आयला रे आयला, हात्तीच्या मायला…😂

काल रामदेवबाबा हत्तीवरून पडले म्हणे, आपली लोकं पण लय बाराची आहेत. माणूस मग तो संसदेच्या पायऱ्यांवरून पडूदे नायतर निवडणूकीत पडूदे, माणूस पडलेला दिसला रे दिसला की दात काढायला सुरवात करतात. पडण्यात पण लय प्रकार असतात भिडू. म्हणजे कोण प्रेमात पडतो, कोण इलेक्शनमध्ये पडतो, आत्ता आमचंच घ्या की, आम्ही MPSC त नापास झालो म्हणून पत्रकारतेत पडलो.

थोडक्यात काय तर अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर पडणं ही पण आपली मुलभूत गरज आहे.

आत्ता यातले काही प्रकार थेट असतात.

म्हणजे कसं तर संसदेच्या पायऱ्यावरून पडलं की सगळा देश बघतो आणि दात काढतो पण एखाद्याच्या नजरेतून पडलं की कुणाला काही कळत नाही. मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो म्हणत-म्हणत कित्येक भिडूलोक एफसी रोडपासून झेड ब्रिजवर आपापलं पडणं सेलिब्रेट करत अस्त्यात. एक पोरगा बारीकपनी वटवाघळांच्या विहिरीत पडला होता तर बॅटमॅन होऊनच निघला!

काल रामदेवबाबांबरोबर पण असच झालं बघा. रामदेवबाबा हत्तीवरून पडले म्हणून लोकं हसली. मागच्या वेळी सायकलवरून पडले तेव्हाही काही चाबऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती.

पण लोकांना कुठं माहिताय रामदेवबाबांना पडायची जूनी सवय आहे ते..

ते कुठंकुठं पडलेत ह्याचा नुसता हिशोब घ्यायचा म्हनलं तरी तुमचं डोकं खर्ची पडंल.

आत्ता सुरवात करुया पतंजली पासून.

पतंजली म्हणजे काय? कोण म्हणलं पतंजली म्हणजे योगा, तर कोण म्हणलं पतंजली म्हणजे टुथपेस्ट, पतंजली म्हणजे तेल, पतंजली म्हणजे बिस्कीट, असो तर बिस्किट पत्रकारीता बाजूला सारून पतंजली म्हणजे कोण हे सांगूया…

तर पतंजली जून्या काळातले लय मोठ्ठे ऋषी. इसवी सनाच्या २०० ते ३५० सालाचा कालखंड त्यांचा असावा अस सांगितलं जातं. शुंग राजाच्या काळात ते होऊन गेले. पण यावर इतिहासकाराचं एकमत नाही. प्रथेप्रमाणे ते एकमत ठेवत नाहीत तो भाग वेगळा.

तर ते भयानक व्हर्साटाईल व्यक्ती होते. त्यांनी योगसुत्रे नावाचा ग्रंथ लिहला. १९६ संस्कृत सुत्रे मांडून जे ज्ञान समाजापुढे मांडलं ते खतरनाक पद्धतीचं होतं.

त्यामुळे झालं काय तर त्यांच्या पुस्तकांच जगभरातल्या भाषेत भाषांतर झालं. अगदी अरबी भाषेत सुद्धा. आत्ता या पुस्तकात काय होतं तर योग म्हणजे हातपाय वाकडे करण्याची कला नसून योग म्हणजे शांततेच्या स्थिर अवस्थेतलं मन.

त्यासाठीची सुत्र म्हणजे योगसुत्र.

आत्ता या योगात आठ सुत्रे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम,प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आत्ता मेन मुद्दा हा की यातलं आसन आणि प्राणायाम हेच फक्त शरिराशी संबधीत आहे. आसन म्हणजे शरीराला स्वस्थ ठेवणे आणि प्राणायाम म्हणजे शारिरीक क्रिया.

ह्या दोन गोष्टी सोडून हा देवमाणूस कुठंच दुसरीकडं पडला नाही. पण त्याचं नाव वापरून लोकं कुठंकुठं पडली, त्याला मोजदाद नाही. त्यात सगळ्यात मोठी उडी मारली ती आपल्या रामदेवबाबा यांनी.

आता पतंजलीला ओपीडी आयुर्वेद आणि आयपीडी आयुर्वेदिक सर्जरी कशी माहीत..!

पण त्याच्या नावाने योगपीठ आणि दवाखाने उघडून बाबांनी ही किमया साधली आणि त्याला पार कोरोनाच्या औषधापर्यंत लांबवत नेला.

रामदेवबाबा यांना ह्याच्यात पाडणारा माणूस म्हणजे त्यांचे गुरू स्वामी शंकरदेव..!

त्यांनी दिव्ययोग मंदिर आणि पतंजली योगपीठ सुरू करत ह्या प्रकाराला चालना दिली. १९३० मध्ये जन्मलेल्या ह्या महाराजांनी नंतर संन्यास घेतला आणि गंगेच्या किनारी पतंजलीच्या नावाने काम करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात किरकोळ गावातल्या लोकांना जडीबुटी देण्याच्या पातळीवर सुरू असणारं हे काम व्यावसायिक होईल अशी कल्पनाही त्यांनी केली नसंल पण त्यांनी एका माणसाला ह्यात पाडलं आणि त्या माणसानं सगळीकडं त्याचा धुरळा उडवला.

१९९५ साली त्यांनी राम किसन यादव नावाच्या माणसाला दीक्षा दिली. ह्याच माणसानं मधल्या काळात स्वामी शंकरदेव हेही नाव वापरून पाहिलं होतं.

२५ वर्षाच्या ह्या भिडूकडं नव्या जगात आत्मविश्वासाने पडायची धमक होती.

हा तरुण म्हणजे रामदेवबाबा!

त्यांनी पतंजलीच्या योगविद्येला शरीरासाठीच्या विविध आसनांमध्ये बदलून टाकलं. १९७१ सालापासून अमेरिकेत गेलेल्या बिक्रम चौधरी यांनी ह्याच योगाला श्रीमंत अमेरिकन लोकांसाठी दिलेलं हॉट योगाचं स्वरूप त्यांनी पाहिलेलं होतं. भारतातल्या लोकांसाठी व जागतिकीकरणात ग्लोबल होणाऱ्या भारतीयांना विकायला त्यांनी हा योगा नव्या रुपात सादर करायला सुरुवात केली.

उद्या जिमचा ट्रेनर तुम्हाला येत्या निवडणुकीत कुणाला कसं मत द्यायचं किंवा भारताची अर्थव्यवस्था हे सांगत बसला तर तुम्ही ऐकाल काय?

मग मन शांत करणाऱ्या योगामध्ये भाषणे आणि विनोद आणि टाळ्या वाजवणं शक्य तरी होतं का? त्यांनी पतंजलीला स्वदेशीत पाडलं आणि आपल्या लवचिक बॉडी आणि शार्पशूटिंग भाषणाच्या जोरावर त्यांनी हाही माल भारतीयांना सहजी पचवला! (आणि अजून पचवत आहेत!)

जगात प्राचीन भारतीय विद्यांविषयी पसरलेलं गूढ पैसा कमावण्याचा राजमार्ग बनलं होतं. दर मोठ्या देशातून लोक सुखाचा शोध घ्यायला भारताकडे ओढली जात होती. देशोदेशी हरे कृष्ण मंदिरांनी गर्दी केली होती. भारतात किंमत नसलेले योगगुरू परदेशात जाऊन रोल्सरॉयसमध्ये तिथल्या राष्ट्रप्रमुखांसोबत हिंडत होते.

ह्यापासून भारतीय मात्र खरी गोची माहीत असल्याने म्हणा किंवा त्यांनी हे मार्केटच न ओळखल्याने म्हणा, सेफ राहिले होते. त्या सगळ्या तमाम भारतीयांना नुसता टीव्ही वापरून उचललं आणि जगाच्या हेल्थकेयर कलकलाटात नेऊन सोडलं.

जसजसा लोकांचा कल आहार आणि आरोग्याकडे वाढला, येथील व्यवसायाची आणि त्यातही एखाद्या भगव्या कपड्यातल्या योगी माणसाची पोहोच रामदेवबाबा यांच्या लक्षात आली आणि ते ह्या व्यवसायात पडले. नुसतेच पडले नाहीत तर आपल्या घरदार-पाहुणे घेऊन पडले.

2003 साली लागलेला आस्था चॅनेल त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला.

सकाळी उठून टीव्हीवर देवाची गाणी लागण्याच्या वेळेत अचानक स्क्रीनवर पाय आणि हात डोक्याच्या मागे नेऊन पोट हलवणारा ह्यो माणूस घराघरात चर्चेचा विषय बनला. त्यातही बाबाजी फक्त योगावर बोलायचे नाहीत. सूचक राजकीय कॉमेंट्री, नटनट्या आणि क्रिकेटची किस्से सांगून, फॅमिली छापचे विनोद मारून त्यांनी लोकांसमोर गूळ पाडला.

अवघड आणि आपल्या लिमिटपलीकडच्या वाटणाऱ्या योगाला सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. ह्यात पतंजलीने सांगितलेल्या कशाचाच अंश नव्हता, अन बाबांनी त्याला सगळ्या उद्योगात पाडलं आणि जगभर मिरवलं.

रोजच्या रोज टीव्हीवर येणाऱ्या ह्या भगव्या कपड्यातल्या मिठ्ठास बोलणाऱ्या माणसाला लोकांनी आपलं मानलं. भारतावर पतंजलीच्या नावाचा पगडाच एवढा होता की त्याच्या नावाखाली कोरोनावरची औषधेही खपून गेली. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण तापलं असताना त्यात आपलं मार्केट आगीसारखं फैलावणाऱ्या गर्दीत रामदेवबाबा मोठं नाव होतं.
आता नाव मोठं झाल्यावर भारतात माणूस काय करतो?

पिक्चर, क्रिकेट नायतर राजकारण..!

निःसंकोचपणे बाबाजी राजकारणात पडले आणि काँग्रेसला पाडणे आपले जीवनकार्य आहे म्हणून त्यांनी कंबर कसली. आधी थेट देशाचं राजकारण आपल्या भारत स्वाभिमान पक्षाद्वारे बदलू पाहणाऱ्या स्वामीजींनी नंतर मोदींना जाहीर पाठिंबा दिला.

ह्यावर त्यांना जेव्हा पोलीस धरायला गेले तेव्हा ते आईच्या आठवणीनं ओढणी गुंडाळून पंजाबी ड्रेसमध्ये अडकले आणि गुपचूप बाहेर पडले.

पुढं त्यांच्या कित्येक योगशिबिरांवर निवडणूक आयोगाने “राजकीयदृष्ट्या प्रेरित” म्हणून कारवाई केली तेव्हाही ते थेट लढाईत पडले आणि आपल्याला बॅकप देणारं सरकार येइपर्यंत त्यांनी कित्येक योजना राखून ठेवल्या. मोदींनी आपलं कॅम्पेन पसरवायला ठेवलेल्या नऊ माणसांमध्ये रामदेवबाबा एक होते. गॉडमॅन ते टायकून म्हणजे साधू ते व्यापारी हा प्रवास त्यांनी कसा पार पाडला हे लोकांच्या लक्षातच आलं नाही.

आपला जिगरी दोस्त बाळकृष्ण ह्यांनाही उद्योगात पाडून त्यांनी कंपनीचे ९८% शेयर दोस्ताच्या नावे करून दिले. पण हे त्यांनी कधीच उघडं पडू दिलं नाही..!

पतंजलीचा कारभार वाढला तसा त्यांनी आपल्या वडिलांनाही ह्यात पाडलं आणि कंपनीचा परदेशातील सर्व व्यवहार त्यांच्याकडं दिला. त्यांचे बंधू रामभारत ह्यच्याकडे आधीपासून फायनान्स पार पाडायची जबाबदारी आहे.

रामदेवबाबा ह्यांचं खरं आयुष्य मांडणाऱ्या एका पत्रकार बाईंनी, प्रियांका पाठक यांनी एक पुस्तक लिहिलं तर त्यांनी तिला असा धोबीपछाड दिला की प्रकाशनापूर्वीच कोर्टाने बंदी घातली आणि निर्बंध घातले की तिला पुस्तकाचं नावही सोशल मीडियावर घेण्यास मनाई केली.

असं कुणालापण खुलेआम पाडायची ताकद त्यांनी पतंजलीच्या जोरावर कमावली म्हणत असाल, तर तुमचंच बरोबरय !

आपल्या नावाचे नूडल्स आणि शाम्पू बघून पतंजली भोवळ येऊन पडंल पण बाबा अजून आपल्या पडझडी सांभाळत अजून नव्या फंदात पडायचे मार्ग शोधत असतात. २०२० च्या आयपीएलला स्पॉन्सर म्हणून दुबईत पतंजली न्यायचा त्यांचा प्लॅन होता पण ड्रीम इलेव्हनने तो पाडलाच!

त्यांची एवढी धडपड लक्षात असणारा कोणताच माणूस बाबा हत्तीवरून पडले म्हणून हसणार नाही…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.