एक फेल गेलेलं औषध आज कोरोनाच्या लढ्यातील प्रमुख अस्त्र बनलंय

गेले कित्येक महिने संपूर्ण जग कोव्हीड-१९ या विषाणूमुळे ठप्प झाले आहे. करोडो लोकांना याची लागण झाली आहे, लाखोंजन मृत्युमुखी पडले आहेत. अनेक मोठे मोठे देश प्रयत्न करत आहेत पण अजूनही या रोगावर औषध सापडले नाही ना याची खात्रीशीर लस मिळालेली आहे.

अशावेळी या रोगाशी लढा द्यायला एक औषध उपयोगात आणल गेलंय ते म्हणजे रेमडेसीवीर

याची निर्मिती झाली २००९ साली.

हिपॅटायटीस सी या रोगावरील औषध म्हणून. हिपॅटायटीस सी हा देखील एक संसर्गजन्य रोग मात्र तो रक्तातून पसरतो. आजही याच्यावर लस उपलब्ध नाही. जिलीड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने खास या रोगावर उपाय म्हणून अनेक महिन्यांच्या संशोधनाने रेमडिसिव्हर हे औषध बनवलं.

पण दुर्दैव म्हणजे त्याचे क्लिनिकल ट्रायल घेतल्यावर कंपनीच्या लक्षात आले की हे औषध हिपॅटायटीस सी साठी काहीही उपयोगाचे नाही. अनेक संशोधकांची मेहनत पाण्यात गेली होती.

पण जिलीड सायन्सेस ही कंपनी जिद्दी होती. त्यांनी याच औषधाला दुसऱ्या कोणत्या रोगासाठी वापरता येते का याचे प्रयत्न सुरू केले.

अनेक वर्षे गेली. २०१५ साली जगावर इबोला नामक संसर्गजन्य रोगाची महामारी आली. रेमडिसिव्हरचा वापर या रोगासाठी करण्याचे प्रयत्न झाले. सुरवातीला रेमडिसिव्हर इफेकटिव्ह आहे असं वाटत होतं. जिलीड सायन्सने त्याचं उत्पादन देखील वाढवलं मात्र दरम्यानच्या काळात दुसऱ्या कंपन्याची इबोला वरची औषधे आली आणि रेमडिसिव्हर मागे पडले.

तिसऱ्यांदा मारबर्ग या व्हायरल रोगावर प्रयोग झाले. त्यात देखील रेमडिसिव्हर औषध यशस्वी ठरले नाही.

जिलीड सायन्सेस या कंपनीचे फेल गेलेलं औषध म्हणून रेमडिसिव्हरची चेष्टा झाली होती. पण ही अमेरिकन कंपनी खमकी होती. त्यांनी वाट पाहायचं ठरवलं.

अशातच २०२० हे जगाच्या दृष्टीने दुर्दैवी वर्ष उजाडलं.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना या महाभयंकर रोगाने अमेरिका ते भारत प्रत्येक ठिकाणी प्रवेश केला. पूर्णपणे अनोळखी असलेल्या या व्हायरस वर कोणताही उपाय दिसत नव्हता.

यावेळी मात्र रेमडिसिव्हर देवदूत बनून धावून आले.

क्लिनिकल ट्रायल नंतर हे लक्षात आले की इतर औषधांपेक्षा रेमडिसिव्हर हे कोरोनाच्या विषाणूवर प्रचंड गुणकारी आहे. अमेरिकेबरोबरच चीन जपान व रशिया या चार देशात याच्या चाचण्या पार पडल्या व त्यानंतर

साधारण जून महिन्यात गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारात हे औषध वापरलं जाऊ लागलं.

सुरवातीला भारतात या औषधांची निर्मिती होत नसल्यामुळे बांगलादेश मधून रेमडिसिव्हर मागवले जात होते.

मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाला सर्वप्रथम वापर असा नियम करून औषधांचा सर्वच्या सर्व स्टॉक उचलला. अमेरिकेकडे पेटंट असल्यामुळे जगभरात या औषधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली.

अखेर साधारण जुलै महिन्यात सिपला व हिटेरो या दोन कंपन्यांना रेमडिसिव्हरच्या जेनेरिक व्हर्जनला भारतात निर्मिती आणि विक्रीसाठी परवानगी मिळाली. आता सप्टेंबर महिना उजाडला आहे.

आजही भारतात अनेक ठिकाणी रेमडिसिव्हरची कमतरता जाणवत आहे.

व्हेंटिलेटरवर गेलेल्या गंभीर कोरोना रुग्णांना रेमडिसिव्हरच्या ६ इंजक्शनचा कोर्स डॉक्टरांकडून सांगितला जात आहे. पण हे औषध उपलब्ध होत नसल्यामागे अनेक ठिकाणी काळाबाजार होऊ लागला.

५४०० रुपयांना एक mrp असलेले इंजक्शन काही ठिकाणी ३० हजार रुपयांना देखील मिळू लागले. गोरगरिबांना याचा फटका बसला.

अखेर हा काळाबाजार रोखण्यासाठी ठिकठिकाणी प्रशासनातर्फे रेमडिसिव्हर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मागच्या महिन्यापासून इथल्या जिल्हापरिषदेने एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची रेमडिसिव्हर व टाक्सीम्लिम्ब हे इंजेक्शन मोफत वितरित करण्यास सुरुवात केली.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तोही गंभीर असेल तर संबंधित डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी यांच्यापैकी एकाचे शिफारसपत्र असल्यास हे इंजेक्शन दिले जाते.

संबंधित अर्जाची छाननी मेट्रो हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, ऍस्ट्रो आधार या खाजगी रुग्णालयात करण्यात येते. तिथून जर तुम्हाला शिफारसपत्र मिळाले तर जिल्हापरिषदेच्या कागलकर हाऊस येथील औषध भांडार येथे प्रत्येक रुग्णाला ६ इंजेक्शन मोफत दिले जाते.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे औषध भांडार नियंत्रणाची जबाबदारी आहे.

मात्र दुर्दैवाने येथे प्रचंड रांगा लागू लागल्या आहेत. स्टॉकच्या कमतरतेमुळे रुग्णांना एका वेळी फक्त दोनच इंजेक्शन देण्यात येत आहे. बाहेरच्या गावातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची बरीच गैरसोय मनस्ताप सहन करावा लागत आहे.

काही वेळा राजकीय दबावाचा देखील वापर केला जात आहे मात्र प्रशासन फर्स्ट कमी फर्स्ट सर्व्ह या बेसिस वर औषध देण्यावर ठाम असल्यामुळे काही वेळा वादावादी व तक्रारी, आंदोलने असे प्रसंग देखील घडत आहेत.

जो पर्यंत कोरोनावरील औषधाचा व लसीचा शोध लागत नाही तो पर्यंत तरी रेमडिसिव्हर हे औषध रामबाण उपाय ठरले आहे आणि भारत शासनाने देशातील सर्व कोव्हीड सेंटरवर अत्यल्प दरात ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावे अशी मागणी सगळीकडे केली जात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.