प्राणी हत्या थांबवण्यासाठी स्वतःच डोकं उडवण्याची शपथ साधू वासवानींनी घेतली होती…
भारताला संत महंतांची, क्रांतिकारक, समाजसुधारक अशी मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यापैकीच एक म्हणजे साधू वासवानी. जनमानसात ते दादाजी म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी भरपूर कामं करून ठेवली आणि लोकांच्या भल्यासाठी केली त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण जाणून घेऊया.
साधू वासवानी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८७९ रोजी हैदराबाद येथे झाला. स्वतःमध्ये निर्माण होत असलेल्या आध्यात्मिक प्रवृत्ती बालवयातच बाल वासवानी यांनी ओळखल्या होत्या. सर्व सांसारिक बंधने तोडून भगवंताच्या भक्तात तल्लीन व्हायचे होते, पण आपल्या मुलाने स्थायिक होऊन कुटुंबासोबत राहावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती.
आईच्या विशेष विनंतीमुळे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांचे बालपणीचे नाव तंवरदास लीलाराम होते. खऱ्या जगात लोकं त्यांना T.L. वासवानी म्हणून ओळखत असे तर आध्यात्मिक लोक त्यांना साधू वासवानी म्हणून संबोधित.
१९०२ मध्ये त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवून विविध महाविद्यालयात शिकवण्याचं काम केलं. त्यानंतर टीजी कॉलेजमध्ये त्यांची प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. लाहोरमधील दयाळ सिंग कॉलेज, कूचबिहारमधील व्हिक्टोरिया कॉलेज आणि कलकत्ता येथील मेट्रोपॉलिटन कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून अध्यापन केल्यानंतर ते 1916 मध्ये पतियाळा येथील महेंद्र कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यांनी कलकत्ता कॉलेजमध्ये प्रवक्ते म्हणून काम केले आणि त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.
साधू वासवानी ज्या काळात जन्मले होते तो काळ होता पारतंत्र्याचा. देशात स्वातंत्र्यासाठी चळवळी झाल्या. या चळवळीपासून कोणीही अलिप्त राहू शकले नाही. बंगालच्या फाळणीच्या मुद्द्यावर झालेल्या सत्याग्रहात भाग घेऊन साधू वासवानी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. महात्मा गांधीचा निकटचा सहवास त्यांना लाभला. पुढे त्यांनी ठिकठिकाणी युवकसंघ आणि युवा-आश्रम स्थापन करून तरुणांना विधायक कार्यासाठी संघटित करणे सुरू केले. 1931 मध्ये डेहराडून येथील शक्ती आश्रम हा त्यांनी स्थापन केलेला प्रसिद्ध युवा-आश्रम आहे. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी ‘सखी सत्संग मंडळ’ स्थापन केले. गांधीजींच्या अहिंसेचे ते मोठे प्रशंसक होते. तते शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षक होते. भूमिहीनांना जमीन देऊन आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची हे सांगायला हवे, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी सहकारी शेतीचाही आधार घेतला.
प्राणी हत्या थांबवण्यासाठी साधू वासवानी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्याने सर्व सजीवांना एक मानले. सजीवांवर त्यांचे अपार प्रेम होते. प्राणी हत्या थांबवण्यासाठी स्वतःचे शीर कापण्याची त्यांची तयारी होती. केवळ प्राणीच नाही तर झाडे आणि वनस्पतींनाही जीवन आहे असे त्यांचे मत होते.
तरुणांना संस्कारक्षम करण्यात आणि चांगले शिक्षण देण्यात त्यांना खूप रस होता. भारतीय संस्कृती आणि धार्मिक सहिष्णुतेचे ते निस्सीम उपासक होते. प्रत्येक मुलाला धर्म शिकवला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांनी सर्व धर्मांना समान मानले. ते म्हणाले की, प्रत्येक धर्माची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. ते धार्मिक एकतेचे खंबीर समर्थक होते. त्याचा प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पडला. भारताच्या विविध भागात सतत प्रवास करून त्यांनी आपले विचार लोकांसमोर ठेवले आणि अनेक लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली.
साधू वासवानी यांनी ‘संत मीरा शैक्षणिक चळवळ’ सुरू करून प्रथम मुलींसाठी शाळा व नंतर त्यांच्यासाठी महाविद्यालय काढले. मीरा शैक्षणिक चळवळीचे प्रमुख कार्यालय पुण्यात अजूनही आहे. पुण्याचे ‘सेंट मीराज कॉलेज फॉर गर्ल्स’ प्रसिद्ध आहे. ‘मीरा स्कूल’ व ‘साधू वासवानी स्कूल’ ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शाळा दिल्ली, अहमदाबाद, बडोदे व मुंबई येथे आहेत.
16 जानेवारी 1966 रोजी साधू वासवानी यांचं निधन झालं पण आजही साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या मिशनतर्फे आध्यात्मविषयक चर्चा, भजने, प्रवचने इ. कार्यक्रम होत असतात. गरीब कुटुंबांना मदत, खेडी दत्तक घेणे, दुष्काळग्रस्त भागांत विहिरी खोदणे ह्यांसारखी कामेही केली जातात. संस्थेने अद्ययावत इस्पितळही बांधले आहे. तीन धर्मादाय दवाखाने आणि एक रोगनिदान केंद्रही चालविले जाते. इंग्रजी, मराठी, हिंदी, सिंधी अशा विविध भाषांतून मिशनची नियतकालिके व पुस्तके निघतात. संस्थेने त्यासाठी एक प्रकाशनसंस्थाही काढली आहे.
२५ नोव्हेंबर हा दादाजींचा जन्मदिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून पाळला जातो.
हे ही वाच भिडू:
- रोमच्या व्हॅटिकन सिटीने पहिल्यांदाच एका सामान्य भारतीयाला संत ही उपाधी दिलीय
- बाहेरगावी शिकणाऱ्या पोरांना घरचा डब्बा एसटीमुळे मिळू लागला. कारण ठरले वसंतदादा !
- साधू -संतांच्या सेन्सर बोर्डने हिरवा कंदील दिल्यावरच भारतात रिलीज होणार फिल्म आणि वेब सिरीज
- शेकापचे दत्ता पाटील कट्टर विरोधक होते तरी वसंतदादांनी एका वाक्यात त्यांचं कॉलेज मंजूर केलं