वाळवी लागण्यासाठी अनुदान देवू…आपल्या शिक्षण राज्यमंत्र्यांना वाळवी म्हणजे काय माहित नव्हतं

पार १९७५ चा किस्सा आहे, पुरुषांच्या क्रिकेटमध्ये वर्ल्डकप सारखी मोठी स्पर्धा होत होती, पण दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेटची पावलं हळूहळू पडत होती. भारतीय क्रिकेटनं एक मोठी रिस्क घ्यायचं ठरवलं. ऑस्ट्रेलियाच्या महिला अंडर-२५ टीमला भारतात बोलावलं.

इंटरनॅशनल क्रिकेटचा काहीच अनुभव नसलेल्या भारतीय महिला त्यांच्याविरुद्ध खेळल्या. विशेष म्हणजे चारही मॅचेस ड्रॉ करण्यात भारतीय महिलांना यश आलं.

त्या पहिल्यावहिल्या महिलांच्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाकडून खेळलेलं एक नाव होतं, ते म्हणजे चंद्रिका केनिया.

राईटी बॅटर आणि लेफ्ट आर्म स्पिनर असणाऱ्या चंद्रिका त्यांच्या फ्लाईटेड बॉलिंगसाठी प्रसिद्ध होत्या.

त्या भारतीय संघातल्या अनेक जणींनी पुढं जाऊन आपलं क्रिकेटप्रेम कायम ठेवलं, तर काही जणींनी क्रिकेट सोडून इतर वाटांवर चालायचं ठरवलं. चंद्रिका केनिया यांनी आपल्या क्रिकेट करिअरनंतर राजकारणाची वाट धरायचं ठरवलं.

राजकारणात त्यांनी प्रवेश केला काँग्रेसमध्ये, विशेष म्हणजे त्या कुलाब्यातून आमदार म्हणून निवडूनही आल्या. राज्यात काँग्रेस सत्तेत होतं, शंकरराव चव्हाण तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी चंद्रिका यांना शिक्षण खात्याच्या राज्यमंत्रीपदी संधी दिली.

तेव्हा शंकररावांनी स्वतःच एक नियम घालून दिला होता तो म्हणजे कुणा एका राज्यमंत्र्यानं तरी विधान परिषदेत उपस्थित असायला हवं.

या नियमानुसार एकदा चंद्रिका केनिया विधानपरिषदेत उपस्थित होत्या. तेव्हा शिवसेना नेते आणि ज्येष्ठ विधानपरिषद सदस्य प्रमोद नवलकर यांनी एक प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले,

‘शासनाकडून राज्यातल्या अनेक ठिकाणी वाचनालयं उभारण्यात आली आहेत; मात्र तिथं देखभालीअभावी अनेक पुस्तकांना आणि ग्रंथांना वाळवी लागली आहे. शासन त्याबाबत काय उपाययोजना करणार आहे ? याचं उत्तर मला हवं आहे’

राज्यमंत्री म्हणून केनिया यांना या प्रश्नाचं उत्तर देणं कमप्राप्त होतं, पण एक समस्या होती की हिंदीभाषिक असल्यानं त्याचं मराठी यथातथाच होतं, त्या मराठी बोलू शकत होत्या पण समजून घेणं त्यांना जड जायचं.

नवलकरांच्या प्रश्नातला ‘वाळवी लागते’ याचा अर्थ त्यांनी ‘आणखी वाळवी उपलब्ध व्हावी’ असा घेतला असावा.

कारण या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या,

‘नवलकरसाहेब सदनाचे जुने सदस्य आहेत. त्यांनी पुस्तकं आणि ग्रंथांना लागणार्‍या वाळवीचा प्रश्न उपस्थित केला आहे. मी आश्वासन देऊ इच्छिते की, पुस्तकं आणि ग्रंथांना वाळवी लावण्यासाठी कितीही खर्च आला तरी हे सरकार पैसा कमी पडू देणार नाही.’

अर्थ समजण्यात गल्लत झाली आणि केनिया यांच्या उत्तरानं त्यांची चांगलीच फजिती झाली. सभापती जयंतराव टिळक यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी बाकावरचे सदस्य हसू लागले, पण नवलकरांनी मात्र केनिया यांना वाळवी काय असते, तिचा फटका कसा बसतो हे सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

सगळ्या सदस्यांनी हे प्रकरण हसत खेळत घेतल्यानं वाद रंगला नाही.

पुढं चंद्रिका केनिया शिवसेनेकडून राज्यसभा खासदार झाल्या. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘मला काँग्रेस आणि शिवसेना-भाजप युतीच्या सरकारकडून फार अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराशा केली.’ समाजवादी पार्टीनं ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली आणि चंद्रिका यांचा सामना झाला प्रकाश परांजपे यांच्याशी.

चंद्रिका यांचा प्रचार मात्र चांगलाच गाजला, त्यांनी प्रचारात वापरलेल्या साड्या, हिऱ्यांचे दागिने, हिल्सच्या चपल्या यांची भरपूर चर्चा झाली. आपण मोठ्या मार्जिननं प्रकाश परांजपे यांना हरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या प्रचाराचा स्लोगन होता…

दिल्ली मे सोनिया, ठाणे मे केनिया

मात्र या निवडणुकीत प्रकाश परांजपे यांनी बाजी मारली. चंद्रिका दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

या पराभवानंतर केनिया यांचं नाव चर्चेत आलं, ते २०१४ मध्ये. राजधानी एक्सप्रेसमधल्या एका वेटरनं त्यांच्यावर ‘आपल्याला मुस्काडात मारली’ असा आरोप केला होता. संतोष कुमार नावाच्या त्या वेटरनं पोलिस तक्रारही नोंदवली होती.

त्याचं म्हणणं होतं की, ”चंद्रिका यांना ब्रेकफास्टमध्ये दिलेलं सफरचंद फार छोटं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी चिडून मॅनेजरशी बोलण्याची मागणी केली होती. मी मॅनेजरला घेऊन आलो, तेव्हा त्यांनी सफरचंद छोटं असल्याच्या कारणावरुन माझ्या मुस्काडीत मारली. याआधी त्यांनी आईस्क्रीम द्यायला उशीर झाला म्हणून माझ्या सहकाऱ्याच्याही मुस्काडीत मारली होती.”

आणखी एका वादामुळं चंद्रिका केनिया हे नाव बातम्यांमध्ये आलं होतं, ते २०१५ मध्ये.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपचं सरकार होतं. फडणवीस सरकारनं सरकारी बंगल्यात राहिलेल्या ज्या माजी मंत्र्यांची फोनबिलं थकीत आहेत, त्यांची एक यादी केली. या यादीत चंद्रिका केनिया यांचं नाव आलं.

त्यांचं ३ महिन्यांचं फोनबिल थकलं होतं आणि थकबाकीचा आकडा होता, २ लाख ४१ हजार २७२ रुपये.

भारताच्या अंडर-२५ संघाचं प्रतिनिधित्व करणं, राज्यसभा खासदार, महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि ठाण्यात सेनेला आव्हान देणाऱ्या उमेदवार म्हणून उभं राहणं अशा वेगवेगळ्या घटना चंद्रिका केनिया यांच्या कारकिर्दीत घडल्या. मात्र त्यांचं नाव गाजलं, ते वाळवी, सफरचंद आणि फोन बिलाच्या किस्स्यामुळं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.