अशी आहे संत बाळुमामांची कथा.

देव माणसात आहे ते तत्व पूर्वापार चालत आले आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्याना तो नक्की भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा. जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात.

त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्याच्यातील अतिसामान्य व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होतात.

बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील ‘अक्कोळ’ या आडवळणी खेडेगावातील मायाप्पा-सत्यवा या पती-पत्नीच्या पोटी झाला. मायाप्पा-सत्यवा यांचे थोरला आणि धाकला लेक चारचौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता. पण, बाळूचे असे वागणे आई वडिलांच्या जिव्हारी घोर लावण्यासारखे होते.

बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचं वळण लागावं यासाठी मायाप्पांनी त्याला गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेटजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले.

बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता. काम करत असताना तो बाभळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचे अस सांगितलं जातं.

चंदूलाल शेटजींच्या गोठय़ातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की, थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे.एकदा सहजच गोठय़ामध्ये गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे.

मायाप्पा आणि सत्यवा यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले. योग्य त्या वेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला. आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अतर्क्य-अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली.

बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीनारायण महाराज-श्रीमौनी महाराज (पाटगाव) आणि श्रीमुळे महाराज अशी होती.

येथून पुढे अनेक वर्षे ही गुरुशिष्यांची जोडी सर्वत्र संचार करती झाली.

दरम्यान, बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र-भेटीला बाळूमामा जाऊ लागले.

बाळूमामांच्या सहज बोलण्यातून-वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत-नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. पण, जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही.

‘स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चामडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत, तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत. माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती.

‘अखंड नामस्मरण’ आणि ‘रामकृष्णहरी’चा जप हा साधासोपा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्ध मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी  4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली.

आदमापूर

समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे. या मंदिरात पहाटे ५ वाजता पुजा व आरती होते, ९ वाजता नैवेद्य होतो, संध्याकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो. दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबलीचा प्रसाद दिला जातो.

या मंदिरात  सदगुरू संत बाळूमामा यांच्या समाधीमंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. हात-पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. अनिल नानेवर says

    सर आपली माहिती खूपच छान असते आणि परिपूर्ण पण असते.
    सर मला शनिवारवाडा कुणी आणि का जाळला याचा इतिहास जाण याच आहे.
    तसेच मला पेशवायच्या अंतच्या वेळी शनिवरवाड्यावर कोणत्या मराठ्याने युनियन जॅक फडकावला आणि त्याने का फडकावला याची माहिती पाहिजे

  2. Abhiraj Patil says

    विठ्ठल रखुमाई मंदिरा चा पूर्ण इतिहास सांगू शकतात का? खूप शोधला पन सापडला नाही आशा आहे तुम्ही सांगू शकाल…

Leave A Reply

Your email address will not be published.