ठराविक जातींसाठी असणाऱ्या देवांना त्यांनी चित्रांमधून सामान्यांच्या घरात पोहचवलं

हनुमानानं छाती फाडुन राम सीतेचं दर्शन घडवलेलं चित्र आठवतयं? आता घरातल्या भिंतीवर अडकलेल्या कॅलेंडरमध्ये असलेलं देवीचं चित्र बघा. देवघरात फोटोमध्ये लक्ष्मी, महालक्ष्मी, राम-सीता असे फोटो असतील तर ते पण बघा.

आता ऐका ही तुम्ही बघितलेलि सगळी चित्रं भारतातील महान चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेली आहेत. शंकर-पार्वती गणपतीला घेऊन भ्रमण करत आहेत आणि बाल गणपती पार्वतीच्या मांडीवर आहे असं चित्र, अप्सरा मेनका, उर्वशी यांची चित्रं ही देखील त्यांनीच काढली आहेत.

इतकेच काय तर दिवाळीमध्ये तुम्ही उडवत असलेल्या लक्ष्मी तोट्यावरचं चित्र पण रवि वर्मा यांनीच काढलं आहे.

राजा रवि वर्मा कोण होते ?

तर राजा रवि वर्मा यांचा जन्म 29 एप्रिल 1848 मध्ये केरळमधील त्रावणकोर येथील किलीमोनुर गावात झाला. त्यांच घर मुळातचं कलेचं उपासक होतं. त्यांची आई ‘उमा अंबाबाई तंपुराटटी’ या एक सिद्ध कवयित्री होत्या, तर वडील ‘एजिमाविल भट्टतिरिप्पाट’ हे संस्कृतचे विद्वान होते. त्यांचे काका हे तंजावर शैलीचे प्रसिद्ध चित्रकार होते.

रवि वर्मा लहान असल्यापासूनच घराच्या भिंतींवर जंगली प्राणी, विशेषतः हत्ती व इतर लहान लहान चित्रं रेखाटायचे. त्यांचं रेखाटनामधील हे कौशल्य आणि सहजता पाहून चित्रकार असलेल्या काकांनी चित्रकलेचं प्राथमिक तंत्र, सिद्धांत आणि कानमंत्र त्यांना दिला.

चित्रकार काका रवि वर्मा यांना ते 9 वर्षांचे असतानाच राजवाड्यात घेऊन गेले. तेव्हा त्यावेळचे त्रावणकोरचे महाराज ‘आयील्यम तिरुनाल’ यांनी या छोट्या चित्रकाराचं स्किल क्षणात ओळखलं आणि त्यांनी रवि वर्मा यांना पुढील शिक्षणासाठी राजमहालातच राहण्याचे आदेश दिले. इथं त्यांची पाश्चात्य चित्रशैलीत हातखंडा असलेले राजचित्रकार रामस्वामी नाईकर आणि डच भित्तीचित्रकार थिओडोर जॉन्सन यांच्याशी भेट झाली.

या काळात चित्रकलेला व्यावसायिक दर्जा वा कलाकाराला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. तरीही या दोन महान चित्रकारांकडून प्रभावित होतं आपण चित्रकारचं व्हायचं, असं रवि वर्मांनी ठरवलं.

पुढील जवळपास 9 वर्षाच्या काळात त्यांनी नाईकर आणि जाॅन्सन यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक अपरिचित रंग तंत्राज्ञान, रंग मिश्रण यांवरती प्रयोग केले, निसर्ग दृश्यं, मानवाकृतीचा तपशीलवार अभ्यास केला. पोर्ट्रेट पेंटिंग, लॅण्डस्केप पेंटिंग हे प्रकार त्यांनी इथचं शिकले. त्याकरिता त्रावणकोरच्या राजानं आपल्या संग्रहातील युरोपीयन कलाकारांच्या तैलचित्रांचा खजिना त्यांना उपलब्ध करून दिला.

1866 मध्ये त्यांचा विवाह राजघराण्यातील मुलीशी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव महाप्रभाअम्मा. याच वेळी रवि वर्मा यांच्या मेव्हण्यानं त्यांना विन्सर ॲण्ड न्यूटनची तैलरंगांची पेटी भेट दिली आणि इथूनच त्यांच्या चित्रकलेच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली.

त्यानंतर रवि वर्मा यांनी मद्रासचं फाइन आर्ट प्रदर्शन, व्हिएन्नाच्या प्रदर्शनासह अनेक नावाजलेल्या चित्रकला स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके पटकावली. आणि संपूर्ण भारतात रवी वर्मांच्या चित्रांची चर्चा सुरू झाली.

त्यांच्या कलेचा गौरव म्हणून तत्कालिन राजानं त्यांना राजा ही पदवी बहाल केली आणि रवि वर्मा राजा रवि वर्मा म्हणून ओळखले जावू लागले.

पुढं राजा रवी वर्मा यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडं चित्रं काढण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. हे चित्रांचं काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांनी म्हैसूर, भावनगर, बिकानेर, जयपूर अशा अनेक भारतीय संस्थानांच्या राजमहालांच्या भिंती आपली चित्र अजरामर केल्या.

1885 मध्ये महाराजा श्री चामराजेंद्र वोडीयार यांनी स्वतःचं पोर्ट्रेट व म्हैसूरच्या जगमोहन पॅलेससाठी पौराणिक चित्रांची मालिका करण्यासाठी रवि वर्मा यांना आमंत्रित केलं. या कलादालनाची रचना रविवर्मा यांनी केली आणि भारतातील उत्तम कलादालन निर्मितीचा मान त्यांना मिळाला.

1894 मध्ये राजा रवि वर्मा आपल्या भावाबरोबर मुंबईला आले. मुंबईत असताना त्यांना अनेक प्रसिद्ध व्यक्तींची व्यक्तिचित्रं काढण्याचं काम मिळालं. त्यात त्यांनी पारंपरिक वेषातील सुप्र‌सिद्ध गायिकांची अवर्णनीय पोर्ट्रेटस् केली. दिवसा चित्र काढणं आणि संध्याकाळी संगीत, नाटक, नृत्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं हा त्यांचा त्यावेळचा दिनक्रम होता. मुंबईतील या कार्यक्रमातूनच त्यांना आपल्या चित्रांसाठी सुंदर रूपवान मॉडेल्स मिळत.

रवि वर्मा यांच्या चित्रांमधून देवतांना मानवी चेहरा मिळाला :

धार्मिक आणि पौराणिक प्रसंग सर्वसामान्य लोकांना परिचित असल्यानं त्याचा उपयोग करूनच लोकांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करणं सोपं होईल हे रवि वर्मा यांनी जाणलं आणि त्यांनी साडीमधील स्वरस्वती आणि महालक्ष्मी यांची चित्रं काढली. अनेक हिंदू देवघरांत राजा रवि वर्मा यांनी काढलेली ही देवदेवतांची चित्रं लावली गेली.

विशेष म्हणजे विविध राज्यातील स्त्रियांच्या वेशभूषेचा अभ्यास करुन त्यांनी महाराष्ट्राच्या नऊवारी साडीची निवड देवतांच्या वेशभूषेसाठी केली.

कृष्ण, विष्णू, शीव, गणपती, गौरी, काली, विष्णूचे अवतार, कृष्ण जन्म, कालिया मर्दन, कंस वध, राधा गोपिकांसह कृष्ण, राम तसेच गोवर्धन, रामदास, योगी गोपीचंद इत्यादी राजांची चित्रे. रामायण, महाभारत या कथांमधील अनेक चित्रं त्यांनी रेखाटली. त्यामध्ये अगदी सर्वांना परिचित असलेलं हनुमानानं छाती फाडुन राम सीतेचे दर्शन घडवलं, हे चित्रदेखील राजा रविवर्मा यांनी काढलेलं आहे.

नल-दमयंतीची कथा, शकुंतलेची कथा या त्यांच्या चित्रातून दिसतात. शंकर-पार्वती गणपतीला घेऊन भ्रमण करत आहेत आणि बाल गणपती पार्वतीच्या मांडीवर आहे असं चित्र, अप्सरा मेनका, उर्वशी यांची चित्रं देखील त्यांनी काढली आहेत. यातील अनेक चित्रे विविध संस्थांनामध्ये आजही जतन करुन ठेवली आहेत.

प्रेसची स्थापना :

धार्मिक चित्रांची ही लोकप्रियता पाहून रविवर्मा यांनी लोकांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशानं लिथोग्राफिक प्रेसची स्थापना केली. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके सुरुवातीच्या काळात राजा रविवर्मा यांच्याकडं या रंगीत छापखान्यात कामाला होते. दादासाहेब फाळके यांचं मशीन मधलं कौशल्य पाहून राजा रविवर्मा प्रभावित झाले होते.

सातारा जिल्ह्यातील औंधच्या भवानी म्युझियममध्येही रवि वर्मांची चित्रे :

राजा रवि वर्मा यांनी काढलेली चित्रे औंधच्या भवानी म्युझियममध्येही पाहायला मिळतात. याचं कारण म्हणजे औंधचे तत्कालीन राजपुत्र बाळासाहेब प्रतिनिधी हे कलाप्रेमी व स्वतः चित्रकार होते. तसेच त्यांनी राजा रवि वर्मा यांच्याकडून ही चित्रकलेचे घडे घेतले होते.

असे पहिलेच भारतीय :

भारतातले ते एकमेव व्यक्ती होते की त्यांच्यासाठी एक स्वतंत्र पोस्ट ऑफिस उभारलं होतं. ते प्रसिद्ध असल्यामुळे रोज त्यांना लाखो पत्रं यायची. त्याकाळातला ‘कैसर ए हिंद’ हा सर्वोच्च सन्मान 1904 साली भारताचे व्हाॅईसराॅय लाॅर्ड कर्झन यांनी त्यांना बहाल केला. आणि हा किताब मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते.

रवि वर्मा आणि वाद :

रवि वर्मा यांच्या आयुष्यात आलेल्या एका स्त्री मुळं त्यांच्यावर खूप टीका झाली. ती एका वेश्येची मुलगी होती असे म्हटले जातं. तसेच ती त्यांची प्रेयसीही होती. त्यांनी तिची अनेक नग्न, अर्धनग्न चित्रं काढली. अर्थात ती त्यांची खाजगी चित्र होती, पण काही कारणामुळे ती बाहेर आली. तसेच त्यांच्या चित्रांमध्ये स्त्री किंवा देवता यांचा जो चेहरा आहे तो चेहराही त्यांचं प्रियसीचा आहे, आणि ती अशी साडी नेसायची त्यामुळे त्यांना अनेक वादांना तोंड द्यावे लागले.

त्यांच्या या कृत्यामुळे भारतात अनेक ठिकाणी त्यांच्यावर खटले दाखल केले गेले. त्यांनी मिळवलेला बराचसा पैसा असे खटले चालवण्यात घालवला, आणि मनस्तापही सहन केला. कट्टर धार्मिक लोकांना त्यांचा इतका राग यायचा की त्यांचा मुंबईतला रंगीत छापखाना जाळण्यात आला असं म्हटलं जातं. ज्यामध्ये अनेक मौल्यवान पेंटिंग्स जळून खाक झाली

पण अखेरीस हे सत्य मान्य करावेच लागेल की राजा रविवर्मा यांनी त्यांच्या चित्रातून केवळ देवी-देवतांना चेहरे दिले नाही, तर त्या चेहऱ्यांनी देवतांची ओळख बनवली. मंदिरात केवळ काही जातींसाठी असलेल्या देवांना त्यांनी चित्रामधून सर्वसामान्य भक्तांना दर्शनासाठी मंदिराबाहेर आणलं.

रवि वर्मा यांच्यावर आधारित चित्रपट :

राजा रवि वर्मा यांच्या आयुष्यावर आधारित ‘रंग रसिया’ सिनेमा 2014 मध्ये केतन मेहता यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात राजा रविवर्मा यांचे पात्र रणदीप हुडा यांनी साकारलं होते.

  •  भिडू ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.