या एका घटनेमुळं कळतं, राहुल द्रविड किती मोठा क्रिकेटर होता ते…

राहुल द्रविड. द वॉल, खरा जेंटलमन अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा खेळाडू. द्रविडचे मैदानातले किस्से जितके लोकप्रिय आहेत, त्यापेक्षा लोकप्रिय आहेत त्याचे मैदानाबाहेरचे किस्से. म्हणजे द्रविड हा असं अगदी आहे, जो सुपरस्टार असूनही पोराच्या शाळेतल्या प्रदर्शनासाठी रांगेत उभा राहतो. आपल्या क्रिकेट क्लबला गरज आहे म्हणून रिटायरमेन्ट घेतल्यानंतरही मैदानात उतरू शकतो आणि एखाद्या कार्यक्रमात उगाच मानाची अपेक्षा न करता निवांत गर्दीत बसू शकतो.

द्रविडचा हा किस्सा आहे, केविन पीटरसन सोबतचा…

पीटरसन म्हणल्यावर आपल्याला सगळ्यात आधी टेन्शन येतं. हा सहा फुटी कार्यकर्ता पाय फाकवलेला स्टान्स घेऊन क्रीझवर उभा राहिला की टेन्शनच यायचं. पीटरसन म्हणजे मुरलीधरनचा कचरा करणारा बॉलर. त्यानं स्विच हिट इतकी लोकप्रिय केली की, आजही दुसऱ्या कुणाची स्विच हिट आपल्याला भारी वाटत नाही. केविन पीटरसनमध्ये प्रॉपर शान होती, माज होता, जो त्याला सूट करायचा.

केपी मुळचा साऊथ आफ्रिकेचा, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला इंग्लंडकडून. सुरुवातीला त्याला संघात स्थान मिळेल की नाही, यावर शंका होती मात्र पीटरसननं इंग्लंडचा कॅप्टन होऊन दाखवलं. त्याची कॅप्टन्सी मात्र अचानकपणे काढून घेण्यात आली. जशी हातातली कॅप्टन्सी गेली, तसा केपीचा फॉर्मही गंडला.

(म्हणून गडी आपल्या विराट कोहलीचा फॉर्म गंडला तेव्हा त्याच्या सपोर्टला धावून आला होता…)

बांगलादेश विरुद्धच्या सिरीजमध्ये पीटरसन स्कोअर करत होता, पण बांगलादेशच्या स्पिनर्सनं त्याची विकेट म्हणजे पोरखेळ करुन ठेवला होता. ज्या स्पिनर्सला उचलून मारण्यात पीटरसन पटाईत होता, त्यांच्याच समोर त्याची डाळ शिजत नव्हती. 

साहजिकच इंग्लिश मीडिया त्याच्यावर तुटून पडलेली, आधीच कॅप्टन्सी गमवावी लागलेली, त्यात मीडिया आणि स्वतःच्या खेळाचं प्रेशर यामुळं पीटरसन प्रचंड प्रेशरमध्ये होता. त्याला स्वतःला वाटत होतं की हाच आपल्या करिअरचा एन्ड आहे.

आता यात पण एक गेम आहे, ९९, ४५ आणि ७४* असा स्कोअर करुनही, पीटरसनला आपल्या संघातल्या जागेसाठी संघर्ष करावा लागत होता, साहजिकच पीटरसनला राजकारणाचा फटका बसत होता.

या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं होतं आणि तिथं पीटरसनला उपाय सापडला तो म्हणजे राहुल द्रविड.

त्यानं द्रविडशी संपर्क साधला आणि त्याला नेमका काय प्रॉब्लेम होतोय हे सांगत मी कुठं कमी पडतोय हे विचारलं. आता दुसरा एखादा प्लेअर असता, तर त्यानं एक दोन सल्ले देऊन विषय कट केला आता, किंवा काय टेक्निकल चुका होतायत हे समजून सांगितलं असतं, पण पीटरसनचा खरा विषय गंडला होता, तो मेंटल स्ट्रेंथमध्ये.

राहुल द्रविडनं केविन पीटरसनचं सगळं ऐकून घेतलं आणि नंतर म्हणाला, “भावा मी तुला एक ईमेल करतो.”

भारी विषय म्हणजे, राहुल द्रविडनं पीटरसनला दोन पानं मोठा मेल टाकला.

एक साधं गणित आहे, द्रविड पीटरसनपेक्षा मोठा प्लेअर, त्यानं त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक बॉलर्सचा सामना केलेला, त्यात द्रविड लहानपणापासून स्पिनर्सला खेळत आला होता, त्यामुळं सगळ्याच बाबतीत वरचढ. तरीही द्रविडनं ईमेलच्या सुरुवातीलाच सांगितलं की,

“ज्या दोन बांगलादेशी बॉलर्सबद्दल आपण बोलतोय, त्यांची बॉलिंग मी कधी खेळलेलो नाही. त्यामुळं मी इथं लिहिलेलं तुला चुकीचं किंवा संदर्भहीन वाटलं तर सरळ इग्नोर कर.”

त्यानंतर द्रविडनं बॅट आणि अंगाचं वजन कसं पडायला हवं हे सांगितलं, बॉलचा टप्पा कुठं पडल्यावर काय करायचं हे सुद्धा सांगितलं. सोबतच एक द्रविडच्या कोचनं द्रविडला दिलेली एक टीपही पीटरसनला दिली.

द्रविडचे कोच सांगायचे की स्पिन बॉलिंग खेळताना पॅड्सची गरज पडली नाही पाहिजे.

त्यानं पीटरसनला हाच सल्ला दिला, ग्रॅमी स्वान आणि मॉन्टी पानेसर विरुद्ध पॅड्स न घालता खेळ, म्हणजे पायाआधी बॅट पुढं आणण्याची सवय तुला अगदी सहज होईल. सोबतच पीटरसनला तो एक भारी प्लेअर आहे, याची जाणीव द्रविडनं अगदी सोप्या शब्दात करुन दिली.

पीटरसननं या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या आणि स्पिनर्सवर अक्षरश: तुटून पडला. २०१० च्या ऍशेसमध्ये ऍडलेडवर त्यानं २२७ रन्स अक्षरश: चोपले. साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यावर गेलेला भारत कुणालाच सुट्टी मिळाली नाही.

पण खरी परीक्षा होती, ती भारताविरुद्ध भारतात. द्रविडच्या टिप्स परफेक्ट डोक्यात ठेवत त्यानं भारतातही धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे हातभर बॉल फिरत असणाऱ्या वानखेडेवर त्यानं भारताला मारलेले १८६ रन्स, कुठलाच क्रिकेट चाहता विसरु शकत नाही.

द्रविडसाठी ही एक साधी गोष्ट होती, पण त्यामुळं पीटरसनचं करिअर वाचलं. त्याचा फॉर्म तर परत आलाच पण सोबतच, तो इंग्लंडसाठी पुन्हा मॅचविनर ठरला.

२०२१ मध्ये जेव्हा श्रीलंका विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅचेस सुरू होत्या, तेव्हा पीटरसननं एक ट्विट केलं होतं.

 

फेल जाणाऱ्या इंग्लिश क्रिकेटर्सला द्रविडचं हे पात्र वाचायला लावा, इतकी सोपी मागणी पीटरसनची होती आणि ही साधी गोष्ट राहुल द्रविडचं महत्त्व, त्याचं क्रिकेटचं ज्ञान आणि त्याच्यात असलेला निस्वार्थीपणा सांगून जाते.

हा किस्सा केविन पीटरसननं आपल्या आत्मचरित्रात सांगितलं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.