१२ एकरावर ३० काऊंटरवरून १५ लाख रुद्राक्ष वाटप, कुबेरेश्वर धाममधला रुद्राक्ष उत्सव…

हिंदू धर्मात रुद्राक्षाला मोठं महत्त्व आहे. हिंदू धर्मीय सहसा प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी आणि मन, शरीर आणि आत्मा पवित्र करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळा वापरतात. रुद्राक्ष आणि भगवान शिव यांचा संबंधही सांगितला जातो. या रुद्राक्ष मण्याच्या संबंधित एक उत्सव आयोजित करण्यात आलाय आणि तो उत्सव चर्चेतही आहे…

रुद्राक्ष उत्सव नेमका काय?

पंडित प्रदीप मिश्रा यांनी या उत्सवासंदर्भात बोलताना रुद्राक्षाबद्दल माहिती दिलीये. रुद्राक्षाचं महत्त्व काय आहे? त्याचे प्रकार काय असतात? कुबेरेश्वर धाममध्ये देण्यात येणारे रुद्राक्ष कोणते असतात वगैरे अशी सगळी माहिती प्रदीप मिश्रांनी दिली. ते म्हणाले,

“भारतात जवळपास ३३ प्रकारचे रुद्राक्ष आढळतात. त्यापैकी बरेचसे नेपाळमधून येतात. पण कुबेरेश्वर धामाचा रुद्राक्ष गंडकी नदीतून येतो. पुराणात असं सांगितलंय की रुद्राक्षाची निर्मिती भगवान शंकराने केली होती. म्हणूनच जोपर्यंत रुद्राक्ष तुमच्यासोबत आहे तोपर्यंत महादेव म्हणजेच भगवान शंकर स्वतः तुमच्यासोबत आहेत असं वाटतं.”

अशी महती सांगत पंडित प्रदीप मिश्रा यांनी कुबेरेश्वर धाम इथल्या रुद्राक्ष उत्सवाची घोषणा केली होती. इथे ७ दिवस रोज २४ तास रुद्राक्ष दिले जातील असंही म्हटलं होतं.

त्यामुळं लोकांच्या, भाविकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा रुद्राक्ष उत्सव असल्याचं बोललं जातंय.

रुद्राक्ष उत्सव एक दिवसआधीच सुरू झाला…
मध्य प्रदेशच्या सीहोर शहरातल्या कुबेरेश्वर धाम इथे हा रुद्राक्ष उत्सव सुरू आहे. हा उत्सव पंडित प्रदीप मिश्रा यांनी घोषित केल्याप्रमाणे १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत होणार होता, पण हा उत्सव ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच १५ फेब्रुवारीला सुरू झाला.

झालं असं की, १६ तारखेच्या कार्यक्रमासाठी आधीपासूनच श्रद्धाळू लोक आणि भक्तगन कुबेरेश्वर धाम इथं पोहोचले आणि झालेल्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण मिळवणं अशक्य असल्यामुळे प्रशासनाकडून उत्सव समितीला विनंती केली गेली आणि त्यानुसार मग ठरलेल्या वेळेच्या एक दिवस आधी रुद्राक्षांचं वितरण सुरू झालं.

शिवाय हे रुद्राक्ष तुमच्याकडे असेल आणि तुम्ही त्या रुद्राक्षाला पाण्यात टाकून ते पाणी प्यायलात तर, तुमच्या समस्या, तुमच्या कुंडलीतली ग्रहांची वाईट दशा, रोग, आजार सारं काही बरं होतं. असं भाविकांचं म्हणणं आहे.

या रुद्राक्ष वितरणा शिवाय इथे कथावाचन आणि भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलाय. एकूण १६५एकर जागेवर चितवलिया हेमा येथील मुरली मनोहर व कुबेरेश्वर महादेव मंदिर संकुलात या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पण या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठी गर्दी उसळली आणि अनेकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे हा उत्सव चर्चेत आलाय.

गर्दी का उसळली?

नक्की आकडेवारी अजून समोर आली नसली तरी, १५ तारखेला या परिसरात अंदाजे २ लाखांहून अधिक भाविक जमले होते… अगदी सकाळी ६ वाजल्यापासून हे सर्वजण रांगेत उभे होते. या उत्सवाविषयी सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात माहिती देण्यात आली होती. त्यामुळे समस्यांचा सामना करत असलेले आणि हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे भाविक हे या उत्सवासाठी जमा झाले आणि रुद्राक्ष मिळवण्यासाठी रांगेत लागले.

या गर्दीचा परिणाम काय झाला?

मूळ कार्यक्रम हा १६ तारखेला सुरू होणार असला तरी, रुद्राक्ष मिळवण्यासाठी एक दिवस आधीपासूनच भाविक आले होते. प्रशासनाच्या विनंतीनुसार रुद्राक्ष वितरण एक दिवस आधी सुरू केलं असलं तरी या गर्दीवर नियंत्रण आणणं शक्य झालं नाही.

परिणाम असा झाला की, या उत्सवासाठी तयार करण्यात आलेले बॅरीकेट्स तुटले, चेंगराचेंगरी झाली… लहान मुलं, स्त्रिया वृद्ध हे या  गोंधळात जमिनीवर कोसळले असं वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आलंय.

आता या सगळ्या परिस्थितीचा परिणाम म्हणून लोकांना भीती वाटायला लागली आणि उलट्या सुरू झाल्या. शिवाय सकाळपासून रांगेत उभे असलेले अनेक जण रांगेतून बाहेर गेलो तर नंबर जाईल म्हणून पाणीही प्यायला गेले नव्हते त्यामुळे, अनेकांना चक्कर येऊ लागली.

यामुळे पहिल्याच दिवशी जवळपास २००० लोकांना रुग्णालयात न्यावं लागलं.

दरम्यान या उत्सवासाठी उत्तम व्यवस्था केली असल्याचा दावा आयोजकांनी केलेला.
उत्सव सुरू होण्यापुर्वी माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार या उत्सवासाठी मोठी तयारी करण्यात आली होती.

जवळपास १६५ एकर जमिनीचा वापर या उत्सवासाठी करण्यात आलाय. काही भल्यामोठ्या जागेत पार्किंग व्यवस्था, भाविकांच्या राहण्यासाठीची सोय अशी सगळी तयारी झाली असल्याचं आयोजकांचं म्हणणं असल्याचं माध्यमांमधून सांगण्यात आलं होतं. पिण्याच्या पाण्यासाठी १६ वॉटर टँकर ज्यातून ७०० पाण्याचे पाईप आणि नळ जे २४ तास सुरू राहतील अशी व्यवस्था करण्यात आलीये.

भाविकांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून १५ भट्ट्या निर्माण करण्यात आल्यात ज्या भट्ट्यांमध्ये आचारी जेवण बनवतील. जेवणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानंं एक एक पुरी ही ५ किलो पीठाची असेल जी एक पुरी जवळपास ५० लोकांसाठी पुरेशी असेल. याशिवाय, या भागात २०० शौचालयांची निर्मिती करण्यात आलीये आणि काही फिरती शौचालयं मागवली असल्याचंही वृत्त माध्यमांमध्ये आहे.

महत्त्वाचं म्हणजे, रुद्राक्ष वाटपासाठी खास १२ एकर जमिनीवर ३० काऊंटर्स तयार करून तिथून हे काम केलं जाईल असं आयोजकांचं म्हणणं असल्याचं माध्यमांनी म्हटलंय.

हे सगळं झालं जे उत्सव सुरू होण्यापुर्वी सांगण्यात आलं होतं… पहिल्या दिवशीची परिस्थिती मात्र काहीशी वेगळी आहे.
आता माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार १५ तारखेला भाविकांना पाणी, अन्न याशिवाय रांगेत उभं राहावं लागलं होतं. पिण्याच्या पाण्याचा टँकर हा सायंकाळी ४ वाजता आल्याचं माध्यमांनी म्हटलंय. त्यामुळे जेवणा-खाण्याचा तर विषयच येत नाही.
उत्सवाच्या पुर्वी माध्यमांमध्ये ३० काऊंटर्सवरून वाटप होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, १५ तारखेला रुद्राक्ष वाटपासाठी फक्त १० काऊंटर्स सुरू असल्याचं रुद्राक्ष मिळालेल्या भाविकांनी म्हटलंय.
या रुद्राक्षासाठी गेलेल्या काही नागरिकांनी ही परिस्थिती पाहून रुद्राक्षापेक्षा जीव महत्त्वाचा असल्याचा पवित्रा घेतला तर काहींनी काहीही झालं तरी रुद्राक्ष घेऊनच जाणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

आता ही सगळी परिस्थिती आयोजकांच्या हलगर्जीपणामुळे उद्भवली असं बोललं जातंय तर, दुसरीकडे एक दिवस आधी उत्सव सुरू करावा लागला म्हणून हे सगळं झाल्याचंही बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.