सलमानपेक्षाही भयानक कांड राजकुमारच्या पोरानं केलं होतं…

बेशक मुझसे गलती हुई. मैं भूल ही गया था, इस घर के इंसानों को हर सांस के बाद दूसरी सांस के लिए भी आपसे इजाज़त लेनी पड़ती है. और आपकी औलाद ख़ुदा की बनाई हुई ज़मीन पर नहीं चलती, आपकी हथेली पर रेंगती है.

असेल किंवा

बिल्ली के दांत गिरे नहीं और चला शेर के मुंह में हाथ डालने. ये बद्तमीज हरकतें अपने बाप के सामने घर के आंगन में करना, सड़कों पर नहीं.

हे दोन डायलॉग आहेत दस्तुरखुद्द राजकुमार यांच्या पात्रांचे. ह्या माणसाबद्दल प्रत्येक माणसाला प्रेम आहे. त्यांचा अभिनय असेल किंवा डायलॉग डिलिव्हरी असेल सगळच एकदम बाप होतं. पण कसं असतं प्रत्येकाचा एक काळ असतो. आजचा किस्सा राजकुमार यांचा डायलॉग टाकून सुरू करण्याचं कारण म्हणजे त्यांच्या मुलाचा एक भयंकर कांड केल्याचा किस्सा, ज्याच्या पुढे सलमान खानसुद्धा किरकोळ वाटेल.

तर जास्त पाणी न टाकता आपण थेट मुद्द्याला हात घालू…

बॉलिवूडमध्ये काही असे हिरो आहेत ज्यांच्या घरचे सिनेमात बाप माणसं होती ,आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांसोबत त्यांचं उठण बसणं असतं. बरीच हवा असते पण काय माहिती यांचं नशीब म्हणा किंवा प्रेक्षकांना त्यांचं काम न आवडल्याने हे स्टार किड्स जास्त काळ बॉलिवूडमध्ये रेंगाळत नाही आणि लोकांसाठी ते थट्टेचा विषय बनून करता. बापाला जे जमलं ते पोराला करता आलं नाही असेही बरेच टोमणे असतात.

काहींमध्ये अभिनय क्षमता असते, टॅलेंट असतं पण काळाप्रमाणे स्वतः मध्ये बदल न करता आल्याने असे हिरो लोकांच्या लक्षात राहत नाही. असाच किस्सा झाला होता राजकुमार यांचा मुलगा पुरु राज कुमार याच्यासोबत. बाप राजकुमार असूनही पुरू राजकुमार बॉलिवूडमध्ये स्थिरावू शकला नाही आणि शेवटी कांड करून परत लाईमलाईटमध्ये आला.

आपल्या पोराचा पहिला सिनेमा हिट व्हावा हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. तसाच प्रयत्न राजकुमार यांनी केला होता. पुरू राजकुमारला आधीपासूनच सिनेमांचा नाद होता आणि त्यादृष्टीने तो स्वतःला तयारही करत होता. पुरू राव पंडित असं त्याचं ओरिजिनल नाव होतं पुढे त्याने पुरू राज कुमार असं करून घेतलं.

परदेशातून शिकून आल्यावर त्याने अभिनयाकडे लक्ष वळवलं आणि १९९६ साली बाल ब्रम्हचारी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुरू राज कुमारने पदार्पण केलं.

बाल ब्रम्हचारी बॉक्स ऑफिसवर काय चालला नाही पण पुरू राज कुमारने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राज कुमार यांनी पुरुला बजावलं होतं की अभिनयावर फोकस कर. पुढे इट का जवाब पथर, एल ओ सी कारगिल, हमारा दिल आपके पास है, मिशन काश्मीर, उल्झन, खतरों के खिलाडी, विर, ॲक्शन जॅक्सन असे अनेक सिनेमे केले पण तो लोकांच्या लक्षात राहीला नाही.

बॉलीवुड पासून दुरावला गेला पण जेव्हा जेव्हा पुरू राजकुमार हे नाव येतं त्याच्यासोबत सिनेमांचे नाव नाय येत तर एक भयानक कांड केलेला तो किस्सा येतो म्हणजे येतोच, ज्याच्यापुढे सलमान भाई किरकोळ पडतात.

17 डिसेंबर 1993 ची रात्र होती. सगळीकडे सामसूम. मुंबईच्या वांद्रे भागात एस वी रोडवर फुटपाथवर काही लोकं झोपलेले होते. त्याच वेळी पुरू राजकुमार गाडी सुसाट वेगाने पळवत आला आणि फुटपाथवर झोपलेल्या 8  जणांच्या अंगावरून ती गाडी गेली. यात तीन जण जागीच गेले तर चार जणांचे हातपाय तुटले आणि ते गंभीर जखमी झाले.

एक गंभीर जखमी झालेला दवाखान्यात नेता नेता मरण पावला. सगळ्या परिसरात हल्लकल्लोळ उडाला. बघ्यांनी पुरु राजकुमारला जेलात भरती केलं.

पण हे प्रकरण तापण्याआधीच गार झालं. 950 रूपये बेल देऊन पुरू राजकुमार एका दिवसात बाहेर आला. 1 लाख रूपये नुकसान भरपाई देऊन हा सगळा मॅटर शांत करण्यात आला. पण तेव्हा हे प्रकरण हिट अँड रन म्हणून गाजलं होतं. मिडिया वाले पुरू राजकुमार वर डोळे ठेवून बसले होते पण हे प्रकरण इतकं साधं सोपं करून मिटविण्यात आलं की यावर अजूनही वाद विवाद होतात.

राधा राजाध्यक्ष या महिला पत्रकारितेने या प्रकरणाला वाचा फोडली. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी पोलिसांना जाब विचारला की पुरू राजकुमारने दारू प्यायली होती का ? त्याची ब्लड टेस्ट केली का ? पण पोलिसांनी जास्त पाल्हाळ न लावता ही केस सुमडीत गायब केली.

जुलै 1996 मध्ये कोर्टात ही केस गेली पण 2 सूनावण्यानंतर ही केस बंद करण्यात आली. ज्या ज्या लोकांचं या अपघातात निधन झालं, जखमी झाले त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देऊन सगळं सॉर्ट करण्यात आलं. न्याय मागणारे सगळे आवाज बंद झाले. अब्दुल रहीम कुरेशी यांचा या घटनेत पाय गेला त्यांना पुरू राजकुमारने दवाखाना खर्च आणि वरून 500 रूपये दिले. पूढे पुरु सिनेमात मग्न झाला आणि अब्दुल रहीम कुरेशी गमावलेल्या पायाने गावी निघून गेले.

अजूनही या केस बद्दल गोपनीयता आहे. सलमान हिट अँड रनचा किस्सा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा पुरू राजकुमार याचा हा फर्स्ट ड्राफ्ट येतो म्हणजे येतोच.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.