गॅंगस्टर सुख्खाला पोलीस व्हॅनमधून बाहेर खेचून मारण्यात आलं, गेम झाल्यानंतर तिथेच भांगडा केला.. 

सिद्धु मुसेवालाच्या मृत्यूनंतर सर्वात पहिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आलं ते आप पक्षाला. या पक्षानेच सिद्धु मुसेवालाची सिक्युरिटी काढून घेतल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पण एक गोष्ट हे आरोप करताना विसरण्यात आली ती म्हणजे 

पंजाबचे गॅंगस्टर अन् त्यांची गेम करण्याची वृत्ती… 

त्यासाठी इतिहासातलं एक प्रकरण सांगता येईल. तारिख होती २१ जानेवारी २०१५. पंजाब पोलीस पंजाबचा कुप्रसिद्ध गॅंगस्टर सुख्खा काहलवाला कोर्टात घेवून चालले होते. नाभा जेलमधून पोलीसांच्या गाडीतून त्याला जालंदरच्या कोर्टात हजर करण्यात येणार होतं.. 

पोलीस व्हॅनमधून त्याला कोर्टात नेण्यात येत होतं. पोलीस व्हॅन रस्त्याच्या एका कोपऱ्यावरून वळण घेत असतानाच त्यांच्या पाठीमागून दोन पांढऱ्या रंगाच्या व्हॅन आल्या. गाडीतल्या पोलीसांना काही समजण्याच्या आतच या दोन्ही गाड्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये व्हॅनचा रस्ता अडवला. पोलीसांना बंदुकींच्या फैरीवर घेवून सुख्खाला बाजूला घेण्यात आलं व एकदोन करत एकूण ६० गोळ्या त्याला मारण्यात आल्या. इतक्यावरच न थांबता या दोन गाड्यातील एकूण १५ शार्पशूटरनी त्याच्या बॉडीशेजारी भांगडा केला…

पोलीसांना बंदुकीच्या नळीवर घेत सगळ्यांना सांगा ही गेम गौंडर गॅंगने केलेला आहे अस सांगण्यात आलं व तिथून हे १५ शार्पशूटर गायब झाले…

ही गोष्ट आहे पंजाब ते बंगालपर्यन्त ज्याचा एकेकाळी दरारा होता अशा पंजाबी गॅंगस्टर सुख्खा काहलवा याची.. 

एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेला सुख्खा. त्याला कधीच गॅंगस्टर व्हायचं नव्हतं. तो त्या वृत्तीचा पण नव्हता. त्याचे दोन्ही चुलते कॅनडात सेटल झालेले. वडिलांनापण कामासाठी कॅनडात जायचं होतं. आईवडिलांसोबत कॅनडात जायचं. कायमचं NRI व्हायचं हे त्याचं स्वप्न होतं.. 

तेव्हा सुख्खा १५ वर्षांचा होता. सुख्खाचं खर नाव सुखबिर सिंह. त्याच्या गावाचं नाव काहलवां. या गावातच तो मोठ्ठा झाला. वडिलांनी कॅनडाला जाण्यासाठी पासपोर्ट हवा म्हणून अप्लाय केलं होतं. आई वडिलांचा पासपोर्ट आला पण याचं काम पोलीस व्हेरिफेकेशनमध्ये अडकलं. त्याचं कारण होतं गावच्या किरकोळ भांडणाचा राग.. 

गावातल्या दोन गटात किरकोळ कारणावरून भांडण झालेलं. एकमेकांच्या गटाविरोधात पोलीस कम्प्लेट करण्यात आलेली होती. या भांडणात सुख्खा कुठेच नव्हता तरी त्याचं नाव या यादीत आलं. त्यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला नाही अन् इथेच त्याचं नशिब बदलायला सुरवात झाली. 

आपल्या दोन्ही मुलांना मागे ठेवून सुख्खाचे आईवडिल चार पैसे मिळवायला कॅनडात गेले. इकडे सुख्खा आपलं भविष्य तयार करु लागला. म्हणायला दोन चार भांडण आणि किरकोळ पोलीस केसमध्ये नोंद झाली पण काही वर्षांनी त्याचा पासपोर्ट आला.. 

२०-२२ व्या वर्षी सुख्खा एका रिसोर्टच्या मालकाच्या मुलीच्या प्रेमात पडला. ही मुलगी सुख्खावर भयानक प्रेम करायची. तिने सुख्खाला या किरकोळ हाणामारीच्या प्रकरणातून बाहेर काढलं. त्याच्यासोबत लग्न केलं आणि नवीन स्वप्न घेवून हे दोघेही आस्ट्रेलियाला स्थायिक झाले.. 

काही वर्ष गेले आणि दोघांच्या भांडण होवू लागली. या भांडणांना कंटाळून सुख्खा पुन्हा पंजाबात आला अन् इथे खरा पिक्चर फिरला..  

जालंधरला परतलेल्या सुख्खाने आत्ता गुन्हेगारीचा आसरा घेतला. इथेच छोटेमोठ्ठे गुन्हे करायला त्याने आपली एक गॅंग तयार केली. दादागिरी, स्मगलिंग, चोरी अशा गुन्ह्यात या गॅंगचं नाव येवू लागलं. एक दिवस जालंधरमध्ये लवली बाबा चा खून झाला. या खुन्यात सुख्खाचं नाव आलं. सुख्खाने केलेला तो पहिला खून. त्याला पोलीसांनी अटक केली. बायकोला हे समजल्यानंतर ती आस्ट्रेलियावरून पुन्हा भारतात आली. सुख्खा या सगळ्यातून परत बाहेर काढायचा तिने विचार केला. मात्र सुख्खा खूप पुढे निधून आलेला. 

सुख्खाने आत्ता परत मागे फिरायला नकार दिला. घटस्फोट झाला. आत्ता सुख्खा गुन्हे करायला पुर्णपणे मोकळा झालेला. 

त्यानंतर एकामागे एक खून करून त्याने आपलं प्रस्थ वाढवल. युपीचा गॅंगस्टर यामीन त्याला भेटला त्यानी मिळून युपीत मोठ्या प्रमाणात सोन्याची चोरी केली. या चोरीच्या सोन्यावरून यामीन अन् सुख्खात भांडण झाली. यामीनने त्याला मारून गंगा नदीच्या किनारी फेकून दिलं. सुख्खा मेला असा त्याचा समज झाला होता पण सुख्खा यातून देखील वाचला. 

पोलीसांच्या एकूण चार चकमकींमध्ये त्याचा जीव वाचला होता. त्यामुळे मरणाची जी काही भिती होती ती गेली होती. २०१३ मध्ये सुख्खाने पोलीस इन्स्पेक्टर सुदर्शन ढिल्लो यांची हत्या केली. एकूण ६० गुन्हे त्याच्या नावावर रिकॉर्ड झाले होते.  

पण सुख्खाचं खर नाव झालं ते फेसबुकमुळं.. 

सुख्खाला फेसबुकचा नाद लागला. इतका की तो सोशल मिडीयावर सेलिब्रिटी झाला. बुंदूकींसोबत फोटो, स्वॅग दाखवणाऱ्या सुखाच्या फोटोंना लाखोत लाईक यायला लागले. अलीकडच्या मध्यप्रदेशच्या दुर्लभ सारखाच हा प्रकार होता. कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त लोकप्रियतला त्याला सोशल मिडीयावर मिळत गेली. 

त्यामुळे पंजाब, युपी सहीत बंगालपर्यन्त त्याचं नाव होतं गेलं. इथे झालेल्या कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात सुख्खाचं नाव येतच होतं. 

सुख्खाला अटक झाली. पण तो तुरूंगातून देखील आपली गॅंग ॲक्टिव ठेवत होता. पंजाबमध्ये सर्वात मोठ्ठी गॅंग म्हणून सुख्खाच्या गॅंगला ओळखलं जावू लागलं.

एका प्रकरणात गॅंगस्टर लवलीला सुख्खाने मारून टाकलं. सुख्खाचाच मित्र असणाऱ्या सोनु बाबाने सुख्खाच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. साक्ष देत असतानाच न्यायाधिशांसमोर सुख्खाने सोनुला मारून टाकायची धमकी दिली… 

सुख्खा जे बोलायचा ते करायचा.. 

सोनु हा सुख्खाच्या जवळचा असल्याने तो आपला गेम करणारच यावर सोनु ठाम होता. त्यामुळे सोनुने हात मिळवला तो विक्की गोंडर याच्यासोबत. विक्की गोंडरने सुख्खाचा गेम केला तर विक्की हा पंजाबचा एक नंबरचा डॉन होणार होता. सुख्खाला असलेली लोकप्रियता पाहून त्याचा गेम करुनच मोठ्ठ व्हायचं हे प्लॅनिंग विक्कीनं केलं.

अन् ठरलेल्या दिवशी म्हणजेच २१ जानेवारी २०१५ ला सुख्खाला कोर्टात हजर करत असताना १५ शार्पशूटरला पाठवून विक्कीने सुख्खाची गेम केली. त्यानंतर तो पंजाबचा एक नंबरचा डॉन झाला. यात मारला गेलेल्या सुख्खाचं वय होतं २८ वर्ष. वयाच्या २८ वर्षी पंजाबचा नंबर वन गॅंगस्टर, पंजाब, युपी ते पश्चिम बंगालपर्यन्त असलेली दहशत घेवून तो मेला.. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.