लिज्जतच्या अध्यक्षा असणाऱ्या ‘पद्मश्री’ रुक्मिणी आज्जींचा प्रशासनाला विसर पडलाय

काही दिवसांपुर्वी आम्हाला एक फोन आला. फोन करणाऱ्या मुलाच नाव होतं श्रीकांत राजपूत. तो म्हणाला, बोलभिडूवर तुम्ही आपल्याच जवळच्या भारीतल्या माणसांची माहिती देता.

आमच्या इथल्या रुक्मिणी पवार यांच्याबद्दल कधीतरी माहिती द्या की.

साहजिक आम्ही हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. त्याला विचारलं काय करतात त्या आज्जी तर समोरचा मुलगा म्हणाला त्यांना पद्मश्री मिळाला आहे. लिज्जत पापडच्या पहिल्या फळीत त्या होत्या. हल्ली त्या गावाकडेच असतात. त्यांच्याबद्दल लोकांना माहितच नाही.

आश्चर्य आणि लाज या दोन्ही गोष्टी एका क्षणी वाटल्या. आश्चर्य यासाठी की लोकांना इतक्या मोठ्या व्यक्तिबद्दल माहित नाही आणि लाज यासाठी की आजपर्यन्त आम्हाला देखील त्यांच्याबद्दल माहित नव्हतं.

रुख्मिणी पवार यांची शोकांतिका म्हणजे काही वर्षांपूर्वी त्याचं बायपासच ऑपरेशन करायचं होतं. घरात कमावणारे लोक म्हणजे त्यांचा नातू. त्यांची दोन्ही मुलं वारली. त्यांच्या घरी आज त्यांचा नातू, आज्जी आणि दोन सुना असतात. उत्पन्नाच साधन म्हणजे पाच एकर शेती.

नातवाने शासकिय मदतीसाठी प्रयत्न केले पण पद्मश्री पुरस्कार विजेत्या आज्जींच्या पदरी निराशा आली. स्वखर्चाने नाशिकच्या एका हॉस्पीटलमध्ये हे ऑपरेशन करावे लागले.

रुख्मिणी पवार अस या आज्जींच नाव. त्यांच गाव जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातलं वाघळी हे त्यांच गाव. त्यांचे पती मुंबईत कामगार होते. नवऱ्यासोबत त्या देखील मुंबईला गेल्या. घरी बसून दिवसभर नवऱ्याची वाट पहायची, नवऱ्याने आणलेल्या पैशातून संसाराचा गाडा चालवायचा असा त्यांचा दिनक्रम चालायचा.

याच काळात लिज्जत पापडची सुरवात झाली होती. महिलांचा बचत गट काय करु शकतो ही सांगणारी ती चळवळ. रुख्मिणी पवार या गटात सामिल झाल्या. सुरवातील भांडवल नव्हतं म्हणून उधारीवर ८० रुपये घेण्यात आले होते. त्यातूनच घरच्या घरी पापड लाटण्याचा व्यवसाय सुरू झाला.

हळुहळु गट वाढत गेला. लिज्जत पापड श्री महिला गृहउद्योग संस्था निर्माण झाली. घरच्या घरी पापड बनवून देण्याच्या या उद्योगाने गती घेतली. हजारों महिला या उद्योगात आल्या.

याच काळात म्हणजे १९७३ च्या सुमारास त्यांना लिज्जतच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या काळावधीत लिज्जत पापड एक ब्रॅण्ड म्हणून लोकांसमोर आला. शेकडो महिलांची जागा हजारों महिलांनी घेतली. महाराष्ट्रासोबत देशाच्या कानाकोपऱ्यात लिज्जत पापड पोहचले. गावगाड्यातील महिला चार पैसे कमवून संसारास हातभार लावू लागल्या त्यामध्ये लिज्जतच्या अध्यक्षा रुख्मिणी पवार यांचा वाटा मोठ्ठा होता.

याच कारणामुळे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते १९९२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

सरकारमार्फत त्यांना दिलेल्या पुरस्कारांच्या यादीच त्यांच्याबाबत लिहण्यात आलं आहे की,

१९५० में जन्मी श्रीमती रुक्मिणी पवार ने १९७३ में कांदिवली में महिला गृह उद्योग लिज्जत पापड में पापड बेलने वाले सेक्शन में काम किया. १९८१ में वो लिज्जत पापड की पोलिप्रोफीलेन सेक्शन की संचालिक बन गयी. १९८४ में वो प्रबंध समिती की अध्यक्षा बन गयीं. जिसमें वो सामान्य श्रमिक के तोंर पर आई उसमें वो अध्यक्षा बन गयी. इनके प्रबंध में महिला गृह उद्योग भारत में एक प्रसिद्ध नाम हो गया. श्रीमती पवार महिलाओं के शक्ती का प्रतिक हैं. 

हजारों महिलांसाठी लढण्याचा आवाज रुक्मिणी पवार झाल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं.

एक दिवस बातमी आली रुक्मिणी पवार यांचे पती बाबूराव पवार यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुंबई सुटली. त्या कायमच्या पुन्हा आपल्या गावी वाघळीत आल्या.

आपली दोन मुलं, घर आणि चार-पाच एकर शेती ही त्यांच्या जगण्याची संपत्ती झाली. पण पुन्हा विश्व निर्माण करायचा या निश्चयाने त्यांनी सरगम नावाने पापड बनवण्यास सुरवात केली. दोन्ही मुलं हाताशी आली होती. त्यांच लग्न लावून देण्यात आलं. दोन्ही सुना घरात आल्या.

आणि पुन्हा एकदा संकट आलं. दोन्ही मुलांच आजरपणाच निमित्त होवून निधन झालं. ललित नावाचा एक नातू आणि दोन सुना असं चौकोनी कुटूंब राहिलं. सरगम पापड देखील या रहाटगाड्यात मागे पडून गेला.

आज या आज्जी वाघळीत राहतात. मदतीला नातू ललित चोवीस तास सज्ज असतो. पाच एकर जमीन आहे.

नाही म्हणायला सुखवस्तू अस हे कुटूंब आहे मात्र इतक्या मोठ्या व्यक्तींचे ऋण मात्र कोणालाच माहित नसतात ही शोकांतिका आहे. 

सामान्य माणसांच सोडा पण पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला निमित्तमात्र का होईना कौतुक करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत नाही याचं आश्चर्य वाटतं. एका पद्मश्री विजेत्या व्यक्तीला दिला जाणार मानसन्मान दिला जात नाही याच मुख्य कारण म्हणजे लोकांना माहिती नसतं त्यांना पद्मश्री मिळाला आहे.

अशा लोकांच्या गोष्टी समोर येत नाहीत. माध्यमांमधून चर्चेत येत नाहीत. श्रीकांत राजपूत, राहुल वाकलकर, अभिषेक कासोगे, अभिजितसिंग पाटील, दिपक पाटील,  अभिषेक कासोदे यांच्यासारखे तरुण असतात जे आपल्याच आजूबाजूच्या भारी गोष्टींचा मागोवा घेतात व त्यामागे तरुण म्हणून खंबीर उभा राहतात.

त्यांची ही गोष्ट या सर्वांनी मिळून बोलभिडूसमोर आणली व बोलभिडूच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणली. वास्तविक या तरुणांचे मनापासून आभार.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.