धुळ्याच्या या माणसामुळं मुंबई वाचली हे मात्र नक्की.

प्रदिप शर्मा शिवसेनेत गेल्याची बातमी आली. आत्ता ते विधानसभेची निवडणूक लढवतील, सगळं जमलच तर आमदार पण होतील. त्यांच्या या निर्णयावर लोकांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या होत्या.

प्रदिप शर्मांवर आधारित “अब तक छप्पन” हा सिनेमा होता अस सांगण्यात येत. यातला नाना पाटेकर पाहताना प्रदिप शर्मांचा गर्व करू वाटतो. पण अशाच वेळी “रेगे” सारखा सिनेमा दिसतो. त्यात व्यक्तिगत स्वार्थापोटी एका कॉलेजच्या पोराचा गुंड म्हणून एन्काउंटर करण्यात येतो. त्यातले महेश मांजरेकर पाहताना राहून राहून प्रदिप शर्मांची आठवण येते. 

सिनेमा खरा खोटा माहित नाही पण प्रदिप शर्मां म्हणलं की प्रत्येकापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ज्याप्रमाणे आणि ज्या वेगाने त्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा खातमा केला, त्यावरून जे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, त्यावरून प्रदिप शर्मा या नावापुढे प्रश्नचिन्ह कायमचं लागल्यासारखं वाटतं. 

प्रदिप शर्मांचा जन्म धुळ्याचा. शिक्षण देखील धुळ्याचं. शर्मा आडनावाचा माणूस धुळ्यात कसा हा पहिला प्रश्न. तर प्रदिप शर्मांचे वडिल रामेश्वर शर्मा हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. अगदी शांतपणे विद्यार्था घडवण्याचं हे काम. प्रदिप शर्मां देखील तुमच्या आमच्यासारखे वडिलांच्या प्रभावात लहानाचे मोठ्ठे झाले. Msc पर्यन्तच शिक्षण धुळ्यातच झालं. त्यांनतर पोलीस खात्यात जायचं म्हणून त्यांनी मुंबई पोलीस सर्विस कमिशनची परिक्षा दिली. पास झाले. पोलिस सब इनस्पेक्टर झाले आणि १९८३ ला नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये रुजू झाले. 

पहिल्या दिवसांपासून इथे काहीतरी वेगळं होतं. अगदी नशिबात लिहल्यासारखं.

कारण नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमधली १९८३ ची बॅच आजवरची सर्वात जबरदस्त बॅच म्हणून ओळखली जाते. या बॅचमध्ये कोण होतं तर विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, शिवाजी कोळेकर असे एकाहून एक वरचढ एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट. या बॅचसाठी ट्रेनिंग प्रमुख होते ते अरविंद इनामदार. अरविंद इनामदार माजी पोलीस महासंचालक. त्यांच्याच तालमीत या नव्या पोलीसांची ट्रेनिंग झाली होती. 

प्रदिप शर्मांच पहिलं पोस्टिंग झालं ते माहिम पोलीस ठाण्यात. इथे गुंडगिरी होती पण त्या काळात एन्काऊंटर करणे, गुन्हेगाराला डायरेक्ट मारणे असले प्रकार पोलीसांच्या देखील गावी नव्हते. प्रदिप शर्मांच्या मुंबई शहरातच वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत राहिल्या. माहिम नंतर स्पेशल ब्रॅन्चसाठी जुहू येथे त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात ते घाटकोपर येथे रुजू झाले. 

ते साल होतं १९९० चं.

त्या काळात घाटकोपर तसा संवेदनशील भाग होता. गुंडगिरी सवयीची झाली होती. याच काळात बातमी आली. तीन पोलीसांनी मिळून एका गुंडाचा एन्काऊंटर केल्याची ती बातमी होती. या बातमीत एक पोलीस सब इन्स्पेक्टर होते तर बाकीचे दोनजण कॉन्स्टेबल होते. हे पोलीस शिपाई फक्त आपल्या सिनियरला सोबत करत होते. त्या पोलीस अधिकाऱ्याच नाव होतं प्रदिप शर्मा. 

मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये पोलीस देखील बंदूक चालवू शकतात हे दाखवणार हे पहिलं उदाहरण असल्याच सांगण्यात आलं. या घटनेनंतर बराच काळ अंडरवर्ल्डला पहिल्यांदा कळाल होतं कि एन्काऊंटर हा प्रकार असतो आणि पोलीस आपला गेम करु शकतात.

याच काळात मुंबईत गॅंगवार मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. पोलीस काहीच करु शकत नाहीत अशी सर्वसामान्य लोकांची टिका सुरु झाली होती. याच दरम्यान घाटकोपर झुनझुनवाला कॉलेजला अरुण सिंग नावाचा प्रोफेसर होता. अश्विन नाईकच्या गॅंगने प्रोफेसर असणाऱ्या अरुण सिंग यांची हत्या केली. त्याला कारण होतं ते अरुण नाईकचा भाऊ OP सिंग. OP सिंग हा गुंड होता आणि तो छोटा राजन गॅंगचा हस्तक होता. या घटनेमुळे OP सिंग हा प्रदिप शर्मांचा इन्फोर्मर बनल्याच सांगितल जातं. 

गॅंगवार जोरात चालू झालं आणि एकदिवस मुंबईत सिरियल ब्लॉस्ट झाले.

मुंबईच्या गॅंगवारच अंतीम टोक म्हणजे हे बॉम्बस्फोट होते. दहशतीखाली असणाऱ्या लोकांना देखील कळालं वेळ आली ते सेलिब्रिटी किंवा मोठ्या लोकांनाच नाही तर हे गुंड सर्वसामान्य लोकांना देखील टार्गेट करु शकतात. हसन गफुर या अधिकाऱ्यांनी गुंडांची धरपकड करण्याच्या उद्देशानेच एक टिम बनवली त्या टिममध्ये होते प्रदिप शर्मा आणि विजय साळसकर. 

धारावीच्या कम्पाऊंड विभागात माकडवाला बंधुंची दहशत होती. सुभाष माकडवाला आणि गणेश माकडवाला हे दोन भाऊ कुख्यात गुंड होते. त्यांनी पकडण्याची योजना आखण्यात आली. या ऑपरेशनच लिड करत होते ते प्रदिप शर्मा आणि विजय साळसकर. त्यामध्ये माकडवाला बंधुचा खात्मा करण्यात आला. 

त्यानंतर प्रदिप शर्मांना प्रमोशन मिळालं. ते साल होतं १९९५. नार्कोटिक्स डिपार्टर्मेंटच्या बांद्रा विभागात हि बदली झाली होती. इथपर्यन्त प्रदिप शर्मांवर कोणतेच आरोप नव्हते. 

त्यानंतर मात्र प्रदिप शर्मांची बदली झाली ती चंदन चौकीला.

इथे त्यांना त्यांचा साथिदार मिळाला. त्याच नाव दया नायक. हा विभाग DCP सत्यपाल सिंग यांच्या अधिकारात येत होता. दोघांना मोकळीक दिल्याची चर्चा आजही चालते. प्रदिप शर्मा आणि त्याच्या अंडर काम करणारा दया नायक सुसाट सुटले आणि पुढच्या एक दोन वर्षात एकामागून एका गुंडाचा खात्मा हावू लागला. त्या काळात महाराष्ट्रात युतीच सरकार होतं. गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे कार्यभार संभाळात होते. त्यांनीच पोलींसाना मोकळीक दिल्याच सांगितल जातं. पण याचा एक फायदा झाला तो म्हणजे नो FIR नो वारंट, फैसला ऑन द स्पॉट म्हणत कित्येक गुंड मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधून कायमचे हद्दपार झाले. 

नाव झांल आणि बदनामी देखील सुरू झाली.

१९९७ साली स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या तारिक नबीच अपहरण करण्यात आलं. त्यांच्याकडे दोन लाखाची खंडणी मागण्यात आली. खंडणी मागण्याचा आरोप दूसऱ्या तिसऱ्या कोणत्या गुंडावर नव्हता तर तो प्रदिप शर्मा आणि दया नायक यांच्यावर करण्यात आला होता. 

प्रदिप शर्मांची बदली अंधेरीच्या क्राईम ब्रॅन्चला करण्यात आली होती. दया नायक असो की प्रदिप शर्मा कि विजय साळसकर यांच्यासाठी आत्ता पोलिस स्टेशन हा मुद्दा राहिला नव्हता. मुंबईच नाही तर गुन्हेगाराचा पाठलाग करुन ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुसून एन्काऊंटर करु लागले होते. १९९८ ते २००३ या काळात परवेझ सिद्दिकी, रफिक डब्बावाला, सादिक कालिया यांच्यासोबत लष्कर ये तोयबा चे तीन म्होरके देखील प्रदिप शर्माच्या सोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. प्रदिप शर्मांनी केलेल्या एन्काऊंटरच्या आकड्याने सेंचुरी गाठली होती. 

अनेक एन्काऊंटर होते. पैकी लखनभैय्या आणि ख्वाजा युनूस या दोन्ही केस मध्ये त्यांच्यावर चौकशी करण्यात आली.

ख्वाजा युनूस हा दाऊदचा माणूस होता. अटकेत असताना त्याचा मृत्यू झाला आणि लखनभैय्याच्या भावाने फेक एन्काऊंटर असल्याची केस टाकली होती. याच काळात प्रदिप शर्मांनी मालाड येथे जागा हडपल्याची चर्चा सुरू झाली. बेहिशोबी मालमत्तेचे आकडे सांगत असताना ते हजारों कोटींच्या घरात गेले. लखन भैय्याच्या एन्काऊंटरची चौकशी सुरू झाली आणि त्याला वाशीतून उचलून वर्सोवा येथे आणुन मारल्याच निष्पण झालं. या तपासात चौदा पोलिस अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आलं. 

२००६ मध्ये ख्वाजा केसमध्ये प्रदिप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांची रवानगी अमरावतीला करण्यात आली. २००८ ला त्यांची बदली धारावीत झाली आणि पुढच्या तीनच महिन्यात त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. 

प्रदिप शर्मा या विरोधात MAT अर्थात MAHARASTRA ADMINISTRATIVE TRIBUNAL कडे आपली बाजू मांडण्यासाठी गेले. मॅटने प्रदिप शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला. २०१० साली लखनभैय्याच्या फेक एन्काऊंटरचे आरोप सिद्ध झाल्याने SIT ने त्यांना अटक केली. २०१० ते १३ च्या दरम्यान प्रदिप शर्मा सातत्याने जेलच्या आत बाहेर होते. कधीकाळी मुंबई पोलीसांना गर्व वाटणाऱ्या प्रदिप शर्मांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आलं. किती एन्काऊंटर खरे आणि किती खोटे याची चर्चा सुरू झाली. कोर्टात SIT ने स्पष्ट केले की, बिल्डर जनार्दन बनगे यांने प्रदिप शर्मांना पैसै देवून लखनभैय्याचा एन्काऊंटर घडवून आणला. मात्र २०१३ साली प्रदिप शर्मांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मात्र इतर पोलीसांना त्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं. 

या प्रकरणानंतर प्रदिप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. ते साल होतं २०१७.

त्यानंतर दाऊदची बहिण हसीना पारकरवर कारवाई करण्यात आली. ठाणे पोलीसांच्या खंडणीविरोधी पथकात ते कार्यरत झाले. नुकताच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिली आणि विधानसभा निवडणुक लढवण्याची तयारी केली. २५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ११२ एन्काऊंटर केले. एन्काऊंटर टिममध्ये त्यांचा सहभाग घेतला तर ते आकडे ३०० च्या वर जातात. त्यातले किती खरे किती खोटे हे त्यांनाच माहिती. पण त्यांच्यामुळे मुंबईच वाचली हे देखील तितकच खरं !! 

हे हि वाच भिडू. 

2 Comments
  1. Kashinath Belle says

    Bol Bhidu Good Histri of Maharatra
    Wachayala changala watato pan Histri phakt Maharatra purti aasu naye purn India madhali pan aasavi Jase karnataka
    U. P, M. P, Gujarat ets.

  2. Shakti Raigaonkar says

    Fake encounter करून मुंबई कशी वाचली। पोलीस अधिकारी चा पगार घर चालवण्या इतका सुद्धा नसतो त्यात हे अधिकारी करोड ची संपत्ती आहै तत्यांच्या साठी तुम्ही इतक प्रेम कस व्यक्त करू शकता।

Leave A Reply

Your email address will not be published.