पत्रकार म्हणाला, ‘हे काहीतरी भयंकर नाटक आहे, नाटकातली महिला स्टेजवर साडी बदलते वैगरे’

मराठी रंगभूमीच्या इतिहासात ज्या नाटकाला पहिल्यांदा प्रखर विरोध झाला, असं नाटक म्हणजे ‘सखाराम बाईंडर’. कमलाकर सारंग दिग्दर्शित ‘सखाराम बाईंडर’ मध्ये निळू फुले, लालन सारंग प्रमुख भूमिकेत. विजय तेंडुलकरांनी हे नाटक लिहिलं होतं.

तेंडुलकर एकदा वाईला गेले असताना त्यांना बाईंडर नावाचा एक माणूस तिथे प्रत्यक्ष भेटला. हा बाईंडर आणि त्याची ठेवलेली बाई दोघे खानावळ चालवायचे. तेंडुलकर या बाईंडरला भेटले. त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या.

या बाईंडरचं वागणं काहीसं विचित्र होतं. समाजाच्या चौकटीत बसणारं नव्हतं. परंतु खरं होतं.

बाईंडरला भेटून तेंडुलकर मुंबईत आले. पण त्यांच्या डोक्यातून बाईंडर जात नव्हता. तेंडुलकरांच्या कल्पनेत बाईंडरचं चित्र साकार होत होतं.

एकदा डॉ. श्रीराम लागूंशी कोणत्यातरी विषयावर बोलताना त्यांच्या मनातलं बाईंडरचं स्वरूप आणखी स्पष्ट झालं.

त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक लिहिला. आणि अशाप्रकारे तेंडुलकरांच्या लेखणीमधून जन्माला आलेलं नाटक म्हणजे ‘सखाराम बाईंडर’.

कमलाकर सारंग यांनी नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. सखारामच्या भूमिकेसाठी निळू फुले यांचं नाव पक्कं झालं.

चंपाच्या भूमिकेसाठी कमलाकर सारंग अभिनेत्रीचा शोध घेत होते. अगदी कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या अभिनेत्रींचा विचार त्यांनी केला. त्यांची पत्नी लालन सारंग सुद्धा उत्तम अभिनेत्री. परंतु लालनला चंपाची भूमिका द्यावी, असा विचार त्यांच्या मनात आलाच नाही.

अखेर डॉक्टर कुमुद मेहतांनी लालनचं नाव सुचवलं. लेखक विजय तेंडुलकर यांना मात्र लालन चंपाच्या भूमिकेत शोभणार नाही असं वाटत होतं. लालनला सुद्धा चंपाच्या ऐवजी लक्ष्मीची भूमिका साकारण्याची इच्छा होती.

पण डॉक्टर कुमुद मेहतांनी आग्रह केला आणि लालन सारंग यांनी चंपाची भूमिका साकारली.

१९७२ साली हे नाटक रंगभूमीवर आलं.

नाटकाचा विषय काहीसा वेगळा होता. एके दिवशी शिवाजी मंदिरला नाटकाचा दुपारी चार वाजता प्रयोग होता. प्रयोग झाल्यावर एक पत्रकार नाट्यगृहात कोणाशी तरी बोलत होता.

“हे काहीतरी भयंकर नाटक आहे. नाटकातली महिला स्टेजवर साडी बदलते वैगरे”

असं त्या पत्रकाराचं बोलणं दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी ऐकलं. तेव्हाच त्यांना जाणवलं की आत्ता वादाची ठिणगी पेटणार.

हळूहळू नाटकावर गंभीर टीका करण्यात आली.

त्याच वेळी पुण्यात आणि मुंबईत लिंग निर्मूलन समिती स्थापन झाली होती. त्यांनी या नाटकाला विरोध केला. ‘या नाटकामुळे विवाह संस्था धोक्यात आली आहे. स्त्री – पुरुष नात्याला या नाटकामुळे वेगळंच वळण मिळालं आहे.’ अशा पद्धतीची टीका झाली. नाटकाचे १३ प्रयोग झाले आणि हे नाटक सेन्सॉरकडे गेलं. कमलाकर सारंग यांना स्वतःच्या नाटकाबद्दल खात्री होती.

त्यांनी अजिबात खचून न जाता सेन्सॉरकडे गेलेलं नाटक सोडवायचा प्रयत्न केला.

या काळात त्यांच्या पत्नी आणि नाटकात चंपाची भूमिका साकारणाऱ्या लालन सारंग यांनी नवऱ्याला भक्कम साथ दिली. या दरम्यान दोघांनाही धमक्यांचे फोन यायचे. इतकंच नव्हे, तर लालन सारंग यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. परंतु कोणाच्याही बोलण्याचा विचार न करता या दोघांनी कोर्टकचेरी आदी सर्व गोष्टी सांभाळून लढा दिला.

आणि ८ महिन्यांनी नाटक सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटलं.

१९७३ साली ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगभूमीवर आलं. यावेळेस शिवसेना सारख्या राजकीय पक्षाकडून प्रयोग उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आत्ता मात्र कमलाकर सारंग यांना काहीतरी करणं भाग होतं. ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जाऊन भेटले.

“बाळासाहेब तुम्ही सुद्धा कलाकार आहात. तुम्ही एकदा प्रयोगाला या. तुम्हाला काही खटकलं तर पुढे आम्ही बघू. पण तुम्ही आधी प्रयोगाला या आणि नाटक पाहा”

असं कमलाकर सारंग बाळासाहेबांना म्हणाले.

बाळासाहेब यांनी कमलाकर यांच्या म्हणण्याचा मान राखला.

बाळासाहेब ‘सखाराम बाईंडर’ पाहण्यास आले. नाटक पाहून झाल्यावर त्यांना काहीच आक्षेपार्ह्य वाटलं नाही. यामुळे शिवसेनेकडून होणारा विरोध मावळला. आणि नाटकाचे प्रयोग पुन्हा मार्गी लागले. बाळासाहेबांना नाटक दाखवल्यामुळे कमलाकर सारंग यांच्यावर टीका झाली. पण ते म्हणाले ,

“समोरून जर अचानक दहा बारा गुंड तुमच्यावर हल्ला करणार असतील. तर तुम्हाला त्यांचा मार सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी मला काहीतरी पाऊल उचलणं भाग होतं.”

अशी स्वतःची भूमिका कमलाकर सारंग यांनी मांडली.

सर्व विरोध दूर झाला, ‘सखाराम बाईंडर’ जोरात सुरू झालं.

या सर्व गोष्टींचा नाटकाला फायदा झाला. प्रेक्षकांनी नाटक पाहण्यासाठी हाऊसफुल्ल गर्दी केली. निळू फुले यांनी रंगवलेला सखाराम आणि लालन सारंग यांनी साकारलेली चंपा नेमकी कशी आहे? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. नाट्यरसिकांनी ‘सखाराम बाईंडर’ नाटकावर भरभरून प्रेम केलं.

दिग्दर्शक जेव्हा एखादं नाटक बसवतो तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कलाकृती पोहोचावी, एवढाच त्याचा प्रामाणिक हेतू असतो. त्यामुळे ‘सखाराम बाईंडर’ नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा, दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी दिलेल्या लढ्याची मराठी नाटकांच्या इतिहासात ठळकपणे दखल घेतली जाईल.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.