मी महाराष्ट्रातला एक तरुण शेतकरी आहे आणि माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला कारण..

शेतकरी म्हणलं की समस्या आठवतात. कुठेतरी समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्याचा चेहरा चटकन डोळ्यासमोर येतो. पण आम्हाल एक असा शेतकरी भेटला जो आज राज्यात गाजतोय. त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पाच लाख रुपयांच पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला आहे.

आणि हो कशाबद्दल तर या शेतकऱ्याने स्वत: १० वर्ष मेहनत करुन विद्यापीठांच्या तोडीस तोड अस कांद्याचं वाण तयार केलं. हा कांदा आठ महिने टिकतो. या कांद्याच्या जातीच नाव संदिप कांदा. 

संदिप घोले या पुण्याजवळ असणाऱ्या तरुण शेतकऱ्यांने हि जात विकसित केली आहे. तब्बल ८ ते १० वर्ष आपल्या शेतात अहोरात्र परिश्रम घेवून या तरुणाने हि जात विकसित केली.

शेतीत इंटरेस्ट असो किंवा नसो पण आपण संदिपचा स्ट्रगल वाचला पाहीजे, कारण काय तर शेतकरी कसा विचार करतोय, त्याला भविष्यात काय करायचं आहे आणि आज काय चाललं आहे हे सर्व संदिप घोले यांच्या आयुष्याच्या गोष्टीत तुम्हाला दिसून जाईल. 

संदिप यांना फोन लावल्यानंतर त्यांनी जे बोलभिडूसोबत बोलताना सांगितलं,

ते त्यांच्याच भाषेत आम्ही तुम्हाला सांगतो. 

माझी वडिलोपार्जित बारा एकर शेती. लहानपणापासून मी शेती कशी बघितली तर सगळं कस पारंपारिक पद्धतीने चालायचं. म्हणजे आपल्या शेजारचा जे करतो तेच आपण करायचं. ऊस लावला तर सगळ्यांनी ऊस लावायचा. कांदा लावला तर सगळ्यांनी कांदा लावायचा. वेगळ काहीच नसायचं. पाणी सोडण्यापासून रासायनिक खत टाकण्यापर्यन्त सगळे जे करतील तेच आपण करायच. माझी बारावी झाली आणि मी शेतीत पडलो.

तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण शेतीत पैसै घालतोय पण तिवढे पण निघत नाहीत. उत्पादन आणि उत्पन्न याचा ताळमेळ कधीच नसतो. आम्ही काय करायचो. कर्ज काढायचो, शेती करायचो आणि नंतर मिळालेल उत्पन्न बॅंकेत भरायचो. असा तो कारभार होता. 

एक दोन वर्ष झाली आणि मी विचार चालू केला की याच कारण काय. एकतर मार्केट शेतकऱ्यांच्या ताब्यात नाही. बाजारभाव आपल्याला ठरवता येत नाही. मग काय करायचं. त्यावेळी मला राहूरीच्या दत्तात्रय वने गुरूजींबद्दल समजलं. राहूरी येथे वने गुरूजी राहतात हे मला समजल. ते साल होतं २००८ चं. मी पहाटेच माझी मोटारसायकल घेतली आणि पाटस वरून राहूरीला निघालो. 

तेंच्या शेतात पोहचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले असतील. वने गुरूंजीची ती पहिली भेट होती. त्या भेटीत गुरूजींनी मला एक प्रश्न केला. 

आपण औधष मोजून टाकतो, खतं मोजून घेतो, बीयाणं मोजून लावतो मग आपण पाणी मोजून का देत नाही..? 

प्रश्न साधा होता पण महत्वाचा होता. आपण पाणीचं मोजून देत नाही. पिकांच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं तर काय होईल याचा विचार करत नाही. काही शेतकऱ्यांना वाटतं जितकं जास्त पाणी देईल तितकं चांगल उत्पादन येईल. पण तस नसतं. आपण पाणी मोजून दिलं पाहीजे. मग त्यांनी पहिली गोष्ट सांगितली पाण्याचं ऑडिट करायचं. आपल्याकडं पाणी किती आहे. त्यावर संरक्षित पाणी या संकल्पनेकडे वळलो. म्हणजे पाणी किती वापरायचं, पिकं कोणती घ्यायची याकडे वळलो. आपल्याकडे वर्षभर असणारा पाणीसाठा ठरवून आठमाही, बारामाही पिक आणि पाणी किती लागणार याचा ताळेबंद ठेवण्यास सुरवात केली. 

त्यासाठी गरज होती स्पिंक्लर आणि ड्रिपची. माझ्या शेतात मी ड्रिप आणि स्पिंक्लर केलं. आत्ता शेतकरी ते करायला लागलेत पण मी सुरू केलं तेव्हा २००८ वर्ष सुरू होतं. तेव्हा देखील शेतकऱ्यांनी मला त्रास द्यायला सुरवात केली. जो काही त्रास झाला असेल तो मानसिक त्रास पारंपारिक शेतकऱ्यांनी दिली. आपण जगापेक्षा वेगळ करतोय म्हणल्यावर आपण त्रास दिला. अस कुठं असत का? अस पाणी पुरतं का? असे प्रश्न सुरू झाले. 

पण वने सरांनी सांगितलं तू आत्ता जे करतोय त्याचं दहा वर्षांनी लोक कौतुक करतील. तू करत रहा.

मग पारंपारिक पिकात आपण काय करु शकतो याचा विचार सुरू केला. ऊसासाठी मी सांगलीच्या संजीव माने सरांच मार्गदर्शन घेवू लागलो. पीक कस घ्यायचं, सरी किती सोडायची पहिल्यांदा ४० टनावरून मी ६० टनावर गेलो. ६० वरुन ८० नंतर एकरी १०० टन उत्पादन घेवू लागलो.

हे करताना मला एक गोष्ट कळाली, कितीही खत टाका, कुठलिही औषधं फवारा. पिक चांगल यायला जमिन सजीव असणं आवश्यक आहे.

जमीन सजीव नसली तर काहीच होणार नाही. त्यासाठी मला कळालं पिकाची फेरपालट, शेतखताचा वापर. साध गणित असत आपण सकाळी जेवलो तेच संध्याकाळी जेवलो तेच परत दुसऱ्या दिवशी जेवलो तर अंगाला लागणार नाही. जमिनीच पण तसच असत. कांदा तर कांदा किंवा ऊस तर ऊस करुन चालणार नाही. फेरपालट केली पाहीजे. मी वेगवेगळे प्रयोग करत गेलो. 

कांदा घेत असताना मी विचार करू लागलो कुठल्या प्रकारचा कांदा टिकतो. सिंगल रिंग, गोलाकार आकार, आकर्षक, डब्बल पत्ती कांदा जास्तकाळ टिकतो हे माझ्या लक्षात आलं. मग मी काय करु लागलो तर असा कांदा बाजूला काढून ते त्याच बियाणं वापरू लागलो. 

हे करताना प्रश्न यायचा आपण शेतात कितीही चांगले कांदे निवडून लावले तरी शेजारच्या शेतात परागीकरणामुळे चांगल बियाणं होईलच याची खात्री नसायची. तरी मी दरवेळी चांगले कांदे बाजूला काढत गेलो. त्यासाठी जो कांदा जास्त टिकतोय याचा अभ्यास सुरू ठेवला. अस करत मागच्या दहा वर्षात मी 80 ते 90 टक्यांपर्यन्त सिंगल रिंग कांद्यापर्यन्त पोहचलो.

तो कांदा सात ते आठ महिने टिकतो आणि कितीही मोठ्ठा झाला तरी फुटत नाही. 

नॅशनल इनोवेशेन फाऊंडेशन (NIF) संस्थेचे काही अधिकारी २०१३ साली माझ्या शेतावर आलेले. त्याआधी माझ्या या प्रयोगामुळ माझं नाव ICAR च्या टॉप प्रोग्रेसिव्ह फार्मर इन महाराष्ट्र या यादित गेलं होतं. मग त्या अधिकाऱ्यांनी माझा डेटा गोळा केला. मी इतके वर्ष कांद्याचं बियाण तयार करण्याचे कोणते प्रयत्न करतोय याची चौकशी केली. २०१५ सालापासून NIF मार्फत माझं बियाणं खरेदी केलं जावू लागलं.

हे बियाण त्यांनी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, हरियाणा अशा वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांनी दिलं. त्यांच्याकडून या बियाणाबद्दल रिपोर्ट घेण्यात आले. तेथील शेतकऱ्यांकडून रिपोर्ट मागवण्यात आले. त्यांनी सांगितलं हा कांद्यात रोगप्रतिकार शक्ती खूपच अधिक आहे. मग NIF ने हे बियाणे दापोली आणि रेपोली विद्यापाठांकडे अभ्यासाठी पाठवलं. त्यानंतर ते राजगुरूनगरच्या कांदा संशोधन केंद्राकडे पाठवण्यात आलं.

त्यांनी माझी संदिप कांदा, त्यांनी विकसित केलेली फुले समर्थ आणि अॅग्री फाऊंड रेड, बाबासाहेब पिसोरे यांच सोना चाळीस या चार जातींच कम्पेर करायला विद्यापीठात पाठवलं.

यात संदिप कांदा या जातीच सर्वोच्च अस ३७ टन उत्पन्न निघालं. त्यांनी सांगितल की हे बियाण करताना उच्च शुद्धता जपण्यात आली आहे, यामुळं यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे. 

मागच्या वर्षी NIF मार्फत पाच लाख रुपये देवून माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नॅशनल फर्स्ट हा किताब मी विकसित केलेल्या जातीला मिळाला. हा कांदा आठ महिने टिकू शकतो. त्याला काहीही होतं नाही. मला आज लोकं विचारतात नक्की काय बदल झाला पाहीजे तेव्हा मी सांगू वाटतं शासनाच कृषी खातं आणि शेतकरी यांच नातं कुठेतरी संपल आहे. फक्त कागदावरच ते सघलं दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने शासनाचे कृषी शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून सल्ला दिला तर आपला देश सुजलाम् सुफलाम् होईल.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.