हनुमानावर सिरीयल काढून हनुमान घराघरात पोहचवणारा संजय “खान” होता…

भारत हा असा देश आहे जिथे रासखानासारखे कृष्णभक्त मुस्लिम कवी आहेत. जिथे शकील बदायुनी नावाचा मुस्लिम प्रसिद्ध हिंदू चित्रपट गीत ‘मन तडपत हरी दर्शन को’ लिहितो, ज्याला खय्याम यांचे संगीत आणि मोहम्मद रफीचा आवाज आहे.
गंगा-जमुनी तहजीब जर आपल्या समाजात असेल तर ती आपल्या सिनेमातही आहे.
हिंदूबहुल देशात बॉलीवूडचे सर्वच टॉपचे स्टार मुस्लिम आहेत यात काही वादच नाही. त्याचा विस्तार छोट्या पडद्यापर्यंत होतो आणि या मालिकेतच संजय खानचे नाव आहे.
ज्याने त्या काळातील प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘जय हनुमान’ बनवली आणि बनवली कारण आजही त्याच्या तुलनेची हनुमान गाथा पडद्यावर येऊ शकली नाही.
संजय खान बॉलिवूडमधील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होता. पण त्याची सुरवात झाली ती अभिनयातून. वर्ष 1964, ‘हकीकत’ चित्रपट. 1960 ते 1980 पर्यंत त्याने जवळपास 30 चित्रपटांमध्ये काम केले. ‘दोस्ती’, ‘दस लाख’, ‘एक फूल दो माली’, ‘इंटकम’, ‘उपासना’, ‘मेला’ आणि ‘नागिन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या.
अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट 1986 मध्ये आला होता. त्याचे नाव होते ‘काला धंदा गोरे लोग’.
त्यानंतर संजय खान छोट्या पडद्यावर परतला आणि त्याच्या करिअरने एक नवीन उड्डाण घेतलं. 1990 मध्ये त्यांनी ‘द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ ही टीव्ही मालिका सुरू केली. स्वतः दिग्दर्शन केले, टिपू सुलतानची भूमिका स्वतः केली.
8 फेब्रुवारी 1990 रोजी ‘द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान’च्या शूटिंगदरम्यान आगीच्या दुर्घटनेत तो 65 टक्के भाजला होता. या अपघातात 52 जणांचा मृत्यू झाला. 13 दिवसांत 73 शस्त्रक्रिया करून संजयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कामावर परतल्यानंतर त्याने ‘टिपू सुलतान’चे शूटिंग पूर्ण केले. यामध्ये त्याचे दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हींचे कौतुक झाले.
1997 मध्ये संजय खानने ‘जय हनुमान’ या मेगा टीव्ही मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. रामाचा अनन्य भक्त असलेल्या हनुमानाची कथा भारतातील टीव्ही इंडस्ट्रीत प्रथमच अशा प्रकारे सादर करण्यात आली.
याला प्रचंड दाद मिळाली. 2000 पर्यंत ‘जय हनुमान’ टेलिकास्ट होत असे. संजय खानचा ‘जय हनुमान’ देखील जास्त लक्षात राहतो कारण तो बनवणारे बहुतेक लोक मुस्लिम होते.
‘मंगल को जन्मे, मंगल ही करते, मंगलमय भगवान’ या टीव्ही मालिकेचे शीर्षक गीत आजही लोकांच्या जिभेवर आहे. त्याचे पार्श्वसंगीत खय्याम यांनी दिले होते आणि ध्वनी मिक्सिंग झहीर अलाउद्दीन यांनी केले होते.
त्या काळातील प्रसिद्ध भक्ती संगीतकार रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेले संगीत संजय खान यांना मिळाले. संजयची मुलगी फराह खान अलीने या मालिकेतील पात्रांचे दागिने डिझाइन केले होते.
बॉलिवुडमधला म्हणा किंवा संबंध भारतातला सगळ्यात मोठा हनुमान भक्त हा मुस्लिम होता अर्थात संजय खान होता.
आज ही 90 च्या दशकातल्या पोरांना जय हनुमान मालिका म्हणजे खूप मोठा नॉस्टॅल्जीया वाटतो कारण तो काळ आणि त्या काळात संजय खानने मोठ्या कष्टाने उभारलेली ती हनुमानाची मालिका हे सगळं एक दिव्यच होतं.
हे ही वाच भिडू :
- आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा त्यांना वाजपेयीजींचा हनुमान म्हंटलं जायचं…
- मुंबईच्या हनुमान थिएटरमधून आमदार- खासदारांना उचलून बाहेर काढावं लागायचं
- अयोध्येत रामलल्लाच्या आधी हनुमान गढीच दर्शन घ्यावं असं का म्हणतात?
- बाळासाहेबांच्या सुनबाई आमिर खानला घेऊन बाबरीच्या घटनेवर पिक्चर काढणार होत्या