कितीही कॉमेडियन येउदे, पण राजू श्रीवास्तवची सर कोणाला येणार नाही…..

आधी काय सिस्टीम होती की उठसूट ज्याला त्याला हिरो बनायचं होतं, नंतर गायक झाले म्हणजे हे ट्रेंड अजूनही चालूच आहेत त्यात वाद नाही आता येऊ अजून ट्रेंड आलाय तो म्हणजे स्टँड अप कॉमेडियनचा. जोक करायचे ,लोकांना हसवायचं हे राहिलं बाजूला पण स्टँड अप कॉमेडियन कॉमेडी कमी आणि कॉन्ट्रोव्हर्सि जास्त तयार करायला लागले.

पण एक काळ होता आणि त्या काळातला एक धुरंधर होता ,विनोदाचा बादशहा, किंग माणूस होता तो म्हणजे राजू श्रीवास्तव. आजही राजू श्रीवास्तवचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर टॉपला आहेत. मिमिक्रीमध्ये तर या भिडूचा हातच कोणी धरू शकत नाही. भले भले त्याकाळचे कॉमेडीयन राजू श्रीवास्तवने थप्पीला लावले. पण राजू श्रीवास्तव इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.

आज घडीला कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना परिचयाची गरज नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने टेलिव्हिजनच्या दुनियेत कॉमेडी किंगचा दर्जा मिळवला. पण त्याचा संघर्ष जाणून घेण्यासारखा आहे. राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव होते, पण मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव बदलून राजू ठेवले आणि आता लोक त्यांना राजू श्रीवास्तव या नावानेच ओळखतात. राजू हे नाव का निवडलं तर ते लोकांना घरातलं वाटावं म्हणून.

स्टँडअप कॉमेडियनमध्ये राजू श्रीवास्तव यांच्याशी कोणीही बरोबरी करू शकत नाही. त्याने आपल्या कॉमेडीमध्ये कानपूरच्या वातावरणाचा प्रामुख्याने समावेश केला आणि तो हिट झाला. ग्रामीण भागातले पात्र स्टँडअप कॉमेडीचा आत्मा बनवले. गजोधर हे त्यांचे एक पात्र खूप लोकप्रिय आहे. गजोधर भैयाची भूमिका केल्यामुळे बॉलिवूड स्टार्स राजूला गजोधर भैय्या म्हणत असे.

राजूचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कवी असल्याने त्यांना लोकं बलाई काका म्हणत. राजूच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांचे बालपण संघर्षात गेले. 1993 पासून त्यांनी कॉमेडीच्या दुनियेत प्रवेश केला. घरातून सुमडीत पळून त्याने मुंबई गाठली होती. त्याच्या कॉमेडीमध्ये त्याने ग्रामीण, शहरी आणि राजकारणी इत्यादींना टार्गेट करायला सुरुवात केली. मजेदार व्यंग शोधून काढून अचूकपणे त्यावर बोट ठेवून लोकांना हसवायला भाग पाडणे राजू श्रीवास्तवला योग पद्धतीने जमले.

आजही राजू श्रीवास्तव असा कलाकार आहे जो कोणत्याही विषयावर कॉमेडी करू शकतो. तो त्याच्या कुशल मिमिक्रीसाठी ओळखला जातो. तो बहुतांशी अमिताभची नक्कल करतो. अमिताभची अशा प्रकारे नक्कल करतात की लोकांची फसवणूक होऊ लागते की ते खरे अमिताभ किंवा राजू श्रीवास्तव पाहत आहेत. इतकं पर्फेक्ट आवाजाची टोन राजू श्रीवास्तव यांना गवसलेली आहे.

अनेक जाहिरातींमध्ये त्यांनी अमिताभ यांच्या आवाजात डबिंगही केले आहे. आपल्या कॉमेडीमध्ये ते रोजच्या आणि छोट्या छोट्या घटना अतिशय मजेदार पद्धतीने मांडतात. कॉमेडीमध्ये त्याला खरी ओळख ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून मिळाली. या शोमधील त्याच्या अप्रतिम अभिनयाने तो थक्क झाला होता. आज त्याला भारतातच नाही तर परदेशातही त्याच्या कॉमेडीला मान्यता मिळाली. त्यांनी अनेक देशांमध्ये स्टेज शो केले आहेत.

फिल्मी करिअरची सुरुवात तेजाबपासून झाली

राजूने तेजाब या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर राजूने मैंने प्यार किया, बाजीगर, आमदनी अठनी खर्चा रुपया, बिग ब्रदर, बॉम्बे टू गोवा इत्यादी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. याशिवाय त्यांनी शक्तीमान, बिग बॉस, कॉमेडी का महामुक्का, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स विथ कपिल इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

गजोधर केस कापायचा

गजोधर भैय्याचे पात्र, ज्याचा राजूने आपल्या विनोदात उल्लेख केला आहे, ती खरी व्यक्ती आहे. वास्तविक, त्याच्या आजोळमध्ये गजोधर नावाचा एक व्यक्ती आहे, जो लहानपणी राजूचे केस कापत असे. त्याला पाहून त्याने त्याचे पात्र रचले. गजोधरच्या सर्व कथा खऱ्या आहेत. त्यांनी गजोधर नावाच्या व्यक्तीला जगभर प्रसिद्ध केले.

राजकीय कारकीर्द

कॉमेडियन व्यतिरिक्त राजू देखील आज एक नेता आहे. त्यांनी समाजवादी पक्षातून राजकारणाला सुरुवात केली. 2014 च्या लोकसभेत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना कानपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तथापि, नंतर 11 मार्च 2014 रोजी त्यांनी तिकीट परत केले आणि सांगितले की त्यांना पक्षाच्या स्थानिक घटकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर 19 मार्च 2014 रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत.

आजही कितीही भारी भारी कॉमेडियन येऊ द्या पण एक काळ राजू श्रीवास्तवने गाजवला होता हेही खरं…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.