म्हणून भारताचे प्रत्येक पंतप्रधान रत्नम कंपनीचाच पेन विकत घेतात….
एक जमाना होता की शिक्षक लोकं म्हणायचे जो शाई पेनने पेपर सोडवेल त्याला पाच मार्क एक्स्ट्रा मिळणार. सुंदर अक्षर हाच खरा दागिना वैगरे वैगरे. ते पाच मार्क वैगरे सगळ्या चिक्क्या होत्या सरांच्या. सचिन धोनीच्या जाहिरातीत सुद्धा पेन आणि अक्षरं महत्वाचे वाटून जायचे.
सिनेमातसुद्धा दाखवायचे की पोरं बोर्डाच्या पेपरला शाईपेन किंवा फाऊंटन पेन घेऊन जायचे. आता हा इतका सगळा नॉस्टॅल्जियाचा माहोल झालेला असताना किस्सा सुद्धा रत्नम फाऊंटन पेनाचा आहे.
पण किस्सा रत्नम फाऊंटन पेनाचाच का तर सविस्तर जाणून घेऊ.
आजवरच्या एकूण निरीक्षणात तुम्हाला एक तर कळलंच असेल की फाऊंटन पेनने लिहिणारी लोकं हळूहळू कमी कमी झाली. म्हणजे शाई पेन आणि फाऊंटन पेनने लिहिणं हीसुद्धा एक कला होती.
या पेनांमध्ये शाई भरून, दौत व्यवस्थित पुसून, सांडलेली शाई डोक्याला लावून लोकं लिहायला बसायचे. एकेकाळची दौलत म्हणून फाऊंटन पेनकडे बघितलं जायचं. महत्वाच्या गोष्टी शाई पेनने किंवा फाऊंटन पेनने लिहिण्याचा नाद लागला याबाबत तर वादच नाही. या पेनामुळे बंधुभाव म्हणा किंवा प्रेमभाव म्हणा सगळं शाबूत राहू लागलं.
यामुळे एकदा काय झालेल की जर्मन चांसलर अँजेला मर्केल नोव्हेंबर 2019 मध्ये भारत दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रत्नम कंपनीचा पेन त्यांना स्वागत भेट म्हणून दिला होता. रत्नम फाऊंटन पेन लिहायला बेस्ट होता म्हणून भारताचे पंतप्रधान आणि प्रेसिडेंट लोकं आजही रत्नम फाऊंटन पेनचं वापरतात.
आता हा रत्नम पेन इतका हवाहवासा वाटण्याचं कारण काय ?
पेनाच्या बनावटीचा आणि कारागिरीचा विचार तूर्तास बाजूला ठेवूया. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवसापासूनची या पेनाची लेगसी आहे.
रत्नमची स्टोरी सुरु होते ती 1921 पासून जेव्हा रत्नमचे हेड के.व्ही. रत्नम हे गांधीजींना आंध्र प्रदेशातील राजाहमुंडिरी इथ भेटले. गांधीजी आधीपासूनच आत्मनिर्भर आणि स्वदेशी गोष्टींना प्राधान्य देणारे होते.
स्वदेशी चळवळीला सगळयात मोठं बॅकग्राऊंड हे महात्मा गांधी यांचं होतं.
रत्नम यांनी गांधी बापूंना विचारलं कीी,
मी आपल्या देशासाठी कशा प्रकारची मदत करू शकतो. यावर गांधीजी म्हणाले,
छोट्याशा पिन पासून ते पेनापर्यंत सगळ्या प्रकारची मदत करू शकतोस.
पुढच्या भेटीत रत्नम आले ते थेट पेन घेऊनच.
रत्नम यांनी तब्बल 11 वर्षे हा रत्नम फाऊंटन पेन बनवण्यात घालवले. 1932-33 साली के.व्ही. रत्नम यांनी महात्मा गांधीजींना तो पेन भेट दिला.
पण घडलं उलटच गांधीजींनी तो पेनच रिजेक्ट करून टाकला कारण तो पेन बनवताना त्यात इम्पोर्टेड मटेरियल होतं. पण वर्षभराच्या कालावधीतच रत्नम यांनी स्वदेशी फाऊंटन पेन बनवून आणला.
गांधीजी त्या नव्या पेनामुळे खुश झाले आणि त्यांनी अजुन असे पेन देशभर गेले पाहिजे म्हणून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी रत्नम यांना देऊन टाकली. रत्नम यांनी सहा वेगवेगळ्या डिझाईनने मार्केटमध्ये एन्ट्री केली, विश्वास बसणार नाही पण आजही रत्नमचे पेन मार्केटमध्ये टॉपमध्ये आहेत.
या सहा व्हरायटीची स्वतःची एक वेगळी स्पेशालिटी होती. उदाहरणार्थ तेव्हाच्या पत्रकार लोकांसाठी कुठ्ल्याही निबला कलाकुसर नव्हती त्यामुळे ते कुठूनही कोणत्याही अँगलने लिहायला सोपं जायचं. हे सगळे पेन स्वदेशी असल्याने या पेनांची चलती होती.
एक पेन तयार करायला तेव्हा 2 ते 3 दिवस लागायचे आणि कंपनी अशा प्रकारे महिनाभरात 300 पेन तयार करायची.
हा रत्नम पेन वापरलेले काही दिग्गज लोकं आपण पाहूया त्यात,
डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्णन, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, यू एस प्रेसिडेंट आयसेनहावर, निकिता कृशेव्ह, रामनाथ गोएंका, आचार्य विनोबा भावे यांच्या समवेत बऱ्याच लोकांनी ह्या पेनचा लाभ घेतलेला आहे.
त्यामुळं लय मोठी हिस्ट्री या पेनाला आहे. कधी आंध्र प्रदेशातील राजाहमुंडिरीला गेले तर तिथंच रत्नम पेनाच दुकान आहे घ्यायला अजिबात विसरू नका.
हे ही वाच भिडू :
- नुसता पेन बदलल्याने सुभाष चंद्रांनी राज्यसभा गाठली होती
- ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ ही प्रार्थना गाणाऱ्या गायिकेला आज पेन्शनसाठी झगडावं लागतंय
- त्यावेळी वर्गात दोन गट होते, एक पेपरक्वीनवाल्यांचा आणि दुसरा चायना पेनवाल्यांचा..
- शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्यता लिखाणातून आपल्यापुढे आणण्याचं काम केलं ते हेन्री ओक्झेंडनने