यांच्या ‘नागिन’ सिनेमानंतर निर्माते अण्णासाहेब घाटगे आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागले. ‘कुलवंताची लेक’ असं सिनेमाचं नाव होतं. सिनेमाची टीम सर्व पुण्यात होती. दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचं घर सुद्धा पुण्यातच होतं. त्यामुळे निर्माते अण्णासाहेब घाटगेंचं कवठेकरांच्या घरी येणंजाणं होतं.
एकदा घरी जेवायचा बेत केला असताना कवठेकरांच्या पत्नी, सिनेमासाठी एक कथा आहे असं अण्णासाहेबांना म्हणाल्या. कथा चांगली असल्यास त्यावर नक्कीच सिनेमा करु, असं प्रत्युत्तर अण्णासाहेबांनी दिलं. हि कथा लिहिली होती मराठी नाटक आणि सिनेसृष्टीतले हरहुन्नरी आणि विनोदी कलाकार शरद तळवलकर यांनी. कथेचं नाव होतं ‘पंढरीचा चोर’. हि कथा रमाकांत कवठेकरांना माहित असल्याने त्यांनी अण्णासाहेबांना ऐकवली.
कथा ऐकुन अण्णासाहेब भारावुन गेले. त्यांना कथा खुप आवडली होती.
त्यांनी त्याक्षणी, आपण सध्या जो सिनेमा करतोय तो पुढे ढकलु आणि त्याआधी ‘पंढरीचा चोर’ कथेवर सिनेमा करु, असं रमाकांत यांना सांगीतलं. अण्णासाहेबांनी कवठेकरांच्या पत्नीकरवी शरद तळवलकरांच्या भेटीची वेळ ठरवुन घेतली. शरद तळवलकरांच्या घरी अण्णासाहेब आणि इतर मंडळी पोहोचली. कवठेकरांच्या पत्नीने, या मंडळींना ‘पंढरीचा चोर’ कथेवर सिनेमा करण्याची इच्छा आहे, असं शरदजींना सांगीतलं.
हे ऐकताच शरदजी हसले. हि कथा पाच ते सहा निर्माते घेऊन गेले पण सिनेमा करण्यात खुप अडथळे येतात, म्हणुन मला हि कथा पुन्हा आणुन दिलीय. त्यामुळे तुम्ही योग्य तो विचार करुन निर्णय घ्या, असं शरदजींनी सगळ्यांना सांगीतलं. परंतु सर्वांनी या कथेवर सिनेमा करण्याचा ठाम निर्णय शरदजींना सांगीतला.
अण्णासाहेबांनी शरदजींना हि कथा आळंदीच्या मंदिरात देण्याची विनंती केली. दिग्दर्शक रमाकांत कवठेकरांनी ‘पंढरीचा चोर’ ऐवजी ‘पंढरीची वारी’ हे सिनेमाचं टायटल सुचवलं. शरदजींना टायटल आवडलं. पुढे थोड्याच दिवसात आळंदीच्या धार्मिक वातावरणात शरदजींकडुन ‘पंढरीची वारी’ हि कथा घेण्यात आली.
प्रमुख कलाकारांची अचानक एक्झिट
आळंदीला अशोक सराफ, रंजना, राजा गोसावी अशा प्रमुख कलाकारांसोबत असंख्य वारक-यांच्या भक्तीमय वातावरणात सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होणार होती. सर्व कलाकार आणि सिनेमाचं संपुर्ण युनीट मात्र दुभंगलेलं मन सावरत काम करत होते. कारण शुटींग सुरु होण्याआधी एक दुःखद बातमी सर्वांना कळाली होती. ‘पंढरीची वारी’चा नायक अभिनेते अरुण सरनाईक यांचं शुटींगला येताना अपघातात निधन झालं. जेव्हा पहिला शाॅट ओके झाला तेव्हा मात्र सगळ्यांच्या भावनांचा बांध फुटला.
निर्माता म्हणुन अण्णासाहेब घाटगेंना हि बातमी ऐकुन धक्काच बसला होता. पण त्या दिवसाचं शुटींग जर रद्द केलं तर पुढचं एक वर्ष थांबावं लागणार होतं. त्यामुळे शुटींग सुरु करणं, हिच अरुणजींना खरी श्रद्धांजली अशी भावना सर्वांनी मनात ठेवली आणि मुहूर्ताचा शाॅट चित्रीत झाला.
अरुणजी गेल्यानंतर त्यांच्या तोडीचा अभिनेता सिनेमाला मिळणं, हे एक आव्हानात्मक काम म्हणता होतं. शेवटी अनेक अभिनेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पुढे श्रीकांत मोघे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. परंतु काही कारणास्तव श्रीकांतजींना सुद्धा सिनेमा सोडावा लागला. पुन्हा एकदा प्रमुख भुमिकेसाठी कलाकार शोधण्याची मोहीम सुरु झाली.
शेवटी बाळ धुरी या कलाकाराचं नाव या भूमिकेसाठी पक्कं झालं. बाळ धुरी यांनी ख-या अर्थाने या भुमिकेचं सोनं केलं.
सर्व सुरळित सुरु होतं. ७०% सिनेमा शूट करुन पूर्ण झाला होता. आणि याच दरम्यान अभिनेत्री रंजना यांचा अपघात झाला. पुन्हा ‘पंढरीची वारी’ रखडली. तब्बल तीन वर्ष रंजना अपघातातून ठणठणीत होण्याची वाट सिनेमाच्या टीमने आणि विशेषतः निर्माते अण्णासाहेबांनी पाहिली. परंतु रंजना पुर्ण ब-या होऊ शकल्या नाहीत. अण्णासाहेब तरीही खचले नाहीत.
त्यांनी चिकाटीने ‘पंढरीची वारी’ सिनेमा पुन्हा सुरु करायचा ठरवला. रंजनाऐवजी अभिनेत्री जयश्री गडकर यांची वर्णी लागली. आणि निम्म्याहून जास्त सिनेमा रिशूट करण्यात आला.
‘पंढरीच्या वारी’त काम केल्यावर अपघात होतात, अशी चर्चा
‘पंढरीच्या वारी’च्या मुहूर्तालाच अरुण सरनाईक यांचं निधन, रंजनाचा अपघात अशा दुर्दैवी घटना संपुर्ण युनिटला अनुभवायला मिळाल्या. काही दिवसानंतर सिनेमात विशेष भूमिकेत असलेल्या अशोक सराफ यांचाही अपघात झाला. यामुळे चार महिने शूटींग पुन्हा थांबलं. सातत्याने होत असणा-या दुर्देवी घटनांमुळे ‘पंढरीची वारी’त काम केल्यानंतर अपघात होतात, अशी चर्चा त्या वेळी सिनेवर्तुळात होती.
१८ लाखांचं झालं नुकसान
या सर्व गोष्टींमुळे ‘पंढरीची वारी’ सिनेमामागचं दुष्टचक्र काही केल्या संपत नव्हतं. खुप दुर्दैवी घटना घडल्या. यामुळे सिनेमाचे निर्माते असलेल्या अण्णासाहेब घाटगेंना १८ लाखांचं नुकसान सहन करावं लागलं. १९८८-८९ साली हे नुकसान फार मोठं होतं. वाट्याला आलेलं आर्थिक आणि मानसिक नुकसान अण्णासाहेबांनी सहन केलं.
आणि ‘पंढरीची वारी’ अखेर पुर्ण झाली.
एखादा ध्यास मनात बाळगणं, आणि त्या दृष्टीने झपाटल्यासारखं काम करणारी फार कमी माणसं पाहायला मिळतात. अण्णासाहेब घाटगे अशा माणसांपैकीच एक म्हणावे लागतील. सिनेमाचा निर्माता म्हणुन त्यांनी अनेक दुःख पचवली आणि चिकाटीने त्यांनी सिनेमा पूर्ण केला. २६ जानेवारी १९८९ साली हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
आळंदी ते पंढरपूर अशी वारी शूट करण्यासाठी दोन कॅमेरा सेटअप आणि दोन युनीट काम करत होते. या सिनेमाच्या निमित्ताने भजनसम्राट अनुप जलोटा यांनी मराठी सिनेमात प्रथमच अभंग गायन केले. हे गाणं सिनेमात त्यांच्यावरच चित्रीत झालं आहे. ‘पंढरीची वारी’ हा पहिला सिनेमा आहे, जो पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभा-यात शूट झाला आहे. पं. भीमसेन जोशी यांनी सिनेमात गायलेल्या अभंगाला सुरसिंगार अकादमीचा पुरस्कार लाभला आहे.
अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील ‘धरीला पंढरीचा चोर’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. ‘सामाजिक प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा’ म्हणुन महाराष्ट्र राज्याचा सन्मान ‘पंढरीच्या वारी’ला प्राप्त झाला.
आषाढी एकादशी आणि ‘पंढरीची वारी’ या सिनेमाचं एक न तुटणारं समीकरण म्हणता येईल. कारण दरवर्षी आषाढी एकादशीला हा सिनेमा टी.व्ही. चॅनलवर आवर्जुन दाखवला जातो. निर्माते म्हणुन अण्णासाहेब घाटगे, दिग्दर्शक रमाकांत कवठेकर आणि सिनेमाच्या संपुर्ण टीमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. या सिनेमाशी जोडलेल्या प्रत्येकाने ‘पंढरीची वारी’ हि ख-या अर्थाने जगली.
- भिडू देवेंद्र जाधव
हे ही वाच भिडू
- औरंगजेबाचा हल्ला झाला तेव्हा पाटलांनी विठोबाला आपल्या विहिरीत लपवल होतं.
- दुर्दैवाने स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पाटलांनी ३५ फुटांवरून मारलेली उडी आपणाला माहित नाही
- मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकिय पुजेचा मान कधीपासून मिळू लागला.. ?