सुलोचना चव्हाणांना कोरस द्यायला आलेल्या प्रल्हाद शिंदेंच्या आवाजाने दिमड्या फुटल्या होत्या….

पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरवात ठसकेबाजच झाली पाहिजे असं खणखणीत मत होतं दमदार आवाजाच्या सुलोचना चव्हाण यांचं…!

मुळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरापेरात साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानाचा हिरवा ओला
तुझ्या उसाला लागलं कोल्हा...

हे गाणं माहिती नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. सुलोचना चव्हाण यांचा टिपेचा आवाज म्हणजे थेट अंगावर सर्रकन काटा…! सामने असो किंवा सिनेमांची गाणी असो,लोकगीते असो किंवा गवळणी असो अश्या सगळ्याच धाटणीच्या गायन प्रकारात सुलोचना चव्हाण यांचा हात कोणी धरू शकत नाही. म्हणजे तसा आवाज पुन्हा होणे नाही. आपला वाटणारा आवाज म्हणजे सुलोचना चव्हाण. आनंद शिंदेंना सामन्यांमध्ये/ मुकाबल्यामध्ये सुलोचना चव्हाण कायम जड जायच्या.

कसं काय पाटील बरं हाय का, पदरावरती जरतारीचा, सोळावं वरीस धोक्याचं, खेळताना रंग बाई होळीचा, मला म्हणत्यात पुण्याची मैना, बाई मी मूलखाची लाजरी, कळीदार कपुरी पान आणि नीट बघ पाडाला पिकलाय आंबा ह्या लावण्या जगात भारी आहेत आणि कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. सुलोचना चव्हाण या अगदी महाराष्ट्रचं नाही तर हिंदीतही फेमस होत्या.

सुलोचना चव्हाण या वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत “भोजपुरी रामायण” गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती आणि बेगम अख्तर यांना अजून एक धक्का बसला होता तो म्हणजे त्यांना कळलं की सुलोचना चव्हाण या गाणं शिकलेल्या नाहीत.

तर असाच एक किस्सा आहे सुलोचना चव्हाण आणि स्वरसम्राट प्रल्हाददादा शिंदे. आता हे दोन पट्टीचे गायक जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय धमाल उडत असेल. सुलोचना चव्हाण यांच्या गाण्याची रेकॉर्डिंग होती व्हीनसमध्ये. तेव्हा कवळी पोरं पिवळी हळद असं काहीतरी गाणं होतं. पण सुलोचना चव्हाण या गात असताना कोरस हवा तसा येत नव्हता त्यामुळे त्या थोड्या वैतागल्या होत्या. मग त्याच वेळी तिथं प्रल्हाद शिंदे मस्त धोतर आणि पांढऱ्या सदऱ्यात आले. तिथं रेकॉर्डिंग स्टुडिओ बाहेर रतन जैन जे व्हीनस कंपनीचे मालक उभे होते.

प्रल्हाद दादांनी रतन जैन याना विचारलं की किसका रेकॉर्डिंग सुरू है ? रतन जैन म्हणाले ओ सुलोचनाबाई का रेकॉर्डिंग है.

त्यावर प्रल्हाद दादांना आनंद झाला आणि ते म्हणाले अरे माझ्या बहिणीच रेकॉर्डिंग आहे. तेव्हा प्रल्हाद दादा स्टुडिओत गेले आणि सुलोचनाबाईंना म्हणाले काय झालंय, सगळं ठीक ना ? तेव्हा सुलोचनाबाई म्हणाल्या कोरस बरोबर येत नाहीये.

तेव्हा प्रल्हाद दादा म्हणाले एवढंच ना, मी देतो कोरस त्यात काय !

सुलोचना चव्हाण हे ऐकून दबकून म्हणाल्या अहो दादा, तुम्ही इतके मोठे गायक आहात, आमचे आदर्श आहात तुम्ही कोरस देऊन आम्हाला लाजवताय. तेव्हा दादा म्हणाले बाई तू माझी बहिण आहेस आणि कोरस देणं ही काही छोटी गोष्ट नाही,उलट तुझ्या रेकॉर्डिंगला माझा आवाज लागणं हे मी माझं भाग्य समजतो. तू गा.

रेकॉर्डिंग सुरू झालं पण प्रल्हाद शिंदे हे इतके जबऱ्या गायक होते की इतर गायकांचं कसं असतं की जास्त गायल्याने आवाज बसतो, प्रल्हाद शिंदेंची स्टाईल वेगळी होती जितकं जास्त गायचे तितकं आवाजाला धार यायची. कोरसला प्रल्हाद दादांचा आवाज इतका टिपेला पोहचू लागला की सुलोचना चव्हाण यांना तो डोमिनेट करू लागला तेव्हा प्रल्हाद दादांना आपलं काय गणित चाललंय ते कळलं आणि ते माईकवरून उतरून थेट रेकॉर्डिंग स्टुडिओच्या दरवाजाजवळ गेले आणि तिथून त्यांनी कोरस दिला आणि रेकॉर्डिंग पूर्ण केलं.

नंतर सुलोचना चव्हाण यांनी प्रल्हाद दादांचे आभार मानले आणि भरपूर गप्पा मारल्या. मग सुरू झाली प्रल्हाद शिंदेंची बॅटिंग. कारण नंतर दादांची रेकॉर्डिंग होती. पूर्वी सगळं सोबत वाजवत असे आतासारखे ट्रॅक बनून मग गायक रेकॉर्डिंग करेल अशी भानगड तेव्हा नव्हती. प्रल्हाद शिंदे गायला लागले, जशी रात्र चढू लागली प्रल्हाद दादांचा आवाज तापू लागला आणि सगळं वातावरण भारून गेलं. बाहेर रतन जैन, सुलोचना चव्हाण बेभान होऊन प्रल्हाद शिंदेंना ऐकत होत्या. आवाजाची पट्टी इतकी वर गेली की दिमडी वाजवणारे आणि संबळ ढोलकी वाजवणारे चाव्या टाईट करून हैराण झाले आणि मधेच दिमडी फुटली. प्रल्हाद शिंदे गातच होते. मधेच बशीतून फुरके मारून ते गाणं गायला लागायचे, भजी खाऊन रेकॉर्डिंग करायचे. गायनाचे कसलेही पथ्ये पाळायचे नाहीत. म्हणजे एखाद्या गायकाचा आवाज इतका वरचा लागू शकतो तो गायक म्हणजे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे होते.

जिथं इतर गायकांचा स्वर संपतो तिथून प्रल्हाद शिंदे सुरू होतात असं म्हणतात ते उगाच नाही…!

● भिडू दुर्गेश काळे

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.