केजीएफचा अधीरा तर आत्ता आलाय याआधी संजू बाबानं डेंजर व्हीलन साकारलेत…

संजय दत्त अर्थात बॉलिवूडचा संजू बाबा आणि त्याचा असलेला एक वेगळा ऑडियन्स हे कायमच एक समीकरण झालं आहे. सिनेमा भाईगिरीचा असो किंवा संजय दत्त त्यात हिरो असो पब्लिकचा संजय दत्तवर इतका विश्वास आहे की, हा भिडू आपले पैसे वसूल करून देऊ शकतो.

आता नुकताच KGF2 हा सिनेमा आला आणि पहिल्या पार्टपासून असलेली लोकांची उत्सुकता थेटरमध्ये पूर्ण होताना दिसतीय.

प्रत्येक पिढीचा संजय दत्त वेगळा आहे. थानेदार, एल्गार, साजन यातला संजय दत्त आवडणारे लोकं वेगळे, तर वास्तव, मुन्नाभाई यातला संजय दत्त आवडणारे भिडू एका वेगळ्या पिढीचे आहेत. एवढंच नाही तर नुकतेच आलेले पानिपत, प्रस्थानम यातल्या संजू बाबाचा चाहता वर्ग वेगळा आहे.

हिरो म्हणून संजय दत्त कितीही हिट झाला तरी त्याच्या खलनायकी भूमिका कधीपण जास्त गाजतात.

खलनायकी भूमिका गाजण्याचं उदाहरण म्हणजे, मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या एका गुन्हेगाराला जेलमध्ये घेऊन जात होते. त्याला विचारलं, की हे कांड का केलं? तर तो म्हणाला होता, “मला संजय दत्तसारखं खलनायक बनायचं आहे.”

संजय दत्त केजीएफ सिनेमाच्या माध्यमातून एक तगडा व्हीलन म्हणून पुढे येतोय पण याआधीही संजू बाबानं काही डेंजर भूमिका केल्यात.

 खलनायक

हा सिनेमा पाहून घराघरांत संजय दत्त निपजू लागले होते. जे लोकं 90s चं गुणगान गातात त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे एक कसदार आणि परिणामकारक सिनेमा होता. जॅकी श्रॉफ, माधुरी दिक्षित यांच्याहून जास्त हवा एकट्या संजय दत्तची झाली होती.

है प्यार की मुझको क्या खबर, बस यार नफरत के लायक हुं मैं…

नायक नहीं खलनायक हुं मैं

या गाण्यात संजू बाबा जे काय दिसतोय आणि त्याचा वेगळाच डान्स यामुळे खलनायक असूनही सिनेमाचा हीरो संजय दत्त वाटून गेलेला. संजय दत्तच्या या भूमिकेने अनेक तरुण पोरं तेव्हा खरोखर खलनायक बनायला निघाले होते. हा संजय दत्तचा पहिला निगेटिव्ह रोल होता.

 वास्तव

हा सिनेमा कधीही टीव्हीला लागू दे सगळेच हा सिनेमा पाहणार म्हणजे पाहणार कारण यात संजू बाबाने साकारलेला रघु अक्षरशः लोकांच्या अंगात भिनला होता. केस मागे टाकलेले, ढगळा कुर्ता, पायजमा आणि डोक्याला कुंकवाचा उंच टीका आणि गळ्यात सोन्याची जाड चेन घेऊन संजू बाबा घरात येतो आणि आईला सांगतो की, ‘ये देख असली है असली, पच्चास तोला, पच्चास तोला, कितना पच्चास तोला’ हा डायलॉग नंतर अजरामर झाला.

त्या काळात संजय दत्त बॉम्ब स्फोट प्रकरणात अडकला होता आणि त्याचे सिनेमे फ्लॉप जात होते तेव्हा वास्तवच्या रघु भाईने त्याला तारलं. ह्या वास्तव मधला गँगस्टर लोकांना तुफ्फान आवडून गेला.

 मुसाफिर

तोंडात जाडजूड सिगार आणि भले मोठे कल्ले, डोळ्यावर काळा गॉगल हा मुसाफिर सिनेमात बिल्ला नावाचा व्हीलन संजय दत्तने साकारला होता. सिनेमा तसा आपटला पण संजय दत्तच्या बिल्लाने आणि त्याच्या लुकने बॉलिवूडच्या इतिहासात आणखी एका व्हीलनची भर टाकली.

प्लॅन

2004 साली प्लॅन सिनेमांत संजय दत्तने साकारलेला मुसाभाई हा निगेटिव्ह रोल एक वेगळीच वाईब देऊन जातो. तसं संजय दत्त गँगस्टर भूमिका कायमच वाढीव करतो त्यात काय वादच नाही. संजय दत्तचं हे पात्र लोकांच्या चांगलंच लक्षात राहिलं.

अग्निपथ

कांचा चिना हा व्हीलन संजू बाबाने असा केला होता की, हिरोची तर फाटलीच होती पण ऑडियन्ससुध्दा दचकलं होतं. कारण कोणालाच कल्पना नव्हती की संजय दत्त टक्कल करून ऋतिक रोशनला इतका तुडवल म्हणून. हा सिनेमाही हिट झाला आणि संजय दत्तचा हा कांचा चिनावाला लुकही लोकांना आवडला होता. 

यातली ॲक्टिंग तर अक्षरशः अंगावर काटे आणणारी होती. अजूनही अग्निपथ सिनेमा पाहिला तर संजय दत्त किती खतरनाक काम करु शकतो, याचा सहज अंदाज येतो.

 पानिपत

अर्जुन कपूर आणि संजय दत्त स्टारर पानिपत बॉक्स ऑफिसवर सडकून आपटला पण संजय दत्तच्या अहमद शाह अब्दालीने एक वेगळाच फिल आणला होता. त्याचा मुघल लूक, डोळ्यात सुरमा आणि भरदार देहयष्टी यामुळे संजय दत्त सहज भाव खाऊन गेला.

संजय दत्तच्या या भूमिका अजूनही लोकांच्या लख्ख लक्षात आहेत आणि संजय दत्तच्या चाहत्यांना त्याच्याकडून कायम अशा खुंखार रोलची अपेक्षा असते.

आता अधीरा म्हणूनही संजय दत्तनं वाढीव रोल केलाय असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचा आवडता संजय दत्तचा निगेटिव्ह रोल कोणता ते कमेंटमध्ये सांगा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.