गणबाई मोगरा गणाची जाळी : साखराबाईच्या गाण्याशिवाय नवरात्रात घट बसत नाही..

अगं साखरबाय साखरबाय तुफान सुटला वारा
तुफान सुटला वारा गं वारा तुला नाही कुणाचा थारा….

आता हे गाणं झालं आराधी मेळ्यातलं, साखराबाई आणि गजराबाई यांच्या सवाल जवाबातलं, पण यातली साखराबाई कोण हे तसं सांगण्याची गरज नाही. साखराबाई टेकाळे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची एकदम जवळची गायिका, आई, गुरू अशा कितीतरी पदव्यांनी समृध्द.

महाराष्ट्राला मिळालेली एक अस्सल गावरान बाजाची गायिका जिच्या प्रत्येक गाण्याला महाराष्ट्राने अफाट प्रेम दिलं.

पंढरपूर आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे आणि कथांचा बादशहा अशी उपाधी मिळालेले छगन चौगुले जितके भक्ती संगीतात लोकप्रिय होते तितकीच जबरदस्त लोकप्रियता साखराबाई टेकाळे यांची आहे.

आताच्या रीलच्या आणि सोशल मीडिया जमान्यात साखराबाईंची गाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात री-व्हिजिट केली.

यात प्रामुख्याने गणबाई मोगरा गणाची जाळी पाणी घालते गौराबाई, ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, भल्या भल्यांची वाट मी लावली…

अशी हजारो गाणी पुन्हा एकदा ट्रेंडिंगला आली आणि अजूनही त्याच दणक्यात ती सुरू आहेत. एक विशेष म्हणजे भल्या भल्यांची वाट मी लावली हे गाणं तर आयपीएल मधे चेन्नई आणि मुंबई समर्थक एकमेकांना चिडवायला वापरता म्हणजे वापरतातच.

महाराष्ट्र तसा लोककलेने समृध्द आहे भले आज लोककलाकारांवर खडतर वेळ आलेली असो पण पोटाला चिमटा देऊन ही कलाकार मंडळी लोककला जगवत असतात.

साखराबाई टेकाळे या तुळजभवानीच्या आराधी. तुळजभवानी, मांढरची काळूबाई, वणीची सप्तशृंगी अर्थात साडेतीन शक्ती पिठावर शेकड्याने गाणी त्यांनी केली. साखरा बाई यांचा प्रवास आपण जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. कळंब तालुक्यातील पिंपळगाव डोळा हे साखराबाई यांचं मूळ गाव. आईच्या आवाजातले गाण्याचे आणि देवी भक्तीचे गुण आपसूक साखराबाई यांच्यात उतरले.

महाराष्ट्रात देवी देवता मोठ्या प्रमाणात आहे. आराध्यांचे, यल्लामाचे मेळे, चौकभरण, गेनमाळ अशा अनेक कार्यक्रमात साखराबाई जायच्या आणि देवी भक्तीत रममाण व्हायच्या. आता तिथले गाणे ऐकून ऐकून त्यांच्यातल कवीमन शांत कसं बसेल मग तिथून साखराबाई यांचा प्रवास सुरू झाला तोही वयाच्या तेराव्या वर्षापासून.

चोपडीतल्या गाण्यापेक्षा खोपडीतलं गाणं कायम लक्षात राहतं…

साखराबाई या काय शाळा शिकलेल्या नाही पण दैवी देणगी त्यांना अशी आहे की मनातल्या मनात गाणं तयार करतात तेही चाल, शब्द, कडवे वैगरे सगळं एकदम परफेक्ट. वाचता लिहिता न येणाऱ्या साखराबाई टेकाळे इथचं सगळ्यांना भारी पडतात. अशी भारी भारी गाणी आणि त्याहून गोड चाली त्यांनी देवीच्या चरणी अर्पण केल्या आहेत.

जवळपास 4 हजारच्या वर गाणी आज घडीला साखराबाई यांनी केलेली आहेत. पण या इतक्या गाण्यांपैकी एकाही गाण्याचा शब्द त्यांनी लिहिलेला नाही हे विशेष, म्हणुन त्या म्हणतात की चोपडीतल्या गाण्यापेक्षा खोपडीतलं गाणं कायम लक्षात राहतं.

पहिलं गाणं…

साखराबाई टेकाळे यांचं पहिलं वहिलं गाणं म्हणजे गणबाय मोगरा, गणाची जाळी…

हे गाणं किती हिट आहे हे काय सांगायला नको कारण या गाण्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणी आहेत. हे गाणं गाण्यासाठी जेव्हा साखराबाई यांना ऑफर आली तेव्हा त्यांच्या पतीने त्यांना आपल्या घरातल्या घरात गाणी ठीक आहे पण असं बाहेर गाणं वैगरे बर नाही म्हणून नकार दिला होता पण हिमतीन साखराबाई यांनी हे गाणं चोरून लपून आणि कोणालाही न कळवता रेकॉर्ड केलं पण तत्कालीन प्रोडुसरने त्यांना फसवल. गाण्याचा एकही रुपया त्यांना दिला नाही आणि परत संपर्कही ठेवला नाही.

साखराबाई या धक्क्यातून बाहेर आल्या नव्हत्या. पुढे हे गाणं भयंकर हिट झालं आणि सुमित कंपनीने साखराबाई यांना शोधून काढलं.

हे गाणं सुमित कॅसेट मध्ये आधी रेकॉर्ड झालं होतं त्याचं मानधन म्हणून जागेवर कंपनी मधल्या लोकांनी 9 हजार रूपये दीले आणि पुढील गाण्यांसाठी आवतान दिलं. असा हा पहिल्या गाण्याचा किस्सा. सुमित कंपनीने अशा अनेक लोककलाकारांना ओळख मिळवून दिली.

चित्रपट क्षेत्रात एंट्री…

कसं असतं की चित्रपटात जी लोककला दाखवली जाते ती एकतर ओरिजनल लोककलाकारांना घेऊन केली जात नाही त्यामुळे त्यात नकली आणि बटबटीतपण लवकर दिसून येतं. तेव्हा मात्र काळूबाईच्या नावानं चांगभलं हा सिनेमा आला होता आणि त्यात पहिलं गाणं साखराबाई टेकाळे यांना मिळालं होतं आणि ते शूटही त्यांच्यावरच झालं होतं.

ते गाणं होतं कोंबड्यानं बांग दिली गं, माझ्या काळूला जाग आली गं…एकूण चार सिनेमांत साखराबाई यांना गाण्याची संधी मिळाली.

आजही साखराबाई टेकाळे यांचे गाणे नवरात्रात महाराष्ट्राच्या घराघरात ऐकायला मिळतात.

आवाजाला थेट देव्हाऱ्यात स्थान मिळणं हे मोठा भाग्य समजल जातं. जे आपल्या बुद्धीला पटत ते प्रामाणिकपणे करणे आणि मनात देवी बद्दल कायम आदर राहणे आणि हे सगळं तीचच आहे असं मानून सेवा त्या करतात. आजही यू ट्यूबवर साखराबाई टेकाळे यांचे सामने, मेळे आणि गाणी ऐकायला, पाहायला मिळतात.

यातला बाळू शिंदे आणि साखराबाई टेकाळे यांचा आराधी सामना एकदा बघाच.

महाराष्ट्रात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाशिवाय पंढरीचा विठोबा जागत नाही आणि साखराबाई टेकाळे यांच्या आवाजाशिवाय नवरात्रात घट बसत नाही….

  • भिडू दुर्गेश काळे

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.