रामभाऊंनी स्वत:च पुर्ण आयुष्य वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिकवण्यात घालवलं

आम्ही कुठून आलो ? कसे आलो ? आमचे अस्तित्व काय ?

हे प्रश्न ज्यांच्या आयुष्याचाच भाग आहे अशा लेकरांना समाजाने नाकारले, झिडकारले अशा लेकरांनी जगावं कसं ?

कुणाचा आधार नाही ना, हक्काचं कुटुंब नाही…

चांगले शिक्षण आणि चांगले आयुष्य हेच ज्यांचे स्वप्न आहे. त्याचे हाल बघवत नाहीत, मात्र अशा मुला-मुलींना स्वतःच्या घरी घेऊन येणाऱ्या एक बापमाणसाची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे.

त्यांचं नाव आहे, रामभाऊ इंगोले.

या क्षेत्रात त्यांनी लक्ष का घातलं असेल असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

रामभाऊ एकदा सेक्स वर्कर्सच्या चार मुलांना घरी घेऊन आले, उद्देश एकच की या चार मुलांचा पालनपोषणाचं मी बघतो. पण घरच्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांनी त्या चार मुलांसह रामभाऊंनाच घरातून बाहेर काढलं. रामभाऊंनी पण हार मानली नाही. त्यांनी भाड्याने घर घेतलं आणि चार मुलांचा सांभाळ करण्यास सुरवात केली. हळूहळू या मुलांची संख्या १६ झाली.

तेव्हापासून रामभाऊने या वेश्यांच्या व त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी लढणार अशी शपथच घेतली,

परंतु ते तितके सोपे नव्हते  !

१९८० मध्ये नागपूरमध्ये वेश्यावस्ती हटवण्यासाठीचे प्रयत्न चालले असतांना त्याविरोधात सर्वात पहिलं आवाज उठवला तो रामभाऊ ने..! 

पण या लढ्यात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वेश्यावस्ती साठी आवाज उठवणारा माणूस लोकांच्या कसं काय पचनी पडेल ? त्यांची पांढरपेशा समाजात कुचंबना तर झालीच, परंतु गुंडाकडून हल्ले देखील झाले होते.

नागपूरमधील या रेड लाईट एरियाला ‘गंगा-जमुना’ हे नाव पडण्याचा इतिहास खूप जुना आहे.

४०० वर्षे जुने असलेली वेश्या वस्ती म्हणजे पुण्यातील बुधवार पेठ.

तेव्हा पुणे नागपूर सारख्या  शहराची व्याप्ती फारशी मोठी नव्हती. अस म्हणतात की कोणी एका राजाने पुण्यातून गंगा आणि जमुना नावाच्या दोन नर्तकी आपल्या शहरात आणल्या. अशाच अजून स्त्रियांना त्याने आपल्या शहराच्या लांब एका जागी वसवले. तेव्हा शहराच्या दूर असलेला हा एरिया नंतर हळूहळू शहरात मध्यवर्ती भागात आला.

आता स्थानिक लोकांना ती जुनी वस्ती ‘नकोशी’ झाली. आणि मग त्यांना हटवण्याचे प्रयत्न झाले. परंतु रामभाऊ त्या महिलांच्या उदरनिर्वाहाच्या अधिकाराच्या बचावासाठी समोर आले.  परिणामी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने माघार घेतली.

रामभाऊ सांगतात की,

”सुरुवातीला वाटायचं वेश्यांना किंवा त्यांच्या संपूर्ण घटकाला तिथून बाहेर काढू, तेथील जगणे म्हणजे मरण्यापेक्षाही अवघड. परंतु हि अशक्यप्राय गोष्ट होती. पूर्णपणे आमच्या क्षमतेच्या बाहेर, कारण त्यासाठी प्रमाणात संसाधनांची आवश्यकता आणि प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीही तितकीच महत्वाची”

“त्या वेश्यांना तिथून बाहेर काढू शकत नाही मात्र त्यांच्या मुलांचे भविष्य आपण वाचवू शकतो”.

आणि मग रामभाऊ त्या मार्गाने निघाले, या मुलांचे पुर्नवसन करण्याचा त्यांचा निर्धार इतका पक्का होता कि, ते आयुष्यभर अविवाहित राहिले.

त्या मुलांच्या आरोग्याच्या, शिक्षणाच्या अगदी बेसिक गरजा पूर्ण करणे काही सोपी गोष्ट नव्हती. घरातून तर विरोध होता. परंतु त्यांना साथ मिळाली ते त्यांच्या मित्रांची.

१९९२ साली नागपूर शहरात उदयनगर भागात ‘विमल आश्रम घरकुला’ची स्थापना केली. तेव्हापासून ती संस्था वेश्यांच्या मुलाबाळांचे आणि अनाथ वंचित मुलांचे पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, स्वावलंबी बनवण्यासाठी शिक्षण देत आहे. 

संस्थेच्या विद्यमाने ‘पाचगाव’येथे नवीन देसाई निवासी विद्यासंकुल उभे राहिले आहे. वीस मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेत आता दोनशे विद्यार्थी आहेत.

या कार्यात त्यांना मित्रांनी तर मदत केलीच पण साधारण आयुष्य जगणारे हे मित्र एका मर्यादेत मदत करू शकली. यूएस मध्ये राहणारे नवीन चन्द्र देसाई रामभाऊ यांच्याशी जोडले गेले. त्यांनी रेजीडेंशियल स्कूल ची स्थापना करावी असा विचार मांडला आणि यूएस मधील इतरही मित्रांकडून आर्थिक मदत घेतली. पण याच दरम्यान नवीन चन्द्र यांचे निधन झाले.

याच मदतीतून रामभाऊ यांनी नागपुरात ५ एकर जमीन घेतली.

आणि २००७ मध्ये नवीन चन्द्र यांच्या स्मरणार्थ रेजीडेंशियल स्कूल स्थापन केले. तसेच आम्रपाली उत्कर्ष संघ नावाची नावाची संस्थाही स्थापन केली. या नवीन चन्द्र रेजीडेंशियल स्कूल मध्ये १५७ विद्यार्थी शिकत आहेत. त्यातील बरेच मुलं -मुली शिक्षण पूर्ण करून त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रमले आहेत तर त्यातील १३  मुलींची लग्नही झाली आहेत.

यात काही अनाथ मुले आहेत तर कुणी सेक्स वर्कर्सची मुल, तर काही छत्तीसगड, ओरिसा मधून आलेल्या दगड फोडणाऱ्या स्थलांतरित मजुरांची मुले आहेत.

जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा संस्थेला शासनाकडून नोटीस आली कि, स्थलांतरित विध्यार्थ्यांना त्यांच्या घरी वापस पाठवून द्या. त्यामुळे ती पाठवली गेली आणि आज आत्ता त्यांच्या संस्थेत सेक्स वर्कर्स ची मुलं आणि अनाथ अशी मिळून एकूण ४९ मुलं त्यांच्यासोबत आहेत.

वयाच्या २८ व्या वर्षाच्या आधीच आलेले या क्षेत्रात रामभाऊ यांचे वय आज ६२ आहे.

बोल भिडूशी बोलतांना त्यांनी काळजी व्यक्त केली की,

‘त्यांच्या नंतर त्यांच्या मुलांचे कसे होणार. कारण त्यांना अनेक आजारांनी ग्रासलेले आहे. माघेच त्यांना पैरालिसिस अटॅकही येऊन गेला आहे. शिवाय वय झाल्यामुळे त्यांना संस्थेच्या भविष्याची काळजी लागलेली आहे. कारण संस्थेला भविष्यात सक्षमपणे चालवेल असा कुणी वारसदार नसल्याचे ते सांगतात.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे,

संस्थेवर असलेले ८-१० लाखाचे कर्जाचे ओझे आणि त्यात त्यांच्या डोक्यावर असलेल्या जबाबदाऱ्या यामुळे ते खूप व्यतिथ झाले आहेत. आत्तापर्यंत शासनाच्या कुठल्याही अनुदानाशिवाय  त्यांनी केवळ जनसहकार्यातून त्यांनी हि जबाबदारी पार पाडली.

२०१९ मध्ये ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनही घेऊन गेले होते कि, आता या मुलांना इतरांच्या मदतीवर न जगू देता कायमस्वरूपी स्वावलंबी होतील अशी काहीतरी उपाययोजना करा अशी विनंती केली.

तेंव्हा त्यांना वरवर होकार आला परंतु त्याचे पुढे काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

बोल भिडू सोबत बोलतांना त्यांनी, ‘इंडिअन ऑईल कंपनीला’ आवाहन करत सांगितलं,

कोरोनाच्या संकटामुळे रामभाऊ यांना अनेक आर्थिक समस्या आल्यात. शासनही लक्ष देत नव्हतं.  तेवढ्यात नागपूरमधील वर्ध्यातील इंडिअन ऑईल कंपनीचा नायरा डेपो आहे, त्यांनी टँकर्स बाबतीतला कॉन्ट्रॅक्ट प्रसिद्ध केला होता.

संस्थेसाठी काही आर्थिक मार्ग काढावा म्हणून रामभाऊ यांनी तो कॉन्ट्रॅक्ट भरला. कॉन्ट्रॅक्ट मिळणार हे नक्की झाले कि त्यांनी सव्वा कोटींचं कर्ज घेतलं आणि त्यातून ५ टँकर्स विकत घेतले जेणेकरून ते इंडिअन ऑईल कंपनीला भाडेतत्वावर देऊ शकतील आणि येणाऱ्या पैशातून ते संस्थेचा खर्च चालवू शकतील.

परंतु ऐनवेळेस इंडिअन ऑईल कंपनीने त्यांना त्या कॉन्ट्रॅक्टमधून बेकायदेशिररित्या वगळलं आणि त्याचे कारण हि स्पष्ट केले नाही त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत अडकले. कर्ज डोक्यावर आहे आणि गाड्याही जागेवरच आहेत.

वंचीत मुलांसाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे रामभाऊ यातून कसा मार्ग काढतील, त्यांना शासन सहकार्य करेल का हे पाहणे महत्वाचे ठरते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.