आजच्याच दिवशी राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या झाल्याची बातमी आली अन्

आज तारिख १९ मार्च.  सध्या हजारोंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात. सरकार कोणाचेही येवो शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. राज्यात याची सुरवात झाली होती १९ मार्च १९८६ रोजी. या दिवशी राज्यातली पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती.

२० मार्च वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली आणि उभा महाराष्ट्र हादरून गेला.

१९८६ साली राज्यातली पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती.

यवतमाळ जिल्ह्यातलं चिलगव्हाण हे गाव शेतकऱ्यांच्या आत्महत्येनं आक्रोश करत होतं. साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटूंबाने केलेल्या सामुदायिक आत्महत्येमुळे एकच खळबळ माजली होती.

साहेबराव करपे त्यांच्या पत्नी व चार मुलं अशी आत्महत्या झाली होती. साहेबराव करपेंनी आपल्या मुलांना शेतीवरचं औषध देवून स्वत:ला संपवले होते.

शेषराव करपे हे चिलगव्हाणचे मोठ्ठे शेतकरी होते. त्यांना साहेबराव आणि प्रकाश ही दोन मुलं होती. अर्धा एकरभर त्यांचा वाडा होता. संपन्नता होती. वैभव होतं. साहेबराव करपेंच्या वाट्याला सव्वाशे एकर जमीन आली होती. साहेबराव करपे हा माणूस संगीतावर प्रेम करणारा होता.

गावातील पोरांना ते संगीत शिकवायचे. त्यासाठी मोफत वर्ग त्यांनी सुरु केले होते. अस सांगतात की साहेबराव करपे यांच्यामुळे ३० मुलं संगीतशिक्षक म्हणून नोकरीला लागली होती.

साहेबराव करपे धडपड्या माणूस होता. १५ वर्ष ते गावचे सरपंच होते. सव्वाशे  एकर जागा आणि हाताखाली २०-२५ माणसं अस एैश्वर्य सोबत होतं. त्यांनी शेतात  नवनवे प्रयोग करायचं ठरवलं. त्यासाठी कर्ज काढलं होतं. कर्ज काढून शेती करण्याचा त्यांना निर्णय त्यांच्याच मुळावर आला.

एक दिवस MSEB कडून त्यांच्या शेतीची वीज तोडण्यात आली. शेतीत प्रयोग करण्याच्या नादाने कर्ज झालं होतं त्यात वीज तोडून त्यांच्या आत्मसन्मानावर वार बसला होता. याचा परिमाण त्यांच्या मानसिकतेवर झाला. आत्ता काय करायचं हा प्रश्न होता. हळुहळु बडा घर आणि पोकळ वासा अशी परिस्थिती निर्माण झाली.

आणि आजचाच तो दिवस उजडला.

तारिख होती १९ मार्च १९८६ ची. या दिवशी त्यांची पत्नी मालती, तीन मुली व एका मुलासोबत यात्रेच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथे पोहचले.  साहेबरावांनी आपल्या सोबत झिंक फॉस्फेट आणि डेमॉक्रॉन ही औषधे सोबत घेतली होती.

दत्तपुरच्या आश्रमात पोहचल्यानंतर औषध लावलेली ही भजी त्यांनी आपल्या मुलांना आणि पत्नीला चारली. लहान मुलगा भगवान याचा जीव जात नव्हता म्हणून त्यांनी त्याला फास लावून संपवले.

मृत्यूपुर्वी सर्वांच्या कपाळावर एक एक नाणे ठेवले आणि स्वत:ला देखील संपवले.

या घटनेनंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. सधन शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने सरकार हादरले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.