कालीनभैय्या : पंकज त्रिपाठी एकदा म्हणालेला काम अस करायचं की ‘यादगार’ पाहीजे..

मसान मधला साध्याजी, वासेपुरमधला सुल्तान कुरेशी, स्त्री मधला रुद्रा, फुकरे मधला पंडीत, न्यूटन मधला आत्मासिंग,सिक्रेड गेममधला गुरूजी आणि मिर्जापूरमधला कालीनभैय्या. कोणत्याही भूमिकेत बघा हा माणूस बाप वाटतो. गोची देणारा गुरू असो नायतर कालीनभैय्या, पंकज त्रिपाठी नेहमीच बाप एक्टिंग करतो हे फिक्स..

तसा पंकज त्रिपाठी लय जवळचा माणूस.

कारण काय तर तो पण गावातला आणि आम्ही पण गावातले. गावातलं असलं की सगळीकडं एक कॉमन गोष्ट असते. ती म्हणजे शहरात यायचं. कुठेतरी मोठ्या व्याख्यानाला जायचं आणि वेळ आली की लगेच हात करुन प्रश्न विचारायचा.

प्रश्न काहीपण असो सुरवात एकच, 

“सर मी ग्रामीण भागातून येतो, वगैरे वगैरे.”

काहीतरी करायचं असतं. पंकज त्रिपाठी त्या कॅटेगरीतला आहे. गाव, शेतकरी बाप. तिथून पटना तिथून दिल्ली आणि नंतर मुंबई. या सगळ्या प्रवासात कुठतरी आपल्याला शोधणं आणि गावाचं असणं हे दोन्ही राहतं. 

पंकज त्रिपाठी बिहारच्या गोपालगंजचा. म्हणजे सांगायला गोपालगंज. गोपालगंज पासून दूर असणाऱ्या बेलसा गावाचा हा पोरगा. तिथपण मळ्यात राहणारा. घराच्या समोर नदी आणि आजूबाजूला शेती. मळ्यातलं छोटस घर. त्याचे वडिल पूजारी आणि शेतकरी.

गावात असताना पंकज त्रिपाठी शाखेत जायचा. शाखेचे संस्कार त्याला मिळाले होते. 

१० वी त्याला चांगले मार्क मिळाले. इतके चांगले की आत्ता शहराच्या ठिकाणी ११ वी १२ वी केली की पोरगा डॉक्टर होण्याची शक्यता निर्माण झाली.

झालं पंकज त्रिपाठीचा मोर्चा वळला तो पटणाच्या दिशेने. 

पटणा शहरात त्याने ॲडमिशन घेतलं. ध्येय कसं फिक्स होतं. १२ वीला चांगले मार्क पाडायचे आणि डॉक्टर व्हायचं.

एकच ग्रुप ठेवलेला. पण सायन्स असतं इंग्लिशमधनं. आपल्यापैकी निम्मी पोरं इथ गळपटतात. मग आपली ताकद दाखवण्यासाठी वेगळा विषय लागतो. पंकज त्रिपाठी सायन्स कळत नाही म्हणून ABVP त गेला. तिथं सुख होतं.

दिवसभर आंदोलन, मोर्चे, नेतागिरी सोबत असायची. पंकजच हिंदी भारी. बोलायला नाद कोण करायचं नाही. मग नेता ठरलेल्या ठिकाणी येण्यापुर्वी आलेल्या गर्दिच मनोरंजन करणारे काही खतरनाक वक्ते असतात. पंकज ते करू लागला. नेता येण्यापुर्वी गर्दी ताब्यात ठेवण्यासाठी भाषण देण्याची जबाबदारी त्याच्यावर यायची. 

या काळात मोर्चात सक्रिय सहभाग तो नोंदवायचा.

तेव्हा बिहारमध्ये लालू राज चालू होतं. पंकजला ABVP मार्फत आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये जायला लागलं. अशातच १२ वीचा निकाल पण लागलेला. निकाल काय लागला असेल वेगळं सांगायची गरज नाही. अशी मुलं पास होतात पण ग्रुप कॉलीफाय होत नाहीत. 

आत्ता विचार करायची वेळ होती. आपण नेता होईल का असा विचार त्याने केला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काहीतरी करायचं आहे म्हणून नेत्याची हुजरेगिरी करण्यात अर्थ नाही. आत्ता काय करायचं. मग पठ्यानं शोधाशोध चालू केली.

त्या काळात स्ट्रिट प्ले करत असताना. तो थेट कम्युनिस्ट पोरांबरोबर नाटक केलं. तात्पुरती एक नाटक केलं आणि उत्तम प्रेक्षक झाला.

रोज एक नाटक बघून काढायचं काम या पंकज त्रिपाठीने केलं. एका नाटकात छोटी भूमिका केली. ती पण चोराची. पण त्या नाटकाचं परिणाम असा झाला की एका छोट्या पेपरात छोट कात्रण लागलं. हा काळ होता १९९७ च्या आसपासचा.

नाटकं सुरू झाली आणि तेव्हा सत्या पिक्चरमधून मनोज वाजपेयी चमकला. भिकू म्हात्रे आपल्या गावचा. जवळचा माणूस पण काय भारी ॲक्टिंग करतो. आत्ता ॲक्टिंगमध्ये घुसायचं आणि राडा करायच. 

स्वत: मोठ्ठा फिल्मस्टार होण्याची स्वप्न घेवून हा नाटकं करु लागलां. हे कधीपर्यन्त तर २००१ पर्यन्त. तेव्हा पंकज त्रिपाठीला वाटलं की आपण नाटकाच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला पाहीजे. दोन तीन वेळा ट्राय केल्यानंतर तो दिल्लीच्या NSD ला सिलेक्ट झाला. 

2001 ते 2004 या काळात तो NSD मध्ये होता. त्या काळात एकाने सांगितलं 50 रुपये देतो पिक्चरमध्ये काम करणार का? पिक्चर होता रन. अभिषेक बच्चनचा पिक्चर. त्यातल्या कौव्वा बिर्याणी खालेल्या विजयराजला तो गंगा म्हणून गटारीत डुबकी घ्यायला लावतो. हा सीन बघितला तर तुमच्या लक्षात येईल तो आवाज पण पंकज त्रिपाठीचा नाही. फक्त छोटा रोल होता. 

2004 ला तो परत पटण्याला गेला. दरम्यानच्या काळात लग्न झालेलं. पटण्यात नाटक करायचं, गावाकडं जावून क्रांन्ती करायची स्वप्न होतं. पण गावाकडं गेलं की गावासारखं होतं. नवीन करण्यासारखं इथे काही मिळत नव्हतं. मग त्याने विचार केला मुंबईला जावू. 

तारिख होती १६ ऑक्टोंबर २००४. 

या दिवशी पंकज त्रिपाठी मुंबईत आला. इथे एक गंम्मत होती ती. बच्चन पासून शाहरूख पर्यन्त सगळेजण सिंगल आलेले. पंकज स्ट्रगल करायला बायकोला घेवून आला होता. रेल्वेच्या डब्यात तो आणि बायको आणि मागच्या डब्यात पातेली, कुकर, चटई अस सामान. 

पंकज बायकोसोबत मुंबई सेंट्रलला उतरला.

उतरल्या उतरल्या तो प्लॅटफॉर्मच्या पाया पडला. त्याला एका मित्रानं सांगितलेलं की अंधेरीतल्या माझ्या घरी ये. झालं अस की मुंबईत उतरून फोन लावायला लागल्यानंतर फोन बंद लागला. मुंबईस सुरवात झाली. तरिपण मित्राच्या पत्यावर जावू म्हणून त्याने रिक्षा केली. मध्येमध्ये कॉईनबॉक्स दिसायचा तिथं थांबायचा आणि फोन ट्राय करायचा. 

संध्याकाळ होत आली पण मित्राचा पत्ता नाही. आत्ता काय करायचं. शेवटचा ट्राय म्हणून फोन लावला आणि लागला. मित्र चांगला निघाला. पुढचे दोन महिने पंकज त्रिपाठी, त्याची बायको दोघांचा मुक्काम मित्राच्या घरीच होता. 

या दरम्यान पंकजच्या बायकोने लोकल शाळेत नोकरी पकडली. पंकज दिवसभर वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसला जायचा. नेमका कुठं जायचा तर करण जोहर आणि यशराज च्या ऑफिसला. मग राम गोपाल वर्माच्या गेटवर थांबलेला दूसरा स्ट्रगलर त्याला सांगायचा. आपल्या लोकांसाठी राम गोपाल आहे. तिकडं तूला घेत नसतेत. हळुहळु काम मिळू लागलं. काम काय तर टाटा टि ची जाहिरात, कमर्शियल अॅड, एखादी टिव्ही सिरियल. 

ओंकारामध्ये किचलू म्हणून छोटा रोल मिळाला, अपहरण मध्ये पंकज त्रिपाठी होता. टिव्हीवर गुलाल सिरीयल आली त्यात पंकज होता. रावण, आक्रोश, चिल्लर पार्टी अशा पिक्चरमध्ये छोटमोठ्ठं काम चालू होतं. 

अशातच त्याला कश्यपच्या वासेपूर बद्दल कळलं. वासेपूरचं पण सगळं कास्टिंग झालं होतं. कश्यपच्या कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडांना फोन लावला.

ते म्हणाले ठिकाय, ये तरी बघू. 

यानं ऑडिशन दिलं. मुकेश छाबडाने ते कश्यपला दाखवलं. कश्यपने पंकज त्रिपाठीला रिजेक्ट केलं. पण छाबडांचा जोर होता. कश्यपने बहुमत घेतलं तेव्हा सुलतान साठी पंकज ठिक आहे अस उत्तर मिळालं. जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा पण कुठून आणला अशाच भावना कश्यपच्या असायच्या. पण हळुहळु सुल्तानचा सीन वाढला. पिक्चर रिलीज झाला.  पिक्चर रिलीज झाल्याच्या रात्रीबद्दल पंकज सांगतो, त्या रात्री कश्यपचा फोन आला. तो म्हणाला सगळे तूझा नंबर मागत आहेत. खूप भारी काम केलयस. एकामागून एक फोन येत गेले. 

बजेट छोटं असणारा फुकरे रिलीज झाला.

यातला पंडीतजीचा रोल हिट झाला. सिंघम रिटर्न सारख्या पिक्चरमध्ये रोल केला. पण म्हणावं तस घडत नव्हतं. नंतर आला तो मसान. त्या पिक्चरमध्ये सध्याजीचा कमी असणारा रोल त्याने एका उंचीवर नेवून ठेवला. 

मनोज वाजेपेयीकड बघून तो इथं आलेला. हळुहळु पंकज त्रिपाठीचा कॉईन वाजला. एकामागून एक रोल मिळाले आणि पंकज त्रिपाठी नावाचा ब्रॅण्ड झाला. एका मुलाखतीत त्याला विचारलं होतं तुझ्यासोबत तुझे PA, मॅनेंजर, सोशल मिडीया मॅनेंजर अशी लोक का नसतात.

PR करुन काय करु. चर्चित रहायचं नाही यादगार रहायचं आहे. चर्चित आणि यादगार मधला साधा फरक ओळखणारा पंकज त्रिपाठी. शाखा, ABVP, नेत्यापुढे भाषण, स्ट्रिट प्ले, दिल्ली NSD, मुंबई आणि आत्ता कुठे धक्याला लागलेला कालीनभैय्या. तो नेहमीच यादगार राहणार आहे हे नक्की.

 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.