पुलंची नवीकोरी गाडी बंद पडली ; पुलंनी लेख लिहायला घेतला..”माझी पद्मिनी रुसते तेव्हा”

पु. ल. देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं अष्टपैलू व्यक्तिमत्व. लेखन, गायन, दिग्दर्शन, निर्मिती, कथाकथन, संगीत असं एक क्षेत्र नव्हतं जिथं पुलंनी मुशाफिरी केली नाही. त्यांच्या कथा, त्यांचं लिखाण जितकं प्रसिद्ध आहे, तितकेच त्यांचे किस्सेही.

शाब्दिक कोट्या करण्यात पुलंना तोड नव्हतीच. त्यांच्या हजरजबाबीपणाचे ही कित्येक किस्से प्रसिद्ध आहेत, पण एक किस्सा असा आहे जिथं पुलंना राग आला होता आणि तो व्यक्त करण्याचं त्यांचं साधन होतं… लिखाण!

ही तेव्हाची गोष्टय जेव्हा भारतात प्रीमियर पद्मिनीची एक वेगळीच हवा होती. स्वतः पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी लोन काढून ही कार खरेदी केली होती. यावरुन लोकप्रियतेचा सहज अंदाज येईल. 

त्याकाळात घरात कार असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण समजलं जात होतं. पुलंचा पुतण्या जयंत त्यांना भाई काका म्हणायचा. एकदा सहज पुलंच्या घरी आल्यांनतर जयंत पुलंना म्हणाला, ”भाईकाका तुमच्याकडे गाडी नाही का ओ?” 

तेव्हा पुलंनी जयंतला घराच्या दारात घेऊन जात एक टॅक्सी थांबबली आणि तिच्यातून मस्तपैकी फिरवून आणलं. 

घरी परत आल्यावर त्यांनी जयंतला हसत हसत सांगितलं, ”तुला रस्त्यात जेवढ्या काळ्या-पिवळ्या गाड्या दिसत आहेत ना, त्या सगळ्या माझ्याच आहेत. त्यांना माझं नाव सांग तुला पाहिजे तिथे ने नेऊन आणतील.”

१९७५ मध्ये शेवटी पुलंनी गाडी घ्यायची ठरवली. त्यावेळी गाडीत फक्त दोन तीनच पर्याय होते. पुलंनी प्रीमियर पद्मिनी फियाट घेण्याचं ठरवलं. 

पुलं गाडी घेत आहे म्हटल्यावर त्याचं कौतुक सगळ्यांना होतं. त्यात ते पद्मिनी घेणार आहेत, ही गोष्ट थेट कंपनीच्या मालकांना कळाली होती. कंपनीचे मालक लालचंद टंडन यांनी थेट फॅक्टरीत फोन करून आदेश दिला…

“पुलंसाठी व्हीआयपी गाडी तयार करून द्या.” 

गाडीची डिलिव्हरी घ्यायला पुलं आणि जयंत जाणार होते. त्यापूर्वी जयंत यांनी पुलंना आणि आपल्या वडिलांना सांगतलं की, ‘गाडी घरी घेऊन येण्यापूर्वी मी ती चेक करून येतो.’

जयंत यांचे वडील त्याच कंपनीत कामाला होते. ते जयंत यांना रागावत म्हणाले, ”अरे त्यांच्यासाठी व्हीआयपी गाडी तयार करत आहेत. तू काही चेक बिक करायला जाऊ नकोस. गुपचूप जा आणि गाडी घेऊन ये.” 

यामुळे जयंत हे काही गाडी कशी तयार झाली हे पाहायला गेले नाहीत. पुलं आणि जयंत हे गाडी आणण्यासाठी थेट शोरूमला गेले. पुलं आपल्या शोरूमला येणार म्हणून कामगार खुश होते. त्यांनी पुलंसाठी एक छोटा समारंभही ठेवला होता. 

तो झाल्यानंतर जयंत आणि पुलं देशपांडे ती नवीन फियाट घेऊन त्यांच्या आईला दाखवण्यासाठी पार्ल्याला निघाले होते. पेडर रोड वरून खाली उतरतांना गाडी गचके खायला लागली. काका-पुतण्यांना नेमकं काय होतंय हे कळालंच नाही. 

थोडं पुढे गेल्यावर हाजी अली जवळच्या पेट्रोल पंपावर फियाटच्या टायरमधली हवा चेक केली. गाडीच्या प्रत्येक चाकात डबल हवा भरली होती.

व्हीआयपी गाडीला तयार करण्यात जरा जास्तच उत्साह दाखवला गेला होता.

पण खरी गंमत इथं संपत नाही…

अजून थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं की, गाडीच्या दरवाज्याला आतून हँडलच नाही. अशातच पुलं घरी पोहचले आणि त्यांनी शोरूमला फोन करून दरवाज्याला हँडल नसल्याचं सांगितलं.

घरी गाडी दाखवल्यानंतर, पुलं आणि जयंत ही गाडी घेऊन पुण्याला जाणार होते. त्यामुळं शोरूममधून एक इंजिनियर पाठवण्यात आला. हा इंजिनियर सायनला येऊन थांबला होता आणि तो पुढे तसाच पुलंच्या गाडीत पुण्यापर्यंत सोबत जाणार होता.

मात्र गाडीनं खरे रंग दाखवायला सुरुवात केली. गाडी नवी मुंबईतल्या कोकण भवनाच्या चढावर त्रास देऊ लागली होती. जयंत यांनी हळू गाडी चालवत खोपोली गाठली. थोडं वेळ थांबून चहा घेतला आणि खंडाळा घाट चढायला सुरुवात केली.

खंडाळा घाटाची दोन तीन वळणं घेताच गाडी गरम होऊन बंद पडली. गाडी थंड झाल्याशिवाय पुढे जाताच येणार नव्हतं. हे सगळं घडताना शांत बसतील ते पुलं कसले. त्यांनी घाटात गाडी थंड होईपर्यंत एक विनोदी लेख लिहून काढला.

पुलंनी तापलेल्या आणि बंद पडलेल्या गाडीची तुलना भडकलेल्या बायकोबरोबर केली. त्या लेखाला नाव दिलं,

‘माझी पद्मिनी जेव्हा रुसते..!

पुण्याला पोहचताच पुलंनी लालचंद शेटजींना फोन करून रविवारच्या महाराष्ट्र टाईम्स मधील त्यांचा लेख वाचायला सांगितला. कंपनीचा इंजिनियर सोबत असल्यानं त्यानं पुलंसोबत घडलेली घटना कंपनीला कळवली होती. दुसऱ्या दिवशी कंपनीची माणसं आली आणि ती गाडी घेऊन गेले. सर्व काही ठीकठाक करून लगेच परत आणून दिली. त्यामुळे पुलंनी तो लेख प्रसिद्ध केला नाही. 

अनेक वर्ष वापरल्यानंतर पुलंनी ही फियाट जयंत यांना दिली, त्यांच्याकडे असताना ‘पद्मिनी’ रुसल्याचे किस्से काही कुणाच्या कानावर आले नाहीत.  

जयंत देशपांडे यांनी ‘असा असामी पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी गौरवग्रंथात’ हा किस्सा सांगितला आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.