83 मध्ये “मानभाईंनां” जसं दाखवलय, त्याहून त्यांच खरं आयुष्य लयच भारी होतं..

“आझादी मिल के ३५ साल हो गये कप्तान, लेकिन इज्जत कमाना अभी बाकी है.” ८३ पिक्चरमध्ये पंकज त्रिपाठी रणवीर सिंगला हा डायलॉग मारतो, तेव्हा शप्पथ अंगावर काटा येतो. त्या पिक्चरमध्ये रणवीर सिंगनं कपिल देवचं कॅरॅक्टर अक्षरश: जगलंय.

रणवीर सोबतच अभिनेता पंकज त्रिपाठीनंही आपलं काम अगदी चोख केलं. त्याच्या कामाची पावती म्हणजे, पिक्चरमध्ये अंगावर काटा आणणाऱ्या क्रिकेट मॅचेस असूनही आपण ‘पीआर मान सिंग’ यांनाच लक्षात ठेवतो.

८३ च्या त्या वर्ल्डकप विजेत्या टीमचे लाडके मॅनेजर ‘मानभाई’ लाइमलाईटमध्ये यायला आपल्याला पिक्चरची वाट पाहावी लागली, हे खरंतर आपलं दुर्दैव आहे.

पण मानभाई माणूस म्हणून इतके वाढीव होते, की पंकज त्रिपाठीच्या जागी खुद्द त्यांनी काम केलं असतं, तरी पिक्चर हिट झाला असता.

मानभाईंची स्टोरी सुरू होते, हैदराबादमध्ये. त्यांचे पप्पा रामसिंग अग्रवाल आणि कुटुंब मेरठमध्ये होतं. मात्र आपल्या भावाच्या व्यवसायामुळं रामसिंग अग्रवाल सिकंदराबादला आले आणि तिथलेच झाले. रामसिंग अग्रवाल माणूस हुशार.

काळाची पावलं ओळखून त्यांनी स्वतःचं वाईन शॉप टाकलं. 

घरात बऱ्यापैकी पैसे होते, बॅकअप होता, पण वाहवत न जाता मानसिंग यांनी क्रिकेटर बनायचा निर्णय घेतला. या मधल्या काळात त्यांचं अग्रवाल आडनाव मात्र गायब झालं.

त्याचं झालं असं की, दहावीच्या परीक्षेआधी त्यांच्या शिक्षकांनी त्यांचं नाव लिहिताना मूळ गाव ‘पौंड्री’ मधला पी घेतला, वडिलांच्या रामसिंग नावातला आर घेतला आणि पीआर मानसिंग असं नाव लिहिलं. मानभाईंना हे नाव चिकटलं ते कायमचंच.

सध्याच्या भारतीय क्रिकेटमध्ये जसा मुंबई, कर्नाटक, तमिळनाडूचा बोलबाला आहे, तसा त्याकाळात हैदराबादचा होता. तंत्रशुद्ध बॅट्समन्सची खाण हैदराबादमध्ये होती. त्यामुळं हैदराबादच्या टीममध्ये खेळायला मिळालं तरी मोठी गोष्ट असायची. मानभाईंची हैदराबादच्या टीममध्ये निवड झाली खरी. पण त्यांना प्रत्यक्ष खेळायची संधी फार कमी मिळाली.

नुसतं टीमसोबत फिरण्यात आणि बेंचवर बसण्यात काय मजा नव्हती. अशावेळी हैदराबाद क्रिकेटचे तेव्हाचे सर्वेसर्वा आणि भारताचे माजी कर्णधार गुलाम अहमद यांनी मानभाईंना एक सल्ला दिला,

ते म्हणाले, “अरे मियाँ तुम्हे ग्यारा में तो चान्स नहीं मिल रहा. कबतक ऐसे बैठे रहोगे? होशियार हो तो मॅनेजमेंट में ट्राय करोना.”

मानभाई गुलाम अहमद यांना गुरु मानायचे, त्यामुळं नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी काही काळासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अहमद यांच्यासोबत काम केलं. पुढं अहमद बीसीसीआयमध्ये गेले आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनची सूत्र मानभाईंनी सांभाळली.

मानभाईंचं काम बघून त्यांना थेट बीसीसीआयमधून बोलावणं आलं. १९७८ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता.

या दौऱ्याला प्रचंड राजकीय महत्त्व होतं. मानभाईंकडे भारताचा टीम मॅनेजर म्हणून जाण्याची सुवर्णसंधी होती. मात्र राजकीय चक्र फिरली आणि या पदावर कुणीतरी राजकीय नेताच असायला हवा असा ठराव झाला. हे पद गेलं बडोद्याच्या महाराजांकडं. सगळ्यांना वाटलं की मानभाईंची संधी हुकली.

मात्र बडोद्याचे महाराज म्हणाले, ‘जर मला या दौऱ्यावर काम पाहायचं असेल, तर मानसिंगच माझे असिस्टंट असतील.’ असिस्टंट मॅनेजर म्हणून मानसिंग यांनी पाकिस्तानचा दौरा केला.

यापेक्षा मोठी संधी मिळाली, ती १९८३ च्या वर्ल्डकपवेळी. भारतीय संघाचा मॅनेजर म्हणून कोण काम पाहणार, यासाठी बीसीसीआयनं निवडणूक घेतली.

सामना रंगला पीआर मान सिंग विरुद्ध निरंजन शहा असा.

आता निरंजन शहा हा काही किरकोळ माणूस नव्हता. त्यांचं स्वतःचं न्यूजपेपरचं साम्राज्य होतं. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर सत्ता गाजवणाऱ्या राजघराण्याला त्यांनी खाली खेचलं होतं. १९७२ पासून ते सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांना विरोधक उरला नव्हता, इतका त्यांचा प्रशासनावर होल्ड होता. त्यांच्यासमोर मान सिंग किती टिकतील याबद्दल शंका होती…

इलेक्शनचा निकाल आला, १५-१३. बाजी मारली पीआर मान सिंग यांनी.

भारतीय टीमचे मॅनेजर झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं, कॅप्टन निवडणं. बीसीसीआयच्या सहा जणांच्या पॅनलनं कपिल देवची भारताचा कॅप्टन म्हणून निवड केली. त्यात मान सिंग यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांनी आणि कपिलनं मिळून भारतीय संघ निवडला… ज्यानं पुढं जाऊन इतिहास रचला.

या टीमसाठी मानभाईंनी जे जे शक्य होईल ते सगळं केलं, अगदी त्यांचं जास्तीचं सामान इंग्लंडला नेण्यासाठी जुगाड लावण्यापासून, त्यांना मोटिव्हेशनचा डोस देण्यापर्यंत सगळं. भारतीय संघाची मापं काढणाऱ्या, डेव्हिड फ्रीथला ‘आपले शब्द खाण्याची’ आठवण करणारेही मानभाईच होते.

तोडक्यामोडक्या इंग्लिशमधून इंग्लंड क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांना भिडणाऱ्या, आपल्या टीमच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मानभाईंचं स्वप्न २५ जून १९८३ ला पूर्ण झालं, तो दिवस ना ते कधी विसरतील ना आपण.

पुढे १९८७ च्या वर्ल्डकपमध्येही त्यांनीच भारतीय टीमचे मॅनेजर म्हणून काम पाहिलं. हैदराबादमध्ये ‘पॅव्हेलियन’ नावाचं घर बांधलं आणि त्याच्यात क्रिकेटर्सचे टाय, बॅट, पुस्तकं अशा बऱ्याच गोष्टी एकत्र करत संग्रहालय सुरू केलं. ज्याचं उद्घाटन खुद्द सचिन तेंडुलकरनं केलं.

आज मानभाईंचे कित्येक मोठ्या क्रिकेटर्ससोबत फोटो आहेत. वर्ल्डकप, कपिल देव आणि इंदिरा गांधी यांच्यासोबतही फोटो आहे; मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये ते बसतात, त्या खुर्चीच्यावर गुलाम अहमद यांचा फोटो आहे.

जो एकच गोष्ट सांगतो की इतकं यश मिळवूनही मानभाई आपल्या गुरुला विसरले नाहीत.

लॉर्ड्सवर काढलेल्या टीम फोटोवेळी त्यांनी मान जराशी बाहेर काढली होती, तेवढीच प्रसिद्धी या माणसानं स्वतःहून मिळवली, बाकी सगळं त्यांनी आपल्या कामातून कमावलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.