तेव्हा घोडावत यांच्याकडं एकवीस नख्याचं कासव आहे अशी गावात चर्चा होती….

मारूतीने नव्याने स्विफ्ट गाडीत कलर आणले होते. तेव्हा घोडावतांचा मॅनेंजर पुण्या मुंबईच्या शोरुम मध्ये जावून कलर बघायला गेला. शोरूम मधूनच त्यांनी फोन संजय घोडावतांना फोन लावला.

साहेब दहा बारा कलर आहेत, कुठला घेवू? 

साहेबांनी मॅनेंजरला सोबत येताना प्रत्येक कलरची गाडी घेवून यायला लावली. सांगली कोल्हापूरच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या कलरच्या स्विफ्ट गाड्या दिसायला लागल्या तेव्हा लोकांमध्ये वर सांगितलेल्या प्रसंगाची अफवा जोरात चालू होती.

घोडावतांनी काहीही केलं की लोकांनी त्यामागे स्वत:ची एक स्टोरी रचलेली असायची. बऱ्याचदा या गोष्टी खोट्या असतात पण घोडावत हे नाव समोर जोडलं की खोट्या गोष्टी खऱ्या वाटू लागायच्या. 

संजय घोडावत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे टाटा, बिर्ला, अंबानी. कधीकाळी M80 वरुन फिरणारा माणूस इतका श्रीमंत होवू शकतो हे अकल्पित होतं. म्हणूनच त्यांच्या नावासोबत बऱ्याचदा अशा अफवा रचल्या गेल्या.

 स्टारच साम्राज्य असणारा अब्जाधीश हा संजय घोडावत यांचा प्रवास. 

घोडावत हे मुळेच राजस्थानचे. मारवाडी कुटूंब. या पट्यातल्या तालुक्यांच्या ठिकाणी बऱ्याचअंशी मारवाडी कुटूंब स्थायिक झाले आहेत. मुळच्या गावकऱ्यांसोबत एकोप्याचे संबध ठेवून त्यांनी व्यापारात चांगलच यश मिळवल. घोडावत कुटूंब हे देखील असच. कोल्हापूरातल्या जयसिंगपूर गावात स्थलांतरित झालेलं. घोडावत घराणं हे घोड्यांच व्यापार करायचं म्हणून घोडावत हे आडनाव.

तेव्हा चांगल्या बापाच बिघडलेलं पोरगं हि संजय घोडावत यांची ओळख होती.  मारवाडी समाजातला एकमेव पोरगा जो बिझनेस मध्ये फेल जाणार, घर विकून कोळश्याचा व्यापार करणार या शब्दात जयसिंगपुरातल्या माणसांमध्ये या पोराची ओळख होत होती.

घोडावत कुटूंब हे व्यापारीच होते. आजूबाजूच्या गावांमधील दुकानदारांना होलसेल भावात माल विकणं हे त्यांच काम. संजय घोडावत देखील तेच करु लागले. कधी मोटारसायकल तर कधी सायकल. गावागावात फिरायचं आणि पानमसाला विकायचा. सालापासून घोडावतांनी क्वालिटी कंपनीचा पान मसाला विकण्यास सुरवात केली. यातून बऱ्यापैकी पैसा मिळायचां. गावातला एक छोटामोठा व्यापारी अस त्यांच नाव होतच. 

पण संजय घोडावत हे क्रिऱ्यानिष्ट माणूस. शांत न बसता कायतर वेगळं करण्याचा किडा. त्यातूनच जन्म झाला तो स्टार गुटख्याचा. तेव्हा या भागात मावा सिस्टिम नव्हती. व्यसन असलच तर तंबाखूच. मार्केटमध्ये गुटख्याच्या कंपन्या होत्या पण त्या सगळ्या बाहेरच्या. वितरक म्हणून काम करण्यापेक्षा आपणच गुटख्याची कंपनी काढू म्हणून त्यांनी स्टार गुटख्याची आयड्या डोक्यात आली. 

झालं अस की कंपनीसाठी लागतं भांडवल. वडिलांकडून हे भांडवल गोळा झालं. आत्ता जसे बचत गट चालतात तशा प्रकारचं एक छोट गुटख्याच युनिट निघालं. अगदी घरगुती टाईप. पॅकिंगवर लिहलं होतं स्टार गुटखा. 

आपल्याच दुकानदारांना हा माल विकायचा म्हणून संजय घोडावत प्रयत्न करु लागले.

पण नवीन ब्रॅण्ड कोण खाणार. माणसांनी सरळ सरळ हा गुटखा फाट्यावर मारायचं काम केलं. गुटखा काय विकत नव्हता. ज्यांच्याकडे माल ठेवून यायचे तेच दुकानदार हा माल परत करु लागले. थोडक्यात सांगायच झालं तर पोराने पाहिलेला बिझनेस पुर्णपणे पाण्यात गेला होता. फक्त त्यावर फेलचा शिक्का मारायची गरज होती. हा बिझनेस बुडतोय म्हणून मधल्या काळात कापड आणि अॅल्युमिनियमच्या व्यवसायात हातपाय मारून झालेले पण आगीतून उठून फुफाट्यात अशा प्रकारचा तो बिझनेस होता. शेवटी गुटखाच म्हणून संजय घोडावतनी जोर लावला. या काळात सायकल तर सायकलवरुन ते बाहेर पडायचे. सकाळी पिशव्या भरून स्वत:च्या कंपनीचा गुटखा विकायचे. सकाळी सात ते रात्री अकरा असा दिनक्रम असायचा. त्या काळात एक दुकानदार सोडला नाही. अगदी फुकट माल देण्यास सुरवात केली. 

हळुहळु लोकांनी ट्राय करायला काय जातय या धर्तीवर महाग पुडीपेक्षा स्टार बरा म्हणून स्टार गुटखा खाण्यास सुरवात केली. उंचे लोग उंची पसंत च्या रेसमध्ये लंबी रेस का घोडा आला. तंबाखू घ्या ती मळा, चुना घ्या यापेक्षा हे तयार मटेरियल बरय म्हणून लोकांनी गुटखा खाण्यास सुरवात केली. लोकांनी महाप्रसाद असल्यासारखा गुटखा खाण्यास सुरवात केली. 

संजय घोडावत हे पक्के बिझनेसमॅन होते. कधीतरी गुटख्यावर बंदी येईल अशी जाणिव त्यांना असावी. गुटख्यातून बक्कल पैसे मिळल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात हातपाय पसरायला सुरवात केली.  घोडावत अॅग्रो, फूड्स, टेक्स्टाइल, पॅकेजिंग, एनर्जी, रियल इस्टेट, मायनिंग आणि आत्ता सुरू करण्यात आलेल्या स्टार एअरलाईन्स पर्यन्त  घोडावत याचा प्रवास सुसाट चालू लागला. मीठ, खाद्यतेल असे वेगवेगळे बिझनेस निघाले. स्टारचं तेल देखील मिळू लागलं आणि अख्खा मसूर पण. त्या काळात स्टारच्या खाद्यतेल आणि मिठाची जाहिरात स्मृती इराणी करायच्या. आज देखील घोडावत हे नाव सर्वच क्षेत्रातल्या बिझनेसमध्ये क्रमांक एकवर आहे. 

दरम्यानच्या काळात घोडावत मोठ्ठे होतं गेले तसा त्यांनी सांगली कोल्हापूर दरम्यान एक बंगला बांधला. तो बंगला पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठ्ठा बंगला असावा. जेव्हा या भागात नव्याने मल्टिमिडीया फोन आणि लॅपटॉप येत होते तेव्हा प्रत्येकाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये त्यांच्या घरातले फोटो असायचे. असा तो बंगला. त्यांच्या घराचा पाहूणचार घ्यायला सलमान पासून अनेक सेलिब्रेटि येत असतात.

पण घोडावत नाव चर्चेत असतं ते त्यांच्या गाड्यांसाठी त्यांच्याकडे रोल्स रायल्स ची फॅन्टम आहे, हमर आहे. २००६-०७ सालात सांगलीच्या कॉलेजच्या पोरांना हमर बघायला मिळायची ती घोडावतांमुळेच.

आश्चर्यचकित करणारा प्रवास हा घोडावतांचा प्रवास म्हणून ओळखला जातो. म्हणून सर्वात जास्त अफवा त्यांच्याच नावाने पसरल्या. कासवांमुळे पैसा मिळतो अशी अंधश्रद्धा आली तेव्हा सगळ्यात मोठ्ठ कासव घोडावतांकडेच असणार अशा पुड्या सुटल्या कारण अंबानी, टाटा, बिर्ला अशी नाव फक्त ऐकून असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राने पहिल्यांदा एक मोठ्ठा बिझनेसमन पाहीला होता असो, असा अशक्य वाटणारा प्रवास करणं हे खायच काम नसतं. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.