त्याने सनी देओल ला ढाई किलोचा हात दिला.

विनोद चोप्रा (विधू वाला) अत्यंत फटकळ, शिवराळ पंजाबी काश्मिरी. नाना आणि तो परिंदाच्या वेळेला कित्येकदा वाईट तंडले आहेत. अशा माणसासमोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं की तुझ्या प्रॉडक्शन मधला जॉब चांगले पैसे देतोय पण मला या कामात मजा येत नाही. मी जॉब सोडतोय. कठीण गोष्ट.

तरीही राज कुमार संतोषी या तरुण मुलाने ते धारिष्ट्य केलं आणि चोप्रा खुश होऊन म्हणाला.

“राज, खूप कमी माणसांमध्ये हे धैर्य असतं जे फायदा नुकसान न बघता आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे त्याला महत्व देतात. खूप मोठा होशील.”

असं असून सुद्धा खूप खडतर मार्ग होता संतोषीच्या पुढे आणि मागेसुद्धा. गतकाळातल्या सुप्रसिद्ध लेखक गीतकार दिग्दर्शक पी.एल. संतोषी यांच्या द्वितीय पत्नीपासून झालेल्या मुलांमधला पहिला मुलगा राजकुमार.

आई चेन्नईची तामिळी. पी.एल. संतोषी आपल्या काळातल मोठं प्रस्थ. त्यांनी साक्षात ‘देव आनंद’ ला ‘हम एक हैं’ मधून ब्रेक दिलेला, ‘बरसात की एक रात’ हा सुपरहिट चित्रपट दिलेला, ‘आना मेरी जान मेरी जान संडे के संडे’, ‘नींद ना मुझ को आये’ आणि अशी अनेक बेहतरीन गाणी लिहिणारा हा माणूस जो म्हणे एकेकाळी पन्नास शंभर च्या नोटांखेरीज इतर छोट्या नोटा, चिल्लर ला हात लावायचा नाही. त्याला इतके वाईट दिवस आले की एकेकाळी त्याचा ड्रायव्हर असणाऱ्या मेहमूदकडे ते संवाद लिहिण्याच्या कामावर लागले.

वडील निर्धन अवस्थेत गेले तेव्हा राजकुमार संतोषी त्यांना (फुकट) असिस्ट करत होता. मग मात्र आई, आज्जी, बहिणी अशा कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी घ्यायची म्हणून आधी विनोद चोप्राकडे आणि मग तिथून गोविंद निहलानीकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाला लागला. निहलानींकडे ‘चक्र’ पासून सुरुवात करून पाच चित्रपट केल्यावर हा परत त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. काहीतरी वेगळं करायला निघतो म्हणून. पण या वेळी मात्र काही जमलं नाहीच तर परत येईन असंही सांगून.

भारतीय सिनेमाच्या सुदैवाने संतोषी कधीही सहायक दिग्दर्शक म्हणून परतला नाही. कारण त्याच्या नशिबात ज्या नियतीने त्याच्या पित्यापासून यश हिरावून घेतलेलं, त्याच नियतीचा राजकुमार संतोषीच्या नशिबात यश, पैसा, प्रसिद्धीच दान टाकण्याशिवाय इलाज नव्हता. त्याला कारण संतोषीची अफाट गुणवत्ता.

आणि ऑफ कोर्स. सनी बाबाने त्याला ऐनवेळी दिलेला हात.

१९९० च्या “घायल” बद्दल काय बोलावं? पारायण झालीयेत. तरीही इतकंच म्हणेन की अजय मेहरा म्हणून कमल हासन किंवा सनी देओल हवा हे ठाम ठरवून, हा सिनेमा रौप्य महोत्सव करणार हे सनीला ठासून सांगून तो सिनेमा करणारा संतोषी हा नव्वदीच्या बदलत्या बॉलिवुडचा, नव्या सनी देओलच्या कारकिर्दीतील एक मानस्तंभ आहे.

अगदी आजही “उतार कर फेंक दो ये वर्दी” म्हणत अंगार बरसणारा सनीबाबा पाहिला की थंड होत असलेलं रक्त उकळू लागतं इतका पॉवर पॅकड सिनेमा आहे घायल…

संतोषीने त्याच्या पदार्पणातच त्याची गुणवत्ता दाखवून दिली होती. पण तेवढ्यावर ना तो थांबणार होता ना सिनेमाचे रसिक प्रेक्षक. तीन वर्षांनी त्याचा “दामिनी” आला. सनी कडून नेमकं काय चांगलं येऊ शकतं याचा गाढा अभ्यास असल्याने मीनाक्षी शेषाद्री या कोल्ड फेस अभिनेत्री व उत्कृष्ट नृत्यांगना हिला कसं सादर करायचं याचा अंदाज संतोषीला नक्कीच आला होता.

असंही म्हणतात तेव्हा संतोषी हा मीनाक्षीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण तिने बस काम से काम रखा. “दामिनी” हा तिचा घायल होता. सुंदर कथा, पटकथा. ऋषी कपूर, खरबंदा, टीनु आनंद, अमरीश पुरी यांची बेहतरीन अदाकारी आणि मध्यंतरानंतर येणारा संतोषीचा लाडका सनी देओल. वकील गोविंद म्हणून. सनीला दामिनी साठी राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला. तरीही सनीला तो रोल तेवढा जमला नव्हता असं आपलं मला वाटतं. (कितीही कट्टर सनीबाबाचा पंखा असलो जरी).

मात्र सनीला ‘ढाई किलो का हाथ’ हा सार्थ ‘जीवन गौरव’ दामिनी ने मिळवून दिला.

त्याच्या पुढच्याच वर्षी संतोषी त्यावेळचे चॉकलेट हिरो आमिर आणि सलमान यांना घेऊन ‘अंदाज अपना अपना’ ही कॉमेडी घेऊन आला. या चित्रपटाच्या मुहूर्ताला चक्क सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी आले होते त्यावेळी.

अंदाज अपना अपना त्यावेळी इतका नाही चालला. लोकांना फार्सिकल कॉमेडीची हिंदी चित्रपटात सवय गेली होती. त्यात ‘घायल’वाल्या संतोषीचा सिनेमा? हा असा? बालिश! फ्लॉप झाला होता अंदाज… शूट मध्ये ही रखडला होता म्हणे कारण सलमानला त्याचा रोल आमिरपेक्षा कमी महत्त्वाचा वाटत होता…

तरी बरं… हेच बेण नंतर म्हणलं होतं. “अभिनय हवा तर आमिरला घ्या” म्हणून.

आजच्या पिढीत मात्र ‘अंदाज अपना अपना’ एक सांस्कृतिक ठेवा झाला आहे. छोटे छोटे संवाद, प्रत्येक पात्र… कितीही वेळा बघा. जुन्या काळात असलेले मेहमूद, शुभा खोटे, धुमाळ, आय एस जोहर, राजेंद्र नाथ यांच्या कॉमेडीची चव आहे…

संतोषीला एक मोठा सिनेमा कमल हासन बरोबर करायचा होता. कमल त्याचा आवडता. घायलच्या पटकथेतही कमलने मदत केलेली. सिनेमाची जुळवाजुळव चालू झाली. कमलला घेऊन करार मदार झाले. आणि माशी शिंकली. सिनेमाचं बजेट खूप जास्त होत होतं आणि दुर्दैवाने कमल हासनचं हिंदीमध्ये तेवढं मार्केट नाही असं फायनान्स देणाऱ्यांच, वितरकांच मत पडलं.कमल भला माणूस! बाजूला झाला.

पण ऐनवेळी या प्रोजेक्ट मध्ये येणार कोण? संतोषीची मैत्री कामी आली. येणार तर सनीच !! सनी देओलला घेऊन चित्रपटाचं काम सुरू झालं. चित्रपट होता १९९६ चा. ‘घातक’

‘घातक’ बद्दल काय लिहिणार? ‘घायल’ बाजूला ठेवावा आणि ‘घातक’ काढावा इतके रसरशीत अंगार सिनेमे आहेत. ‘घातक’ मध्ये सनी व अमरीशजींची केमिस्ट्री अफलातून जमली आहे. विशेषत इस्पितळातून अमरीश पुरी यांना घरी घेऊन जाण्याचा प्रसंग, अमरीशजींच “जीवन की तरह मृत्यू भी एक सच्चाई है” म्हणणं. हे राजकुमार संतोषी आणि त्याच्या पैशांच्या विवंचनेत कफल्लक होऊन केईम इस्पितळात प्राण सोडणाऱ्या एकेकाळच्या प्रख्यात चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक, पी एल संतोषी यांच्या बाप लेकाच्या हळव्या क्षणांच डॉक्युमेंट तर नव्हे…?

खूप सुंदर आहे ‘घातक’ जर नुसत्या काशी आणि त्याच्या वडिलांच्या नात्याला पहाल तर ..”अपने क्रोध को पालना सीख”…वाह…

‘घातक’ मधल्या “कोई आये तो ले जाये” या आयटम साँगच्या वेळी त्यावेळच्या बॉम्बशेल ममता कुलकर्णी हिने संतोषीवर गैर वर्तनाचा आरोप करून त्याला माफी मागायला लावली होती. नशीब तेव्हा सोशल मीडिया नव्हता नाहीतर संतोषी तेव्हाच उठला असता. पण मग मात्र संतोषीची धार हळूहळू कमी होत गेली.

सनी देओल आणि त्याचं भांडण झालं.

इतकं विकोपाला गेलं की दोघांनी भगत सिंह वर सिनेमा बनवून एकाच दिवशी रिलीज करण्याची ठसन केली. सनी २००१ मध्ये ‘गदर’ मधून तर संतोषी २००९ मधून ‘अजब प्रेम की गजब कहानी’ मधून गाजले (संतोषीने मध्ये चायना गेट, खाकी, पुकार, लज्जा असे बरे सिनेमे केले). तरी सुद्धा एकाच रथाची दोन चाकं आहेत ती. संतोषीच्या धुमस्त्या लेखणीला सनी बाबाच्या निरागस डोळ्यात पेटलेला अंगारच शोभतो. अर्थात तेवढंच कर्तृत्व नाहीये राजकुमार संतोषी या माणसाचं. अव्वल दर्जाचा सिनेमा लेखक, दिग्दर्शक आहे तो. त्याने कम बॅक करो न करो. त्याची गुणवत्ता सिद्ध करायला त्याच्या नव्या सिनेमाची गरज नाही.

आजही ‘घातक’ लावला अन् त्यातली चिखलाच्या डबक्यात गटांगळ्या खात बुडणारी पोलीस व्हॅन दिसली तो सिन बघा. त्या वर असलेला लाल लुकलुकता दिवा हळूहळू त्या चिखलात लुप्त होतो… आणि थोड्यावेळाने त्या पाण्यातून सनी डोकं वर काढतो… (हा त्या वेळी घातक चा टीझर असायचा टीव्हीला) हा शॉट बघा. एका क्षणात संतोषी आपल्याला कायदा सुव्यवस्थेची काय लक्तर झालीयेत ते सांगतो. वर सनीचा थंड आवाजातला संवाद…

“अब पुलिस नही… अब मदद करना चाहते हो तो बाहर रहो…”

संतोषी… तू मात्र बाहेर मत राहो. लवकर फिल्मी जगतात परत ये. एक नवा धगधगता सिनेमा घेऊन.

  • भिडू गुरुदत्त सोनसुरकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.