टि शर्ट विकून अवघ्या १२ व्या वर्षी दिड कोटींची मालकीण.

पोरीच वय बारा वर्ष. ती एका कंपनीची CEO आहे. वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या CEO चा लॉन्गफॉर्म देखील माहित नव्हता. पण ती पोरगी CEO आहे. बर फक्त CEO असती तरी कौतुकाची गोष्ट नव्हती, पण या पोरगीनं एका वर्षात दिड कोटी कमवलेत. कंपनीचा निव्वळ नफा दिड कोटी. नेट प्राफिट. GST वगैरे सोडून. मग कसय जितकी हि गोष्ट धक्का बसण्यासारखी आहे तितकीच लाजीरवाणी देखील आहे. (लाजीरवाणी आपल्यासाठी वो) हिकडं आपण MPSC, UPSC करतो ते पण वयाच्या २० व्या वर्षी. आणि ती पोरगी बाराव्या वर्षी दिड कोट कमवते…!

मग आम्ही म्हणलं हि गोष्ट भिडू लोकांपर्यन्त पोहचवली पाहीजे, काय माहिती त्यातून एखाद्या भिडूला अशीच काहीतरी आयड्या आली तर एखाद्याचं भलं देखील होईल. असो.

तर आत्ता या बाराव्या वर्षात दिड कोटींचा व्यवसाय करणाऱ्या पोरगीचा बिझनेस प्लॅन सांगतो.

अमेरिकेच्या लॉस एंजेल्स मध्ये खेरीस रॉजर्स या बारा वर्षाच्या मुलीची टी-शर्टची स्वतःची कंपनी आहे. तिच्या कंपनीचे नाव आहे, “प्लेक्सीन इन माय कंप्लेक्शन.” करोडोची कमाई करणारी खेरीस रॉजर्स ही विकत असलेल्या टी-शर्टवर पॉझिटिव्ह कंटेंट छापून विकते. ती टी-शर्टवर आपल्या त्वचेच्या रंगाला घेऊन “निराश राहू नका येणारा प्रत्येक क्षण खुल्याने जगा” असले मॅसेज लिहून विकते.

आत्ता एखाद्याला यात काय कौतुक टाईप वाटू शकतं पण इतकं सोप्प नाहिए ते भावा. अमेरिकेत वर्णभेद मोठ्या प्रमाणात आहे. कृष्णवर्णीय लोकांवर श्वेतवर्णीय लोकांनी मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्याचा इतिहास आहे, आणि हाच इतिहास वर्तमान काळात देखील डोकावत असतो. म्हणजे आजही तिथे आडून आडून हा प्रकार चालतोच. जास्तच माहिती घ्यायची असेल तर बराक ओबामांना निवडणुकीला उभा राहिल्यानंतर कसा त्रास झाला ते डिटेल वाचून घ्या.

रंगभेदाचा इतिहास रॉजर खेरीसला शाळेच्या वयातच समजला. ती शाळेतील श्वेतवर्णीय मुलांच्यात चेष्टेचा विषय होत होती. अखेरीच तीने या चेष्टेला उत्तर म्हणून आपल्या टिशर्टवर लिहून घेतलं,“प्लेक्सीन इन माय कंप्लेक्शन.  हा टिशर्ट आजूबाजूच्या कृष्णवर्णीय लोकांमध्ये प्रसिद्घ झाला. लोकांनी तिचं कौतुक करायला सुरवात केली आणि त्यातूनच आली बिझनेसची एक भन्नाट आयडिया. या पुढच्या गोष्टी करण्यासाठी तिच्या सोबत होती ती तिची बहिण टेलर पोलार्ड.

टेलर पोलार्डने खेरीसचा एक फोटो TWEETER वर शेअर केला होता.

ज्यात खेरीसने प्रिंट केलेला फ्रॉक घातलेला होता मात्र आज जी खेरीसच्या कंपनीची फॅशन लाईन आहे तो हॅशटॅग तिथे तिने वापरला होता. खेरीस तेव्हा दहा वर्षांची होती. तिची बहिण आणि तिने मिळून सुरु केलेला हा व्यवसाय वर्षभरातच त्यांना करोडपती करून गेला.

एप्रिल २०१७ ला खेरीस या व्यवसायात उतरली. आयुष्यात सकारात्मक विचारांनी बदल होतोच. पण सकारात्मक विचार टी-शर्टवर छापून स्वतः एक कुशल व्यावसायिक व हजारो लोकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास निर्माण करता येतो. हे एका बारा वर्षाच्या खेरीस रॉजर्सने जगाला दाखवून दिलं.

लहानपणापासून फॅशन डिझायनर व्हायचे स्वप्न बघितलेल्या खेरीसला तिच्या आईने केवळ दीडशे डॉलर देऊन तिच्या डोक्यात असलेल्या व्यवसाय सुरु करायला मदत केली होती. वर्षभरातच खेरीसने दीडशे डॉलरचे दीड करोड रुपये केले.

आपल्या रंगाला घेऊन आत्मविश्वास गमावून बसलेली खेरीस नाइकी कंपनीची आज ब्रँडअँम्बेसिडर झाली आहे. जगातल्या प्रत्येकात आत्मविश्वास निर्माण करणारी खेरीस रॉजर्स ‘स्वतःवर प्रेम करा असाच संदेश सर्वांना देत असते.’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.