अझरुद्दीननं खेळलेल्या एका जुगारामुळं भारताला ‘बॉलर सचिन तेंडुलकर’ मिळाला…

मध्यंतरी इंग्लंडच्या जो रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार रन्सचा टप्पा गाठला. त्याचं लय कौतुक झालं. कुणीतरी म्हणालं, सचिन तेंडुलकरचा सगळ्यात जास्त रन्सचा रेकॉर्ड जो रुट मोडू शकतोय. दोन क्षण वाटलं, खरंच मोडलं तर?

पण बॅट्समन म्हणून सचिननं जी उंची गाठलीये, ती गाठणं कुणाला शक्य होईल असं सध्या तरी वाटत नाही. दुसऱ्या बाजूला डीप विषय म्हणजे सचिन बनणार होता फास्ट बॉलर.

लहान वयात क्रिकेट खेळताना सचिनला पेस बॉलिंगचा जबरदस्त नाद होता. शाळेकडून खेळताना त्याच्या बॅटिंग इतकीच चर्चा पेस बॉलिंगचीही व्हायची. नुसतं आवडतं म्हणून थांबणाऱ्यातला सचिन मुळीच नव्हता. त्यानं फास्ट बॉलर बनायचं म्हणून कष्टही घेतले आणि शास्त्रशुद्ध बॉलिंग शिकायला चेन्नईचं एमआरएफ पेस फाउंडेशनही गाठलं.

एमआरएफ पेस फाउंडेशन म्हणजे डीप विषय. एकेकाळचा फास्ट बॉलिंगचा बादशहा डेनिस लिली तिथं कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली पेस बॉलर्सच्या कित्येक पिढ्या घडत होत्या. सचिन इथं गेला, फास्ट बॉलिंगचं  प्रशिक्षण पण घेतलं… मात्र त्याची निवड काय झाली नाही.

सचिन तेंडुलकर, राईट आर्म फास्ट बॉलर हे चित्र बघायचा आपला चान्स तेवढा हुकला…

पुढं सचिननं बॅटिंगमध्ये विक्रमांचे डोंगर रचले, कितीही तगडा बॉलर असुद्या… अख्तर असेल, ली असेल, डोनाल्ड असेल सचिननं सगळ्यांच्या नाकावर टिच्चून रन्स केले.

पण या सगळ्यात सचिनची बॉलिंग काय थांबली नाही, फास्ट बॉलिंगची जागा तेवढी स्पिननं घेतली होती. जेव्हा टीमला गरज असेल तेव्हा बॉलर सचिन विषय डन करुन टाकायचा.

असाच एक किस्सा घडला होता, ईडन्स गार्डनवर २४ नोव्हेंबर १९९३ ला.

भारतात हिरो कपचं आयोजन झालं होतं. भारतीय संघ अगदीच खतरा होता. बॅटिंगचं बोलायचं झालं, तर कांबळी, अझरुद्दीन, सच्या, प्रवीण आम्रे आणि स्वतः कपिल देव. बरं बॉलिंगला काय तर, मनोज प्रभाकर, जवागल श्रीनाथ (हे नाव आदरानं वाचा आणि स्पीडनंही), सलील अंकोला, कपिल पाजी, अजय जडेजा आणि स्वतः अनिल कुंबळे.

एकाला काढला आणि दुसऱ्याला बसवला तरी, ताकद कमी व्हायची नाय.

त्या दिवशी हिरो कपची सेमीफायनल होती. समोर होती साऊथ आफ्रिका. त्यांची टीमही अजिबात साधी नव्हती, त्यामुळं काटे की टक्कर होणार होती. भारतानं टॉस जिंकला, कॅप्टन अझरुद्दीन म्हणाला ‘वि विल बॅट फर्स्ट.’

बॅटिंगला सुरूवात झाली आणि सोबतच पडझडीलाही, कारण भारताचा स्कोअर झाला ३ आऊट १८ रन. खच्चून भरलेल्या ईडन्सला वाटायला लागलं की आज आपला बल्ल्या फिक्स आहे. पण जोवर सचिन क्रीझवर होता, तोवर जनता निवांत होती.

तेवढ्यात रिचर्ड स्नेलनं सचिनला १५ रन्सवर आऊट केलं, सगळी जनता शांत. अझरुद्दीनच्या मनगटातली जादू मात्र त्यादिवशी बोलायला लागली. त्याला समोरच्या बाजूनं साथ देणारा एकच गडी होता, तो म्हणजे प्रवीण आमरे.

अझरुद्दीनं त्यादिवशी ९० रन्स मारले. त्याची विकेट घ्यायला आफ्रिकेला लय कष्ट करावे लागले. नशीब मात्र त्यादिवशी भारताच्या साथीनं नव्हतं. भारताच्या ४ विकेट्स तर रनआऊट मुळंच गेल्या. रनआऊट होणारे प्लेअरही साधे नव्हते… मनोज प्रभाकर, विनोद कांबळी, ४८ मारणारा प्रवीण आमरे आणि कपिल देव.

या सगळ्या किश्श्यात भारताला फक्त १९५ रन्सच करता आले. आफ्रिकेला टार्गेट सोपं मिळालं होतं.

त्यांच्या बॅटिंगमध्ये थोडी पडझड होत होती, पण अँड्र्यू हडसननं एक बाजू लावून धरली होती. फिफ्टी मारुन तो ६२ रन्सवर आऊट झाला. तरीही आफ्रिकाचा बुरुज काय ढासळायला तयार नव्हता. कारण ब्रायन मॅकमिलननं उरलेली मोहीम फत्ते करायला घेतली.

त्यानं मॅच ओढत ओढत शेवटच्या ओव्हरपर्यंत नेली. आफ्रिकेला जिंकायला ६ रन्स हवे होते. हातात विकेट्स होत्या दोन. मॅकमिलन क्रीझवर असल्यानं पारडं त्यांचंच जड होतं.

शेवटची ओव्हर टाकायला भारताकडे पाच पर्याय होते, त्यातले मेन म्हणजे कुंबळे, श्रीनाथ आणि कपिल. त्यामुळं त्यांच्यातल्या एकाकडं बॉल जाईल असा अंदाज होता.

पण कॅप्टन अझरुद्दीननं एक अनपेक्षित जुगार खेळायचा ठरवला. त्यानं बॉल दिला सचिन तेंडुलकरकडं.

 सेमीफायनल मॅच, मॅचमधली सगळ्यात महत्त्वाची ओव्हर आणि अझरुद्दीननं एकही ओव्हर न टाकलेल्या आणि बॅटिंगमध्ये फेल गेलेल्या सचिनला बॉलिंगला आणलं.

सचिननं मात्र आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवायचा असं ठरवलं होतं. पहिल्या बॉलला आफ्रिकेचं नशीब फिरलं आणि फॅनी डिव्हलियर्स रनआऊट झाला. पण एक रन निघाला होता. क्रीझवर आला डोनाल्ड. त्याला सचिननं लेझीम खेळायला लावली आणि सलग तीन बॉल डॉट टाकले.

डोनाल्डला काय गणित झेपत नव्हतं, मात्र पाचव्या बॉलला त्यानं सिंगल काढून मॅकमिलनला स्ट्राईकवर आणलंच.

मॅचचा शेवटचा बॉल… टीमला विजयाच्या आणि स्वतःला फिफ्टीच्या उंबरठ्यावर असलेला मॅकमिलन स्ट्राईकवर होता. सचिनच्या त्या एका बॉलमध्ये मोठी रिस्क होती. त्यानं जोर लावला आणि बॉल आणि मॅचचं गणित दोन्ही फिरवलं. 

बॅट हवेत घुमवूनही चार रन्स हवे असताना, त्याला फक्त एकच रन करता आला आणि भारतानं मॅच मारली. सगळं ईडन्स हवेत उसळलं. सचिन तेंडुलकर द बॅट्समन फेल झाला असला, तरी सचिन द बॉलर मात्र सुपरहिट ठरला.

तिथून पुढं सगळ्याच कॅप्टन्ससाठी एक समीकरण लागलं, जिथं कमी पडेल, तिथं आम्ही म्हणायला बॉलर सचिन आहेच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.