राज ठाकरेंच्या सभेत शाहीर साबळेंच्या सिनेमाचा टिझर दाखवला, असे होते शाहीर साबळे..!!!

औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेत आज शाहिर साबळे यांच्या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं सोबतच शाहीर साबळेंच्या सिनेमाचं टिझर लॉन्च करण्यात आलं. शाहीर साबळेंच्या भूमिकेत अंकुश चौधरी असणार आहेत तर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे आहेत. येत्या २९ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..

कोण होते शाहीर साबळे..?

WhatsApp Image 2021 09 02 at 11.57.02 PM

साताऱ्याजवळील पसरणी येथे ३ सप्टेंबर १९२३ रोजी जन्म झालेले कृष्णराव साबळे जेमतेम सातवीपर्यंत शिकले होते वडील भजन गात असल्यान लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या संगीताच्या संस्कारातून त्याच्यातला कलावत घडला.

लहानपणापासूनच सामाजिक चळवळीशी जोडले गेल्यानं त्यांना साने गुरुजी, क्रांतीसिंह नाना पाटील, भाऊराव पाटील, सेनापती बापट यांचा सहवास लाभला.

१९४२ च्या चले जाव चळवळीत, स्वातंत्र्यानंतर गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली तोफ’ असे त्याना म्हटल जायच. 

कलावंत असल्याने समाजातील त्रुटी, दोष लक्षात घेऊन त्यांनी अनेक समाज प्रबोधन करणारी प्रहसन लिहिली.

‘जय जय महाराष्ट्र माझा..’ या महाराष्ट्र गीतासह ‘या गो दांड्यावरून….’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या….’

अशी दर्जेदार लोकगीतं महाराष्ट्राला दिली. 

महाराष्ट्रात फिरून लोकगीतं संकलित करून त्यांची पहिली रेकॉर्ड केली, रंगभूमीवर मोबाईल थिएटरचा पहिला प्रयोग शाहीर साबळे यांनीच केला. तर तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक नाटकाशी जोड़ण, मुक्त नाट्य हा नवा प्रकार निर्माण करण असं अमूल्य योगदान शाहीर साबळे यांनी दिलं. 

लोककलेच्या क्षेत्रात फार मोलाचं योगदान दिलेल्या या महान कलावंताचा पदमश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारानी सन्मान करण्यात आला.

अशा या महान कलावंताची त्यांच्या कन्येने म्हणजेच वसुंधरा साबळे यांनी फेसबुकवर सिनेमा गली येथे लिहिलेली एक आठवण बोल भिडूच्या माध्यमातून शेअर करत आहोत. 

तस बघायला गेल तर बाबांना इंग्रजी चित्रपट पाहाण्याच फार वेड होतं. ते जरी सातवीही शिकले नव्हते आणि इंग्लीश भाषा त्यांना अजीबात येत नसली तरी ते वेळ काढून तेच चित्रपट बघत असत. हिंदी चित्रपट बघतच नव्हते असही नव्हतं पण अगदी कमी आणि ते ही क्लासीक. त्यांनी वक्त, गाईड, मेरा नाम जोकर असे चांगले चित्रपट आवडीने पाहीले होते.

राजेश खन्ना सुपरस्टार होऊन लोकांच्या मनावर राज्य करत असताना त्यांनी आवडीने पाहीलेला त्याचा चित्रपट होता ” आनंद ” आणि तो पाहून आल्यानंतर ” तो डॉक्टरची भुमीका करणारा पोरगा खुप पुढे जाईल ”

अस मत त्यांनी व्यक्त केल्याच मला चांगलच आठवतय.

तर एक दिवस रमेश ठाकरेंनी राजेश खन्नाची खास वेळ त्याच्याकडून मागुन घेतली आणि बाबांना त्याच्या ” आशिर्वाद ” बंगल्यावर जाण्या बद्दल सांगीतलं. बाबांची खरच अजीबात इच्छा नसतानाही त्यांनी अग्रह सोडला नाही आणि बाबा एकदाचे जायला तयार झाले.

त्यावेळी राजेश खन्ना साऊथच्या ” हाथी मेरे साथी ” या चित्रपटाच्या शुटींगमधे व्यस्त होता. मुंबईत येऊन जाऊन असायचा. तर जी वेळ राजेशने रमेशना दिली होती त्यावेळेला एक बुके घेऊन बाबा आणि रमेश आशिर्वाद बंगल्यावर पोचले. राजेश खन्ना तेव्हा लेटनाईट घरी येऊन झोपला होता. त्याच्या सेक्रेटरीने अस सांगताच रमेश ठाकरेंचा ठाकरीबाणा उफाळुन आला,

” आम्हाला वेळ देऊन हा झोपतोच कसा? ” अस म्हणत ते हुज्जत घालायच्या मुडमधे आले आणि बाबांनी त्यांना दमात घेत तीथेच रोखलं.

” रमेश कलाकारांवर तु जबरदस्ती करु नकोस. ती ही माणसच आहेत..झोपु देत त्यांना चल नीघुया.”

अस म्हणत बाबा बंगल्या बाहेर पडले सुध्दा पण रमेश ठाकरे काही गप्प बसणारे नव्हते त्यांनी बुके सोबत बाबांच व्हिजीटींग कार्डही लावुन ठेवल आणि तीथुन ते दोघेही घरी आले..

संध्याकाळी चार वाजुन गेले असतील आणि खुद्द राजेश खन्नाचा फोन आमच्या घरी आला. त्याने न भेटल्या बद्दल आधी दिलगीरी व्यक्त केली आणि दुसऱ्या दिवशी भेटण्याची वेळ देऊन अगत्याने भेटायला येण्याची विनंती केली. खर म्हणजे बाबांना या भेटींमधे काडीचा इंटरेस्ट नव्हता कारण राजेश खन्ना काही त्यांना ओळखत असण्याची सुतराम शक्यता नव्हती त्यात बाबांची हिंदीची बोंब मग भेटून करायच काय?

पण परत रमेशनी बराच आग्रह केला आणि आम्ही ( राजेश खन्नाचे पंखे ) जबरदस्ती केल्यामुळे शेवटी बाबा जायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी राजेशने दिलेल्या वेळेवर ते दोघेही तीथे पोचले तेंव्हा चक्क राजेश खन्ना त्यांची वाट पाहात असल्याच दिसलं.

बाबांना भेटून राजेश खन्ना फारच आनंदी झालेला दिसला. बाबांना ” तो आपल्याला का ओळखेल? ” हि खात्री होती ती सपशेल खोटी ठरली होती. गिरगावात बालपण गेलेला राजेश बऱ्यापैकी मराठी बोलत होता आणि त्याने बालपणात बाबांची प्रहसन गिरगांवात पाहीली होतीच पण तरुणपणी कॉलेजमधे असताना बाबांच्या ” या गो दांड्यावरन बोलते नवरा कुणाचा येतो ” या गाण्यावर दुसरा स्टार जितेंद्र बरोबर तो बरेचदा धमाल नाचलाही होता.

तो आपल्या गिरगावातल्या आठवणीत रमुन गेला आणि अर्ध्या तासाची वेळ कधी दोन,तीन तासांवर गेली हे कुणालाच समजल नाही. बाबाही मग जरा खुलले. एकंदरीत ही भेट बरीच आठवणीत रहाण्यासारखी झाली.

त्यावेळी बाबा ज्या स्टाईलचा सदरा घालुन तिथे गेले होते त्याच्या डिझाईनची तारीफही त्याने केली. पुढे तसाच सदरा त्याने “अमर प्रेम” मधे घातलेला दिसला आणि बऱ्याच जणांनी बाबांना ते आठवणीने सांगीतलं होत. त्यात माझी सख्खी मावशी वनमालाही होती.

” बाई, राजेश खन्नाला बघताना मला सारखे शाहीर आठवत होते” अस तीने चक्क बोलुन दाखवलं होत…

  • वसुंधरा साबळे 

#cinemagully #सिनेमागली

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.