मंत्रिपद द्या महामंडळे द्या ; रामदास आठवलेंकडे एवढी बार्गेनिंग पॉवर येती तरी कुठून..?

गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकींनंतर एक ठरलेलं गणित असायचं. निकालानंतर एकतर पाटलांच्या वरच्या अळीला किंवा खालच्या अळीला या दोन ठिकाणांपैकी एकाच ठिकाणी फटाकड्या वाजायच्या. मात्र त्याचवेळी खाल्लीकडच्या भीमवाड्यात मात्र जर निकालाला फटाकड्या असायच्या. यावर वाड्यातल्या दयाभाऊंची एकंच म्हणणं असायचं पाटील कुठलाबी उभा असू दे जिंकणार तोच ज्याला आम्ही मतदान करणार !

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन ३ आठवडे झालेत. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापलीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाहीये? याची सत्राशेसाठ कारणं सांगितली जात आहेत.

मात्र मंत्रिमंडळासाठी लॉबिंग मात्र जोरात चालू आहे.

मंत्रिमंडळात वर्णी लावतो म्हणून आमदारांना १०० कोटींचा चुना लावल्याची बातमी आली आहे. त्याचबरोबर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केलेल्या मागण्यांची देखील चर्चा आहेत.  रामदास आठवले यांनी १ मंत्रिपद, ३-४ चेअरमन पदं आणि महामंडळांची मागणी केली आहे.

याआधीच पक्षाचा एक आमदार किंवा खासदार नसतानाही राज्यसभेची खासदारकी पटकावत रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत.

त्यामुळं रामदास आठवलेंकडे एवढी बार्गेनिंग पॉवर कुठून येते? हा प्रश्न नेहमी पडतो. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप  शिवसेना हे आठवलेंच्या आरपीआयशी युती करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळं रामदास आठवले आपल्याला नेहमी सत्तेत का दिसतात त्याचीच हि काही कारणं.

1) मतं जास्त नसतील पण निर्णायक आहेत

याचं एक उदाहरण आपल्याला दयाभाऊंच्या उत्तरात मिळतं. रामदास आठवले यांच्या पक्षाकडे आज हक्काचे मतदारसंघ नसले तरी प्रत्येक मतदारसंघात निर्णायक मतं आरपीयाकडे असतात असं  निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात. 

पण ही निर्णायक मतं किती आहेत याची पक्की मोजदात मात्र मिळत नाही. मात्र मागच्या निवडणुकीत जेव्हा वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रभर उमेदवार उभा करून आठवलेंच्या आरपीआय गटाची मतं आपल्याकडे वळवली होती त्यावरून एक अंदाज मात्र बांधता येऊ शकेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर उमदेवार उभे केले होते आणि यातील १० ते १२ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी ५० हजारांहून अधिक मतं घेतली होती. आता हि सगळीच आठवले गटाची होती असं नाही पण आठवले गटाकडे किती निर्णायक मतं असतात याची एक कल्पना आपल्याला येते.

2) चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व 

७० च्या दशकात दलित राजा ढाले यांनी दलित पॅंथरची स्थापना केली. नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी चळवळीचे कार्य हाती घेतले. दलित पॅंथरमधील अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आले. त्यापैकी एक रामदास आठवले.

दलित पँथरचा संघर्ष हा दलितांच्या न्याय व हक्कांसाठी झालेल्या आंबेडकरोत्तर चळवळीतील एक अभूतपूर्व क्रांतिकारी लढा होता आणि या लढ्याची लीगसी रामदास आठवले सांगू शकतात.

”पॅंथर बरखास्त केली होती. परंतु, आजही मी पँथर आहे. पॅंथरचे अनेक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्याबद्दल आस्था आहे. पुन्हा एकदा नव्याने समतेची प्रस्थापना करण्यासाठी समाजात बंधुभावना निर्माण करण्यासाठी पॅंथरची उभारणी करणार आहे. खैरलांजी, सोनई, खर्डा, शिर्डी सारख्या घटना आजही घडत आहे. यामुळे आज दलित पँथर असती तर हे शब्द कानावर येतात, त्यावेळी पॅंथरची आठवण होते. यामुळे पॅंथर नव्याने जिवंत करताना त्रास होईल, परंतु दलित पॅंथरची स्थापना करणार आहे.”

अशी आश्वासन देऊन आपली लोकप्रियता फक्त रामदास आठवलेच वाढवू शकतात.

3) आरपीआयचा निळा झेंडा लावण्यासाठी सगळ्यात लोकप्रिय चेहरा 

महाराष्ट्रात 10.5% दलित लोकसंख्या आहे. यापैकी विदर्भात सर्वाधिक 23% दलित आहेत. विधानसभेबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक विधानसभेत सरासरी १५ हजार दलित मतदार आहेत. तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या १५ जागांवर दलित मतदार उमेदवाराचे भवितव्य ठरवतात. त्यामुळे दलितांच्या मतदानशिवाय निवडणूक जाड जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे दलित नेतृत्वाशी आघाडी- युती करणं प्रमुख पक्षांना भाग आहे.

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) ५० पेक्षा जास्त तुकडे झाले आहेत.  गवई गट, आठवले गट, कवाडे गट, सुलेखा कुंभारे गट आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं नाव घेतलं जातं.

यामध्ये आंबेडकर आणि आठवले हे दोघंच पॅन महाराष्ट्र असलेले नेते आहेत. आणि त्यातही आठवलेच फक्त इतर पक्षांशी युती करण्यास तयार असतात.

कविता, ड्रेस ते सतत वक्तव्य करून टीव्हीवर झळकने यामुळे रिपब्लिकन पक्ष म्हटलं का आठवले हेच नाव लोकांच्या डोळ्यासमोर येतं. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपल्याला आरपीआय आठवले गटाचा बोर्ड आपल्याला दिसतो.

रामदास आठवले हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत आणि अजूनही त्यांचा जनसंपर्क आहे. राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू ते अगदी मणिपूरपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या  शाखा आहेत. या राज्यातील कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रेझेन्स आहे ही बाब दुर्लक्षून चालणार नाही

त्यामुळे अगदी पंचायत समितीपासून लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांना मंचावर निळा झेंडा देखील लावायचा असतो तेव्हा ते आठवलेंचाच ऑप्शन त्यांच्यापुढे असतो.  

४) दशकं झाली रिपब्लिकन पक्ष संपल्याची भाषा होता असताना आठवलेंनी पक्ष संभाळला आहे 

आठवलेंवर एक नॉन सिरीयस राजकारणी म्हणून नेहमीच टीका होत राहिली आहे. त्यात मागासवर्गीय समजातून येत असल्याने या टीकेला जातीभेदाचा वासही असतो. मात्र आठवलेंनी सत्तेत राहून बाकीच्या राजकारणांच्या तोडीचं राजकारण देखील केली आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी दलितांचा सत्तेतेतील वाटा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा दिसतो.रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता.

1990 ते 1996 या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाजकल्याम, परिवहन, रोजगार हमी या खात्यांचे मंत्रिपद होते. नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

1998 मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर १९९९ आणि २००४ पंढरपूर असं सलग तीन टर्ममध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 

2009 साली शिर्डी  लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर रामदास आठवले यांचे आघाडी सरकारशी बिनसले.

त्यामुळे 2011 मध्ये रामदास आठवले आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर रामदास आठवले 2014 साली राज्यसभेवर निवडून गेले. तर 2016 मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्यामधील राज्यमंत्रिपदावर नियुक्ती झाली.

सत्तेचा फायदा त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवल्याचं कार्यकर्ते मान्य करतात. दिल्लीत महाराष्ट्रातील माणूस गेल्यानंतर रामदास आठवले हे लोकांना सहजरित्या उपलब्ध असणारे नेते म्हणून ओळखले जातात.

त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बदल्यांत राजकीय हस्तक्षेप होतो ह्ये उघड उघड सत्य आहे. त्यावेळी दलित अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न येतो तेव्हा आठवले आपलं राजकीय वजन वापरतात असा अनुभवही काही उच्चपदस्थ अधिकारी सांगतात.

मागासवर्गीय नवउद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या व्हेंचर कॅपिटल फंड’ची उपलब्धता होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, खाजगी क्षेत्रात दलितांना आरक्षण असावे. असे दलितांसाठी काळानुरूप वेगळे अजेंडे सेट करतानाही आठवले आपल्याला दिसतात.

त्यामुळे दलित समाजात जरी मोठ्या प्रमाणात नसली तरी आठवले आपली विश्वासार्ह्यता टिकवून आहेत.

या सर्व गोष्टी रामदास आठवले यांच्याकडे एवढी बार्गेनिंग पॉवर का आहे? हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.