आता राडा करणाऱ्या राखीनं अंबानींच्या लग्नात ५० रुपयांसाठी केटरिंगचं काम केलंय…

सध्या बॉलिवुडमध्ये कंगना राणावत राडे करत असताना दिसत असली, तरी हा मान एकेकाळी बॉलिवूडची आयटम गर्ल म्हणून फेमस असणाऱ्या राखी सावंतला जायचा. अजूनही राखी सावंत आपल्या विविध स्टंटमुळे चर्चेत असल्याचं दिसून येतं. राजकारणात जाणं असो किंवा गुप्त पध्दतीने केलेलं लग्न असो किंवा एखाद्याला डिवचणं असो सगळीकडे राखी सावंतची हवा दिसून येते. पण बॉलिवूडच्या या आयटम गर्लची दुसरी बाजूसुद्धा जाणून घ्यायला हवी; ज्यामुळं राखी सावंतबद्दल आदर वाटायला लागतो.

‘अग्निचक्र’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या राखीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट आयटम साँग दिले; मात्र हे स्थान मिळवण्यासाठी राखीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या राखीने तिचं बालपण त्रासात आणि भीतीमध्ये घालवलं आहे.

खुपते तिथे गुप्ते या रिॲलिटी शो मध्ये राखीने सांगितलं होतं की, वयाच्या १० व्या वर्षी राखी सावंत अंबानी कुटुंबाच्या लग्नात लोकांना जेवण देण्याचं अर्थात केटरिंग आणि वाढपी म्हणून काम करत होती तेही 50 रुपये रोजाने. विश्वास बसणार नाही पण लहानपणापासूनच राखी सावंतचं आयुष्य खडतर परिस्थितीत गेलं.

एका मुलाखतीत राखीनं सांगितलं होतं की, ‘तिचं कुटुंब खूप गरीब होतं. तिची आई हॉस्पिटलमध्ये परिचारिका (नर्स) म्हणून काम करत होती आणि वडील मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते. त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करणं खूप कठीण होतं. कधी कधी अशी वेळ त्यांच्या कुटुंबावर यायची की त्यांच्याकडे खायलाही अन्न नव्हतं. त्यांचे शेजारी त्यांना उरलेलं अन्न द्यायचे. त्या शिळ्यापाक्या अन्नावर राखी सावंत वाढली.

लहानपणापासूनच माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीला बघून आपणही अभिनेत्री व्हायचं स्वप्न राखीने उराशी बाळगलं होतं. वयाच्या 11 व्या वर्षी राखीनं दांडियामध्ये नाचण्याचा आग्रह धरला, तेव्हा तिच्या आई आणि मामानी मिळून राखीचे लांब केस कापले. केस अशा प्रकारे कापले होते की, केस जळाल्यासारखे वाटत होते. घरातून विरोध होता, त्यात वडिलांचा धाक आणि आईचा मार याला राखी वैतागली होती.

फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी तिने घरातून पैसे चोरले आणि पळून गेली. कारण तिच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिने लग्न करावे. त्यांना अभिनयातलं काहीच कळत नव्हतं. जेव्हा राखी मुंबईला पोहोचली तेव्हा ती अनेक निर्मात्यांसमोर नाचू लागली आणि टॅलेंट दाखवू लागली, पण सगळ्यांनीच तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं.

राखी म्हणाली होती, ‘मला वाटलं होतं की अशा लोकांसमोर डान्स करण्यापेक्षा मी डान्सबारमध्ये डान्स करेन. मला अनेक वेळा नकाराचा सामना करावा लागला आणि माझे रूप आणि फिजिक्स सुधारण्यासाठी मी शस्त्रक्रिया केली.

तेव्हा मी नीरू भेडा म्हणून शस्त्रक्रियेच्या खोलीत गेले होते; पण राखी सावंत म्हणून माझ्या चांगल्या लूकसह बाहेर पडले. राखी सावंतचं ओरीजनल नाव निरु भेडा असं आहे, पण बॉलीवूडमध्ये हे नाव चालणारं नव्हतं म्हणून तिने अस्सल मराठमोळं नाव स्वीकारलं.

यानंतर राखीला ‘जोरू का गुलाम’, ‘जिस देस में गंगा रहता है’, ‘ये रास्ते में’ अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांची ऑफर आली होती, पण तिला 2005 साली आलेल्या ‘परदेसिया’ या गाण्याने ओळख मिळाली. या गाण्याने राखी आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली. पांढरा शर्ट आणि काळा स्कर्ट ही राखीची पहिली ऑफिशियल आयटम गर्ल म्हणून एन्ट्री झाली होती.

राखी सावंतनेही रिॲलिटी शोच्या दुनियेत ‘राखी का स्वयंवर’ नावाचा रिॲलिटी शो सुरू केला. 2009 मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये राखीने टोरंटोमधील एका सहभागी कार्यकर्त्यासोबत लग्नही केलं होतं आणि काही महिन्यांनंतर त्यांनी वेगळं होण्याची घोषणा केली होती. राखीनं बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. राखीच्या अनेक कॉन्ट्रोव्हर्सि झाल्या, मिका सिंग प्रकरण, दीपक कलाल प्रकरण, बिगबॉसचं घर, राजकारणी लोकांना निर्भीडपणे बोलणं अशा अनेक गोष्टीत राखी सावंत दिसून आली.

इतक्या कॉन्ट्रोव्हर्सि होऊनही राखीचा फॅन बेस कमी झालेला नाही. आजही सोशल मीडियावर तिची हवा दिसून येते. ५० रुपये रोजंदारीवर केटरिंगला जाणारी राखी सावंत आज आलिशान बंगल्यात राहते, यापेक्षा मोठं यश काय असेल…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.