आपण यांना ओळखलत का..?

काल रात्रीच्या सुमारास हडपसर येथील सावळाहरी या आईस्क्रिम पार्लरमध्ये मित्रासोबत गेलो होतो. ५० टक्यांमध्ये आईस्क्रिमची ऑफर चालू आहे म्हणल्यानंतर एकामागून एक ऑर्डर देण्याचा पराक्रम चालू होता. इतक्यात साधारण ८०-९० वयाचे हे गृहस्थ आईस्क्रिमच्या दूकानात आले. हातात काठी, डोळ्यावर चष्मा, अंधूक झालेली नजर, अंगावर झब्बा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कोणीतरी व्रतस्थ माणूस असावा अस वाटतं होतं.

इतक्यात समोरचा मित्र म्हणालाच, ओळखलस का यांना.. 

साहजिक ओळखण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण कोणीतरी मोठ्ठी असामी असावी अस मनापासून वाटतं होतं. तोच समोरचा मित्र म्हणाला हे राजदत्त. प्रसिद्ध दिग्दर्शक.

वडिलांकडून कधीकाळी राजदत्त यांचे नाव ऐकलं होतं पण ते किती मोठ्ठे असावेत याची जाणिव नव्हती. मित्राला सिनेमाचा नाद. तो कोणतेही सिनेमे दिग्दर्शकांच्या नावाने पाहतो. अमुकतमूक दिग्दर्शकाचे संपुर्ण सिनेमे पाहून काढले ही त्याची पद्धत.

तो म्हणाला, तूला सर्जा पिक्चर आठवतो का? अजिंक्य देवचा सर्जा हे समीकरण लक्षात राहण्यासारखचं आहे. तो म्हणाला सर्जा सिनेमा त्यांचाच. “दृष्ट लागण्या जोगे सारे” हे गाणं असणारा अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीसचा “माझं घर माझ संसार” हा सिनेमा देखील त्यांचाच. टिव्हीवर सुपरहिट झालेली पहिली मालिका गोट्या ही देखील त्यांचीच. पुण्याच्या कुप्रसिद्ध जोशी अभ्यंकर हत्याकांडावर असणारा नाना पाटेकरचा माफीचा साक्षीदार सिनेमा देखील त्यांचाच.

तो पुढे एकामागून एक सिनेमे सांगू लागला, पुढचं पाऊल, अर्धांगिनी, हेच माझं माहेर, मुंबईचा फौजदार, राघुमैना, सासू वरचढ जावाई, आपलेच दात आपलेच ओठ, अरे संसार संसार, अष्ट विनायक, चंद्र होता साक्षीला, देवकी नंदन गोपाला, या सुखांनो या, देवमाणूस, असे अनेक पिक्चर या माणसाने कित्येक भारी भारी पिक्चरचे दिग्दर्शन केले.

गेली चार दशके या माणसाने मराठी चित्रपट सृष्टी फक्त जगवलीच नाही तर सिनेमे हे फक्त मनोरंजनाचं माध्यम नसून ते शिक्षणाच माध्यम आहे हे लोकांच्या मनावर ठसवलं.

राजदत्त यांच मुळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू. चित्रपट क्षेत्रात त्यांचे गुरू होते राजा परांजपे. त्यांच्या नावातील राज आणि आपल्या नावातील दत्त घेवून त्यांनी स्वत:च नाव राजदत्त केलं. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील धामणगावचा. वर्धाच्या जी.एस. कॉलेजमध्ये त्यांनी कॉमर्सची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अत्र्यांच्या उद्याचा संसार, साष्टांग नमस्कार या नाटकात भाग घेतला. त्यांना राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले. पुणे त्यांनी तरुण भारत नागपूर येथील युनिर्व्हसिटी या लेखातून पत्रकारिता करण्यास सुरवात केली. त्यानंतर लहान मुलांच्या चांदोबा या मासिकाच्या संपादकिय विभागात त्यांनी काम करण्यास सुरवात केली.

पुणे गोवा मुक्ती संग्रामात ते सक्रिय राहिले. बेळगावहून त्यांनी कुणकुणभी ठिकाण गाठले. पोलीस स्टेशनच्या समोरचा पोर्तूगीज झेंडा काढून तिरंगा फडकवला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात सोनवणे नावाच्या सहकाऱ्याच्या पायाला गोळी लागली. तेव्हा तराफ्यावर त्याला बसवून त्याला जीवनदान मिळवून दिलं. त्यांना तेव्हा अटक होवून शिक्षा देखील झाली होती. 

मद्रास येथे कार्यरत असताना राजाभाऊ परांजपे यांच्या ओळखीमुळे AVM स्टुडियोची जवळून ओळख करता आली. हेच कारण राजदत्त यांना सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी कारणीभूत ठरले. त्यांनंतरच्या काळात त्यांनी राजाभाऊ परांजपे यांच्यासाठी सहाय्यक दिग्दर्शन करण्यास सुरवात केली. एकूण १३ सिनेमांसाठी सहाय्य केल्यानंतर त्यांनी स्वत:चा मधुचंद्र सिनेमा दिग्दर्शित केला. हा सिनेमा १९६७ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर भालजी पेंढारकर आणि लता मंगेशकर यांच्या मदतीतून घरची राणी नावाचा सिनेमा तयार केला. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्त्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार या सिनेमाला मिळाला व त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

एकामागून एक असे त्यांनी २८ सिनेमे दिग्दर्शीत केले. त्यांपैकी ९ सिनेमांना प्रथम क्रमांकाच्या पुरस्कांरांनी राज्य शासनाने गौरवले. त्यांना एकूण १४ राज्यसरकारचे पुरस्कार मिळाले.

सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे ते मराठीतील एकमेव दिग्दर्शक आहेत. 

त्यांच्या शापित, पुढचं पाऊल आणि सर्जा या तीन सिनेमांना रजतकमळ पुरस्काराने गौरवण्यात आले. फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर असणारा देवकी नंदन गोपाला हा चित्रपट तेव्हा अमेरिका आणि इंग्लडमध्ये प्रदर्शित झाला होता. तांश्कद फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा सिमेमा दाखवण्यात आला. शापिय या त्यांच्या चित्रपटाचा गौरव रशियन कौन्सिलने केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये मानाचे स्थान मिळाले.

राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या ‘शापित’,’पुढचं पाऊल’ आणि ‘सर्जा’ या तीन चित्रपटांना ‘रजतकमळ’मिळालंय. चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेअर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला.

राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले.

फक्त सिनेमाचं नाही तर मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. 

गोट्या नावाची मालिका अनेकांना आठवत असेल. या मालिकेचे दिग्दर्शन त्यांनीच केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एक कहाणी या हिंदी मालिकेतील गोकुळ या कथेचा समावेश युनेस्कोच्या लायब्रेरीत करण्यात आला आहे. त्यांची यशस्वी घौडदौड पाहून राजीव गांधी यांनी त्यांनी विनंती केली होती. त्यानंतर इन सर्च ऑफ सोल्यूशन नावाची मालिका आकारास आली.

चित्रपटाच्या बरोबरच दूरदर्शन मालिका आणि अनेक टेलिफिल्मचे दिग्दर्शनहि त्यांनी केले आहे.. ‘एक कहाणी’ ही हिंदी मालिका त्यातील ‘गोकुळ’ ही मधू मंगेश कर्णिक यांची कथा ही मालिका युनेस्कोच्या लायब्ररीत आहे. समाजातल्या प्रश्नांबाबत चर्चा करणारी ‘इन सर्च ऑफ सोल्यूशन’ ही सुद्धा हिंदीतील मालिका. ही मालिका करण्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजदत्त यांना सांगितले होते. राजदत्त यांनी एकूण १० मालिकांचे दिग्दर्शन केले.

असा हा चौफेर जगलेला माणूस आमच्यासमोर शांतपणे बसलेला होता. मनापासून हसत होता अगदी लहानमुलांसारखं आईस्क्रिम खात होता. इतका मोठ्ठा माणूस आपणाला पहायला मिळाला या खूषीत आम्ही होतो. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Raju vikram motkar says

    खूपच छान लिहिले आहे धन्यवाद बोलभिडू

Leave A Reply

Your email address will not be published.