आयुष्यभर तो नाव बदलुन पाकिस्तानात राहिला, कथा भारताच्या ब्लॅक टायगरची.

नुकताच जॉन अब्राहमच्या रोमियो अकबर वॉल्टर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. आतापर्यंत 23 कोटींच्यावर लोकांनी हा ट्रेलर पाहिला. या ट्रेलरमध्ये जी स्टोरी दाखवण्यात आली तीच या देशप्रेमी शुरवीर जवानाची गोष्ट. हि गोष्ट सत्य घटनेवर आधारीत असून ती भारताच्या गुप्तहेर खात्यासाठी एक अभिमानाची कथा असणाऱ्या रविंद्र कौशिक वर आधारित असल्याच सांगण्यात येत आहे. २०१२ साली सलमान खानचा एक थां टायगर देखील रविंद्र कौशिकच्या जीवनावर आधारित असल्याच सांगण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात सिनेमा पाहिल्यानंतर रविंद्र कौशिक यांच जीवन आणि एक था टायगरची कथा याचा दूरदूर संबंध नसल्याच दिसून आलं.

पण आज अनेकांना प्रश्न पडतो रविंद्र कौशीक कोण होते? 

इतिहासाच्या पानांवर त्यांचा उल्लेख द ब्लॅक टायगर असा केला जातो. ते साल होतं १९५२ चं. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघे पाच वर्ष झाली होती. भारत एका नव्या टप्प्यावर होता. नेहरूच्या मार्गदर्शनाखाली भारत प्रगतीची स्वप्न पाहत होता. त्यावेळी राजस्थानमधील गंगानगर मध्ये ११ अप्रैल १९५२ ला रविंद्र कौशिकचा जन्म झाला. रविंद्र अभ्यासात बरा होता. मात्र शाळेतल्या अभ्यासापेक्षा रविंद्रला नाटकात काम करायला जास्त आवडायचं त्यामुळे रविंद्र वर्गात कमी आणि नाटकात जास्त दिसायला लागला. कॉलेजमध्ये गेल्यावरही हा नाटकांचा सिलसिला चालूच होता. कॉलेजमध्ये रविंद्रनं चांगलं नाव कमावलं होतं.

कॉलेजला असतांना रविंद्र एकदा नाटकांसाठी लखनऊला गेला होता. त्या नाटकाच्यावेळेस रॉ च्या काही अधिकाऱ्यांची नजर रविंद्रवर पडली. त्यांना रविंद्रचं काम आवडलं आणि त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. पहिल्याच भेटीत रविंद्रला नोकरीची ऑफर देवून दिल्लीत बोलवण्यात आलं.

त्यानंतर रविंद्र दिल्लीला गेला. काही चाचण्या पास केल्यानंतर आणि संपुर्ण चौकशी केल्यानंतर त्याला खऱ्या गोष्टी सांगण्यात आल्या. रविंद्रला रॉ साठी गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी विचारण्यात आलं. पण यासाठी अट एकच होती. तो काय काम करतोय, कोणासाठी करतोय याची कल्पना कोणत्याही व्यक्तीला न देण्याची. त्याला संपुर्ण आयुष्य पणाला लावायचं होतं.

घरच्यांचा, नातेवाईकांचा, मित्रांचा कायमचा त्य़ाग करायचा होता. वाटते तेवढी हि सोप्पी गोष्ट नव्हती, मात्र रविद्रनं या कामासाठी तात्काळ होकार दिला. देश प्रेम दाखवण्यासाठी यापेक्षा मोठी संधी कोणती असु शकते असं त्याला वाटलं.

काम करण्यासाठी होकार देऊन रविंद्र पुन्हा घरी आला होता. मला दुबईला नोकरी मिळालीय लगेच कामावर हजर व्हायचंय, असं खोटं सांगून दिल्लीला परत आला.

दिल्लीत आल्यानंतर रविद्रला दोन वर्ष ट्रेनींग देण्यात आली. मुस्लिम रितीरिवाज शिकवण्यात आले. उर्दू लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकवली. रविद्रला दोन वर्षात अस्सल मुसलमान बनवण्यात आलं होतं.

तेव्हा सालं होतं १९७५.

रविंद्र अशा टप्प्यावर होता की त्याचं आयुष्य आता कायमचं बदलणार होतं. पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून रविंद्र कौशीकला पाठवण्यात येणार होतं. रविंद्रला नबी अहमद शाकिर असं नाव देण्यात आलं. रविंद्र कौशीकचा आता नबी अहमद शाकिर झाला होता.

रविंद्रला सुरूवातीला दुबईला पाठवण्यात आलं. दुबईतून पाकिस्तानमध्ये. रविंद्रसाठी म्हणजेच नबी अहमद शाकिरसाठी पाकिस्तान नवीन होता. त्याला तिथं नवीन ओळख तयार करायची होती. आस्तित्व तयार करायचं होतं. जेणेकरून कोणालाच न समजता तिथलंची माहिती रॉ पर्यंत पोहचावयाची होती.

रविंद्रनं सुरवातीला तिथलंच्या कराची विद्यापिठात LLB साठी अॅडमिशन घेतलं. तिथं ओळख निर्माण केली आणि LLB चं शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर रविंद्रनं तिथं असं काम केलं ज्याची कल्पना रॉ ला सुद्धा नव्हती.

पाकिस्तान आर्मीमध्ये भरती सुरू आहे, अशी जाहिरात रविंद्रनं एका पेपरमध्ये वाचली आणि भरतीसाठी अप्लाय केला. आणि बघता बघता आर्मी भरतीच्या सगळ्या परिक्षा पास केल्या आणि पाकिस्तान आर्मीत अधिकारी बनला. जेव्हा रॉ ला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना त्यांच्या अफाट बुद्धीचं, जिद्द आणि चिकाटीचं कौतुक वाटलं.

रविंद्र आता पाकिस्तान आर्मीत अधिकारी झाला होता. त्यानं पाकिस्तानात स्व:ताची वेगळी ओळख तयार केली होती. तिथलंच्याच एका अधिकाऱ्यांच्या मुलगी अमानत शी रविंद्रचं प्रेम होतं. रविंद्रने तीच्यासोबत लग्न केलं, या दोघांना एक एक मुलगा देखील होता.

हे सगळं एकीकडं होत असतांना रविंद्रला आपल्या देशभक्तीचं, कर्तव्याचं पुरतं भान होतं. १९७९ ते १९८३ पर्यंत रविंद्रनं रॉ ला अनेक गुप्त माहिती पाठवली. ज्यामुळे अनेक भारतीय सैन्याचे प्राण वाचले होते. रविंद्रच्या या कामगिरीमुळं भारतीय गुप्तहेर खात्यात त्याला THE BLACK TIGER या नावानं ओळखत होते.

असं सांगितलं जातं की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी रविंद्रला हे नाव दिलं होतं. त्याच्याकडून मिळणारी माहिती अत्यंत गुप्त असल्याने वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या संबधांमुळे त्यांनी रविंद्रला हे टोपन नाव दिलं होतं. 

सगळं सुरळीत सुरू होतं. रविंद्रनं आपलं तंबू पाकिस्तानात घट्ट बसवला बसवला. मात्र एका घटनेनं रविंद्रला नेस्तनाबुत केलं.

साल होतं, १९८३.

भारतीय गुप्तहेर खातं आपल्या एका एजंटला रविंद्र कुमारला भेटण्यासाठी पाठवतात. मात्र तो भारतीय एजंट पाकिस्तान गुप्तहेर खात्याच्या तावडीत सापडतो. त्या भारतीय एजंटला दोन-चार दिवस डांबून ठेवण्यात येतं. मार मार मारलं जातं. या सगळ्याला कंटाळून भारतीय एजंट रविंद्रबद्दल सांगतो.

हे सगळं समजल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणतात. आपल्या आर्मीत भारताचा गुप्तहेर कोण आहे, याचा शोध घेण्यात येतो. आणि रविंद्रला पकडण्यात येतं. मात्र, रविंद्रला पकडल्यानंतर माहिती विचारण्यासाठी पाकिस्तानकडून तब्बल दोन वर्षे टॉर्चर करण्यात येतं. असं सांगण्यात येतंय की रविंद्रची पत्नी अमानत हीला सुद्धा एकदाच भेटून दिलं होतं. त्य़ानंतर तीच्या बद्दल काहीच समजलं नाही.

१९८५ साली रविंद्र कुमारला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते.

मात्र सुप्रीम कोर्ट ती रद्द करतं आणि २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावतं आणि रविंद्रला पुन्हा जेलमध्ये डांबण्यात य़ेतं. रविंद्र १९८७ साली भारतातील आपल्या घरी पत्र लिहितो. मी सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये आहे आणि भारताच्या गुप्तहेर खात्याचा एजंट आहे. कारण गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात गेल्यानंतर रविंद्र जेमतेम चार ते पाच वेळेसच भारतात आला होता. दुबईत आपण लग्न केलेलं आहे आणि मला मुलगाही असं त्यानं कुटुंबाला सांगितलं होतं. पण आत्ता मिळालेला पत्रामुळं घरच्य़ांचा पायाखालची जमीन सरकते.

या सगळ्यानंतर रविंद्रची आई अटल बिहारी वाजपेयी, एल.के.आडवाणी यांना भेटते रविंद्रबद्दल सांगते. मात्र गोपनीयतेच्या कारणांमुळे त्यांना नेहमीच मोघम उत्तर देण्यात येत असतं. अखेर रविंद्रच्या भाऊ मौन तोडून माध्यमांशी संपर्क साधतो, 

तो माध्यमांना सांगतो, भारत सरकारने माझ्या भावाला वाचवण्यासाठी विशेष काही प्रयत्न केले अस वाटतं नाही.

साहजिक या गोष्टींची योग्य माहिती सरकारकडून देणं सुरक्षेच्या कारणावरून चुक होतं. त्यातही आपला गुप्तहेर आहे हे मान्य करण त्याहून आत्मघातकी निर्णय होता. शेवटच्या काळात भारतीय सरकारकडून प्रयत्न झाले नाहीत म्हणून रविंद्र कौशीक नाराज असल्याच सांगण्यात येतं. त्यासाठी त्याने जेलमधून आईला लिहलेल्या पत्रांचा संदर्भ देण्यात येतो.

अखेर 2001 साली टीबी आणि ह्रदय रोगाच्या कारणांमुळे रविंद्र कौशीक ऊर्फ नबी अहमद शाकीर आणि THE BLACK TIGER चा मृत्यू झाला होता. रविंद्रच्या मृत्यूनंतर त्याचं पार्थीवसुद्धा भारतानं स्वीकारलं नाही. ते स्वीकारलं असतं तर भारताने आपले गुप्तहेर पाकिस्तानमध्ये आहेत हे जाहिरपणे मान्य करण्यासारखं होतं. अखेर पाकिस्तानच्या भूमीतच त्याला दफन करण्यात आलं.

भारतासाठी संपुर्ण आयुष्यपणाला लावणाऱ्या या ब्लॅक टायगरची मात्र एक दंतकथा बनली. जी आजही पुस्तक आणि मासिक आणि सिनेमा मधून सांगितली जाते. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.