देशात पहिल्यांदा मोबाईल फोनवर बोललेल्या नेत्याचं निधन झालं..

पंडित सुखराम शर्मा यांच्या निधनाची आज बातमी आली. पंडित सुखराम शर्मा हे नाव पटकन आठवावं अस विशेष काही नाही. जरासा डोक्याला ताण दिला अन् त्या काळात तुम्ही तरुण असाल तर हा CBI च्या धाडीत यांच नाव आलं होतं हे आठवेल.

१९९६ साली CBI ने त्यांच्या घरावर धाड टाकून साडेचार कोटींची रक्कम जप्त केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. १९९३ ते १९९६ या काळात पंडित सुखराम शर्मा हे भारताचे दूरसंचार मंत्री होते. मात्र या धाडीनंतर कॉंग्रेसपक्षातून त्यांची हकालपट्टी देखील झाली. घोटाळेबाज नेता अशी त्यांची ओळख झाली ती त्यांच्या मृत्यूनंतर देखील कायम राहिली.

पण याहून त्यांची एक अजब कामगिरी आहे..

अन् ती म्हणजे भारतातला पहिला मोबाईल बाळगणारी व्यक्ती, अन् भारतातला पहिला फोनवर बोललेला व्यक्ती. पण तूम्ही म्हणाल त्यांच्याकडे पहिला मोबाईल होता. पहिल्यांदा ते मोबाईलवरून बोलले पण समोर कोणतरी असेल नं. थोडीच एकटे बोलणार आहेत. तर समोर बोलणारे व्यक्ती पण होते, अन् ते होते बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू..

गोष्टीची सुरवात होते ती पंडित सुखराम यांच्यापासून…

दूरसंचार मंत्री म्हणून पंडित सुखराम एकदा जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी मोबाईल फोन पाहिला. मोबाईल हे प्रकरणचं त्यांना इंटरेस्टिंग वाटलं. इथे टेलिफोनसाठी घरातच थांबाव लागत होतं अशा काळात वायर नसणारा हा फोन घेवून फिरता येवू शकतं ही गोष्टचं प्रचंड इंटरेस्टिंग वाटत होती..

दूससंचार मंत्री भारतात परत आले पण डोक्यातलं मोबाईलचं खुळ जातं नव्हतं. दूसरीकडे भारताच्या वेगवेगळ्या भागात तंत्रज्ञानाची आवड असणारे, तंत्रज्ञानाला पाठबळ देणारे पुढारी देखील मोबाईलबद्दल ऐकून होते. त्यांचे देखील या दिशेने प्रयत्न चालू होते.

साल होतं १९९४..

या काळात एकूण आठ कंपन्यांनी मोबाईलसेवा देण्यासाठी केंद्रिय दूरसंचार खात्याकडे अर्ज केले होते. यातलीच एक कंपनी होती मोदी टेल्ट्रा…

या कंपनीचे चेअरमन होते बी.के.मोदी..

या बी.के. मोदी आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे चांगले संबंध होते. ते अनेकदा सहज गप्पा मारण्यासाठी भेटत असत.

१९९४ साली ज्योती बसू यांनी अशाच सहज गप्पा मारण्यासाठी बी.के.मोदींना कलकत्त्यातल्या रायटर्स बिल्डिंगच्या सचिवालयात बोलवलं होतं. नेहमीसारख्या गप्पा रंगल्यानंतर बी.के.मोदींनी ज्योती बसूंना एक ऑफर दिली.

त्यांनी बसूंना सांगितलं की भारतातलं पहिलं मोबाईल नेटवर्क सिटी म्हणून आपण कोलकत्ता बनवू शकतो. बसूंनी ही ऑफर स्वीकारली. त्यानंतर मोदींनी हे मिशन मनावर घेतलं आणि त्यासाठी नोकियासोबत भागिदारी केली.

दूसरीकडे मोबाईल यावेत म्हणून केंद्रीय दूरसंचार खात्याचे मंत्री पंडीत सुखराम काम करत होते. दूरसंचार मंत्रालयाकडून १९९४ मध्ये मोबाईल सेवा देण्यासाठी कंपन्याकडून अर्ज मागवण्यात आले होते. यातच एक कंपनी मोदी टेल्स्ट्राचा देखील समावेश होता. 

३१ जूलै १९९५

या दिवशी ज्योती बसूंना भेटण्यासाठी बी.के. मोदी गेले. मात्र यावेळी ते पुर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे नोकियाचा २११० हा मोबाईल फोन होता. कोलकत्ता येथे त्यांच्या कंपनीने मोबाईल सेवा देण्याची तयारी पुर्ण केली होती. आत्ता फक्त पहिला फोन लावून सोपस्कार पुर्ण करण्याची गरज राहिली होती.

बी.के.मोदींनी आपल्याकडचा फोन बसू यांच्याकडे सुपूर्त केला आणि ज्योती बसूंनी पहिला फोन तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांना लावला. मंत्री सुखराम यांच्याकडे देखील एक मोबाईल पोहच करण्यात आला होता. अशा प्रकारे देशात पहिल्यांदा मोबाईलवरून दोन व्यक्तींमध्ये संभाषण पुर्ण झाले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.