फ्री कॉलिंग आत्ता आलंय, पण रुपयाची किंमत शिकवणाऱ्या पीसीओचा नाद नव्हता…
मध्यंतरी सीए परीक्षेचा निकाल लागला, आमच्या पाव्हण्यातलं एक पोरगं पहिल्या अटेम्प्टला सीए झालं. फॅमिली ग्रुपवर धडाधड मेसेज, सगळ्यांचे स्टेटस, फुल अभिनंदन सोहळा रंगला होता. त्याचा निकाल बघून घरच्यांकडून आमची निघायची ती मापं निघून झाली. पण आपल्या रिझल्टमुळं कुणाची मापं कधी निघाली नाहीत.
कारण ज्या काळात आपलं डोकं चालायचं, तेव्हा स्टेटस ठेवायला व्हाटसअप नव्हतं. तेव्हा आपलाच रिझल्ट ऐकायला घराजवळचा पीसीओ गाठावा लागायचा. आजच्या घडीलाही पीसीओ असते, तर सीएच्या रिझल्टमुळं आपल्याला वाईट वाटायचं कारण नव्हतं.
तुम्हाला आतापर्यंत अंदाज आला असेल की विषय एसटीडी किंवा टेलिफोन बूथचा आहे. फक्त गावातलाच नाही, तर कित्येक शहरांमधला संवाद एकेकाळी या एसटीडी आणि पीसीओमुळंच जिवंत राहिलाय. पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात लिहिलेली नावं, कधी मिनिट संपायच्या आत कॉईन बॉक्समध्ये रुपया टाकायची गडबड, तर कधी बिलाकडं लक्ष देऊन फोनवर घाईत घाईत बोलणं, त्या टेलिफोन बूथवरुन इंटरनॅशनल कॉल करणारा एकही गडी उभ्या आयुष्यात पाहिला नाय, पण ती सोय सुद्धा होती.
पण एसटीडी बूथवर लिहिलेल्या STD, ISD, PCO यांचा अर्थ काय असायचा ? हे तिन्ही प्रकार काम कसं करायचे ? हे बूथ सगळ्या भारतात पसरले कुणामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टेलिफोन बूथचं पुढं काय झालं..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
पिवळ्या बोर्डावर काळ्या अक्षरात लिहिलेल्या शब्दांचा अर्थ आधी जाणून घेऊ. STD म्हणजे काय, तर स्बस्क्राइबर्स ट्रंक डायलिंग. ही सिस्टीम होती आंतरराज्य कॉल्ससाठी. तुम्ही पिक्चरमध्ये वैगेरे पाहिलं असेल, की हिरॉईनशी बोलायला हिरो ऑपरेटरला फोन करायचा, मग तो तिकडं लाईन जोडायला बघायचा, यांचा फोन कनेक्ट होईपर्यंत शाकालची एंट्री व्हायची.
या असल्या कॉलिंगचं सुधारित व्हर्जन म्हणजे एसटीडी कॉल्स, जिथं ऑपरेटरची मदत न घेता आपल्याला थेट फोन करता यायचे. आजही आपण फोन नंबरच्या आधी ०२० सारखे एसटीडी कोड लावत असतोय. फोन बूथवरुन केलेल्या या एसटीडी कॉलचं फोन झाला की लगेच छापील बिल यायचं.
पुढचा शब्द म्हणजे ISD म्हणजेच इंटरनॅशनल स्बस्क्राइबर्स डायलिंग. थोडक्यात भारताच्या बाहेर फोन लावायचा झालाच, तर ही सिस्टीम वापरायची. इनकमिंगला पैसे पडायच्या दिवसात इंटरनॅशनल कॉल म्हणजे लईच मोठा विषय होता. पैसे मजबूत जायचे पण सातासमुद्रापार गेलेल्या आपल्याच माणसांचा आवाज ऐकण्यापुढं त्याचं एवढं काय वाटायचं नाय. आता व्हिडीओ कॉलच्या जमान्यात सगळं सोप्प झालेलं असताना, या इंटरनॅशनल कॉलचा स्ट्रगल कॉल करण्याऱ्यांनाच माहिती.
तिसरा आणि आपल्या जिव्हाळ्याचा विषय, पीसीओ, म्हणजेच पब्लिक कॉल ऑफिस. एक पिवळ्या रंगाचा डब्बा फोन असायचा, नंतर त्याची जागा लाल कॉईन बॉक्सनं घेतली.
यात राज्यातल्या राज्यात फोन करता यायचा, काही फोनमध्ये एसटीडी कॉल करायची सुविधाही असायची. एक रुपया टाकला की मिनिटभर बोलता यायचं. पुढं जाऊन हे टेलिफोन बूथ बंद झाले, तेव्हाही या लाल डब्ब्यांची जादू कायम राहिली.
कित्येकांनी यात एक एक रुपया टाकून प्रेमप्रकरणं रंगवली, बाहेर गावी शिकायला गेलेलं पोरगं किंवा पोरगी निवांत आहे, हे कित्येक आईबापांना या लाल डब्ब्यामुळंच समजलं. थोडक्यात घरात किंवा हातात मोबाईल असणं ही गोष्ट जेव्हा श्रीमंती वाटायची, तेव्हा आपल्याला आधार या पीसीओनंच दिला होता.
पण फक्त शहरंच नाही तर खेडेगावातल्या कोपऱ्यांमध्ये हे टेलिफोन बूथ पोहोचले कसे?
तर यामागं राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा यांची दूरदृष्टी होती. १९८४ मध्ये या जोडीनं सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजेच सी-डॉटची स्थापना केली. या सी-डॉटचं मिशन होतं, की देशातल्या टेलिकॉम क्षेत्राचा विस्तार करायचा. ग्रामीण भागातही टेलिकॉम सर्व्हिस पोहोचवायची, तरुणांच्या गुणकौशल्यांना संधी द्यायची आणि कनेक्टिव्हीटीच्या आधारानं देशाला जोडायचं.
याच सी-डॉट अंतर्गत १९८९ मध्ये देशात पीसीओ किंवा एसटीडी बूथची सुरुवात झाली. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता सरकारनं प्रायव्हेट कंपन्यांनाही यात उतरायला लावलं आणि एका १० बाय ५ च्या खुराड्यातल्या टेलिफोननं सगळा देश आपापसात जोडला.
या टेलिफोन बूथची आणखी एक गोष्ट होती, ते म्हणजे इथं असणारी माणसं.
खरं काही काही ऑपरेटर्स खडूस असायचे, पण कित्येक जण लई भारी होते. म्हणजे कुणाकडं फोन करायला रुपया नसला, तरी ते हसत हसत आपल्याकडचा रुपया द्यायचे. आपण आपल्या नटीला फोन करायला त्यांच्याकडं जाऊनही ते कधीच घरच्यांना काय सांगायचे नाहीत, कुणाची आपुलकीनं चौकशी करायचे, तर कुणाचा फोन आला की आठवणीनं नंबर लिहून ठेवायचे.
पुढं सरकारनं एक स्कीम आणत दिव्यांगजनांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावं म्हणून टेलिफोन बूथचं वाटप करताना प्राधान्य द्यायचं ठरवलं. बूथवरुन होणाऱ्या कॉलिंगचे चार्जेस असायचे, त्यातून बूथचालकांना कमिशन मिळायचं.
कालांतरानं हे टेलिफोन बूथ लई मागे पडले आणि यावर उदरनिर्वाह चालवणाऱ्या लोकांनी पीसीओचा डब्बा एका कोपऱ्यात ठेवत झेरॉक्सचं मशिन, प्रिंटर आणत साईड बिझनेस सुरू केला. काही जणांनी थोडी डेअरिंग दाखवत सायबर कॅफे सुरू केलं, पण पुढं जाऊन सायबर कॅफेचं जहाजही बुडालं.
मग याची जागा घेतली जनरल स्टोअर आणि टपऱ्यांनी. त्यामुळं दुकानात लेझच्या पाकीटापासून, रिचार्जचं कुपन आणि सिगरेट पण मिळते, पण बाहेरच्या काळ्या पिवळ्या बोर्डावर थाटात STD, ISD, PCO लिहिलेलं असतंय आणि कोपऱ्यातला लाल कॉईन बॉक्स अडगळीत गेलेला असतोय.
एका जमान्यात सुपरहिट असणाऱ्या या टेलिफोन बूथवर अशी वेळ का आली ?
तुम्ही म्हणाल भिडू कारण सगळ्यांच्या हातात मोबाईल आले म्हणून. पण त्याही आधी २००३ मध्ये जेव्हा बीएसएनएलनं कॉलिंगचे दर अगदी चार रुपयांपर्यंत खाली उतरवले तेव्हा, टेलिफोन बूथला चांगलाच फटका बसला. पुढं मोबाईलचं प्रस्थ वाढू लागल्यावर आणि काही पैशात फोनवर बोलणं शक्य झाल्यानंतर कॉईन बॉक्समध्ये रुपया टाकणंही कित्येकांना जड वाटू लागलं.
आता पीसीओ, एसटीडी आऊटडेटेड झालेत. एखाद्या ठिकाणी असलेच, तरी भेटायची खूण म्हणून हे बूथ लक्षात राहिलेत, काही काही रेल्वे स्टेशनवर मात्र या बूथचं अस्तित्व आजही टिकून आहे.
कधी खिडकीतून त्यांच्याकडे नजर जाते आणि लहानपणी टाचा उंचावून केलेल्या कॉलपासून आजूबाजूला बघत केलेल्या चोरट्या गप्पांपर्यंत सगळं काही आठवतं. आज भले मोबाईलवरुन फ्री कॉलिंग करता येत असलं, तरी एका रुपयाची खरी किंमत शिकवणारे टेलीफोन बूथ मात्र कायम लक्षात राहतील, हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- कधी विचार केलाय का? रॉकेल कुठं गेलं..?
- पबजीच्याही आधी दोन पिढ्यांची मेहबूबा GTA Vice City होती…
- आज बुडाखाली सुपरबाईक आली असली, तरी गाड्या पळवण्यातलं खरं सुख ‘रोडरॅश’मध्ये होतं